पुणे | गणेशोत्सवासाठी आठशे बस धावणार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुण्याचा गौरवशाली गणेशोत्सव पाहण्यासाठी विविध शहर, राज्यांसह परदेशातून भाविक पुण्यात येतात. त्या वेळी शहरातील रस्त्यांवर होणाऱ्या गर्दीमुळे भाविक पीएमपी बसने अधिक प्रवास करतात.
त्यामुळे भाविकांना तात्काळ बससेवा मिळावी, यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) गणेशोत्सवातील दहा दिवस ७९० जादा बसचे नियोजन केले आहे. या दहा दिवसात पीएमपीची बससेवा रात्रभर सुरू राहणार आहे. मात्र, रात्रीच्या या सेवेसाठी प्रवाशांना पाच रुपये जादा आकार द्यावा लागणार आहे.
लाडक्या गणरायाचे आगमन येत्या ७ सप्टेंबरला होत आहे. त्यानंतर भाविकांची गर्दी हळूहळू वाढू लागते. त्यामुळे यंदा पीएमपीकडून दि. ९ ते १७ सप्टेंबर दरम्यान पुण्यातील भाविकांना तात्काळ बससेवा उपलब्ध व्हावी, या दृष्टीने ७९० जादा बस मार्गावर सोडण्यात येणार आहे.
त्यापैकी नऊ, दहा आणि १६ सप्टेंबर रोजी १६८ जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. गौरी विसर्जन झाल्यानंतर देखावे पाहण्यासाठी शहरात गणेशभक्तांची मोठी गर्दी होते. उपनगर आणि इतर भागांतून मोठ्या संख्येने गणेश भक्त येतात.
त्यांच्या सोयीसाठी ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान ६२० बस जादा पीएमपीकडून मार्गावर सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पिंपरी- चिंचवड परिसरातून देखील जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत.
यासाठी पीएमपीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. तरी प्रवाशांनी जास्तीत जास्त बसचा वापर करावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
फुकट्यांच्या शोधासाठी तपासणी
गणेशोत्सवात पीएमपी बसला मोठी गर्दी असते. त्याचा फायदा घेऊन काही प्रवाशी विनातिकीट प्रवास करतात. त्याला आळा घालण्यासाठी पीएमपीकडून विभागवार ठिकठिकाणी तपासणीसाठी तिकीट चेकरची पथके तैनाथ केली आहेत, अशी माहिती पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी दिली.





