सांगली -सांगली जिल्ह्यात शनिवारी आणखी आठ जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 334 झाली आहे. तर शनिवारी सहा जण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एका राजकीय नेत्याचा अहवालदेखील करोना पॉझिटिव्ह आला आहे. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील एक ब्रदर पॉझिटिव्ह आल्याने सिव्हिलमधील वॉर्ड सील करण्यात आले आहेत. या ब्रदरच्या संपर्कात आलेल्यांचे क्वारंटाइन करण्यात येत आहे. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये मणदूर ता. शिराळा येथील 100 वर्षाचा वृद्ध, 28 वर्षाची महिला, कोकरूड ता. शिराळा येथील 36 वर्षाचा पुरुष, शेटफळे ता. आटपाडी येथील 28 वर्षाची महिला व 9 वर्षाची मुलगी. बुधगाव ता. मिरज येथील 75 वर्षाचा पुरुष, दुधोंडी ता. पलूस येथील 60 वर्षाचा पुरुष यांचा समावेश आहे. तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. कदमवाडी ता. कवठेमहांकाळ येथील 50 वर्षाची महिला, शिराळा येथील 52 वर्षाची महिला, मणूदर ता. शिराळा येथील 54 वर्षाचा पुरुष व 58 वर्षाची महिला, निंबवडे ता. आटपाडी येथील 58 वर्षाचा पुरुष आणि मौजे डिग्रज ता. मिरज येथील 56 वर्षाची महिला या सहा जणांनी करोनावर मात केली आहे. करोनाबाधितांमध्ये आटपाडी 34, जत 19, कडेगाव 25, कवठेमहांकाळ 13, खानापूर 19, मिरज 18, पलूस 16, शिराळा 112, तासगाव 13, वाळवा 50 आणि महापालिका क्षेत्रातील 15 जणांचा समावेश आहे.