Eknath Khadse on Dhananjay Munde | बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली. या प्रकरणात धनंजय मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर आले. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला. यातच आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. या प्रकरणी विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. Eknath Khadse on Dhananjay Munde | काय म्हणाले एकनाथ खडसे? एकनाथ खडसे म्हणाले की, “गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी करण्यात येत होती. अखेर त्यांनी आज राजीनामा दिला. मला वाटतं की, त्यांनी या आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता. संतोष देशमुख यांच्या हत्येचे छायाचित्र प्रसिद्ध झाले. त्यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. जर कुणाची अशी निर्घुण हत्या करणाऱ्यांना साथ असेल असे निष्पन्न होत असेल तर ते दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे,” असे त्यांनी म्हटले. Eknath Khadse on Dhananjay Munde | पुढे एकनाथ खडसे म्हणाले की, “नैतिकता दाखवत राजीनामा देण्याचं प्रकरण माझ्या बाबतीत घडलं होतं. वास्तविक पाहता माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नव्हता. मी काही ती जमीन घेतली नव्हती किंवा आजही घेतलेली नाही. फक्त साधी मीटिंग घेतली म्हणून नैतिकतेच्या आधारावर मला राजीनामा द्यावा लागला होता. नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घ्यायचं म्हटलं तर या मंत्रिमंडळातील एकही सदस्य राहू शकणार नाही. त्यांच्याकडे नैतिकता शिल्लकच राहिलेली नाही. त्यामुळे आपल्याला इतके दिवस वाट बघावी लागली,” असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. धनंजय मुंडेंचे ट्वीट “बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद्विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे,’ असे धनंजय मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हंटले आहे. हेही वाचा: औरंगजेबावरील विधानामुळे राज्यात खळबळ! एकनाथ शिंदेची संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले,’अबू आझमी देशद्रोही…’