लोणी काळभोर-येथील ग्रामपंचायत हद्दीत चार तर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत एक असे पाच करोनाबाधित रुग्ण शुक्रवार (दि. 17) आढळून आले आहेत.
पूर्व हवेलीत शुक्रवारी दिवसभरात लोणी काळभोर (4), कदमवाकवस्ती (1). उरुळी कांचन (1), मांजरी बुद्रुक (1), आळंदी म्हातोबाची (1), शेवाळेवाडी (3), फुरसुंगी (1) व बिवरी (1) या आठ ग्रामपंचायत हद्दीत आठ करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती लोणी काळभोरचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी दिली. तर लोणी काळभोर कोविड केअर सेंटरमधून शुक्रवारी दिवसभरात 99 स्वॅब तपासणीसाठी पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत पाठवले.
लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्यास वीस दिवसांपूर्वी करोनाची लागण झाल्यापासून पूर्व हवेलीत सातत्याने करोनाचे नवनवीन रुग्ण आढळून येत आहेत. वरील दोन्ही ग्रामपंचायत हद्दीत मागील वीस दिवसांच्या कालावधीत साठहून अधिक करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
- लॉकडाऊनचा फज्जा
जिल्हाधिकारी कार्यालयाने पुणे शहरासह पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडी व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत मंगळवार (दि. 14) पहाटेपासून लॉकडाऊन जाहीर केला आहे. शहरात लॉकडाऊन काळात नागरिक घराबाहेर पडत नाहीत मात्र या चारही ग्रामपंचायत हद्दीत लॉकडाऊनचा फज्जा उडाला आहे.