Archery | बर्निंग ट्रेनमधून वाचले आणि पदकविजेते बनले

कोलकाता – डेहराडूनकडे निघालेल्या शताब्दी एक्सप्रेसला लागलेल्या आगीतून वाचलेल्या मध्य प्रदेशच्या ज्युनिअर तिरंदाजी संघातील आठही खेळाडूंनी राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत विविध गटात पदके पटकावली आहेत.
शताब्दी एक्सप्रेसला लागलेल्या आगीतून केवळ दैव बलवत्तर म्हणून हे खेळाडू बालंबाल बचावले. त्यावेळी घाबरलेले आठ खेळाडू बोगीतून उडी मारल्यामुळे आश्चर्यकारकरीत्या वाचले. मात्र, त्यांच्या कागदपत्रांची या घटनेत होळी झाली.
जन्म तारखेचा दाखला, आधार कार्ड यासह अन्य महत्वाची कागदपत्रे नष्ट झाली. मात्र, तरीही आयोजकांनी या खेळाडूंना रिकर्व्ह तिरंदाजी प्रकारात सहभाग घेण्याची परवानगी दिली व या खेळाडूंनी या संधीचे सोने करताना चार पदके जिंकली.
या संघात सहा पुरूष तर दोन महिला खेळाडूंचा सहभाग होता. या खेळाडूंचे प्रशिक्षक रीचपाल सिंग यांनी अभिनंदन करतानाच त्यांच्या जिद्दीला सलामही केला.





