पिंपरी(प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणि करोनामुक्त झालेल्या आठ रुग्णांना सोमवारी घरी सोडण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश रोकडे यांनी दिली.
हे रुग्ण पिंपळे गुरव, पिंपळे निलख आणि पुणे आदी परिसरातील होते. चौदा दिवसांच्या उपचारानंतर या रुग्णांचे दोन्ही वेळेचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडले. त्यामध्ये एका दहा वर्षाच्या मुलाचा देखील समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 457 संशयित रुग्णांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये 40 रुग्ण करोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. 40 रुग्णांपैकी एकूण 19 जण बरे झाले. तर, 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
5 जणांना सिम्बोयसिस रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सध्या 9 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर, नव्याने 13 नवीन संशयित रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉ. किरण खलाटे, डॉ. शर्मिला गायकवाड यांच्यासह अन्य डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भगवान काकणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष देशपांडे यांच्या नियंत्रणाखाली रुग्णांवर उपचार करण्यात आले.