जळगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाचे तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी या प्रकरणी भाजपवर टीकेची झोड उठवत बडगुजर यांना प्रवेश देऊन भाजप आता पवित्र झाल्याचा टोला हाणला आहे. एकनाथ खडसे यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला. खडसे म्हणाले, सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता पवित्र झाली आहे. नाथाभाऊंना भाजपमध्ये प्रवेश देत असताना त्याच्यावर आक्षेप घेतला गेला. त्यांना भाजपमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.माझ्या प्रवेशामुळे भाजप त्यावेळी फार अपवित्र होत होती. पण आता या सर्वांना प्रवेश देऊन भाजप पवित्र झाली आहे, असे ते म्हणाले. खडसे यांनी यावेळी भाजपच्या कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे विश्वासू गिरीश महाजन यांच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे. फडणवीस व महाजन या दोघांनीच आपल्या भाजप प्रवेशाला विरोध केल्याचे खडसे यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.