पुणे- पुण्यातील कोरेगाव पार्क येथील ४० एकर जमिनीच्या कथित गैरव्यवहाराने राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ कंपनीने ही जमीन १८०० कोटींच्या बाजारभावाऐवजी केवळ ३०० कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आणि त्यावर केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप आहे. या अनियमिततेनंतर राज्य सरकारने चौकशी सुरू केली असून, पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारु यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कारवाईचे आदेश देत वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी थेट मागणी केली आहे की, या व्यवहाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा. माजी महसूलमंत्री असलेल्या खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही जमीन ‘महार वतनाची’ असून, तिच्या खरेदीसाठी महसूल आयुक्तांची परवानगी आवश्यक होती, जी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे हा व्यवहार तत्काळ बेकायदा ठरवून रद्द करावा. कंपनीचे भागभांडवल केवळ एक लाख असताना ३०० कोटींचा निधी कुठून आला, याचीही चौकशी व्हावी, असे त्यांनी म्हटले आहे. खडसे यांनी पुढे सांगितले की, सरकार आपल्याच सहकाऱ्याच्या मुलाची पारदर्शक चौकशी करेल, अशी अपेक्षा नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी हायकोर्टाच्या न्यायाधीशांकडून करण्यात यावी. “फडणवीस यांनी ज्या अजित पवारांवर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते, त्यांच्या मुलावर सरकार कारवाई करेल अशी अपेक्षा ठेवणं व्यर्थ आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. या गंभीर आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, अजित पवार यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.