पिंपरी | अनधिकृत होर्डिंगविषयी मनसेचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहरात 16 अनधिकृत होर्डिंग उभे आहेत. यासंदर्भात कारवाई करण्याबाबत लोणावळा शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोणावळा नगरपरिषदेला निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्यापी कोणत्याही स्वरूपाची कारवाई झालेली नाही.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत घडलेल्या होर्डिंग अपघात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून पुन्हा एकदा त्या निवेदनाच्या संदर्भात स्मरणपत्र नगरपरिषदेला देण्यात आले आहे. नगरपरिषदेकडून पुढील आठ दिवसांत शहरातील अनधिकृत होर्डिंग कारवाई बाबत लेखी उत्तर मिळाले नाही तर नगरपरिषदेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
लोणावळा नगरपरिषद उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी यांच्याकडे स्मरणपत्र देण्यात आले. या वेळी अध्यक्ष भारत रमेश चिकणे, वाहतूक सेना अध्यक्ष निखिल भोसले, लोणावळा शहर उपाध्यक्ष दिनेश कालेकर, सुनील भोंडवे संघटक अभिजीत फासगे, विभाग अध्यक्ष अजिंक्य बोभाटे, निलेश लांडगे, संदीप बोभाटे, सनी पाटेकर उपस्थित होते.
भारत चिकने यांनी ऑगस्टमध्ये लोणावळा नगरपरिषदेकडे शहरातील होर्डिंग बाबतची माहिती मागितली होती. त्यावेळी नगरपरिषदेने दिलेल्या माहितीमध्ये शहरात सात होर्डिंगची परवानगी एक वर्षासाठी दिली होती. तो कालावधी आता संपला असून ते होर्डिंग सध्याच्या स्तिथीत अनधिकृत असल्याचे आणि त्या ठिकाणी अजून अनधिकृत १६ होर्डिंग असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.
होर्डिंगमुळे घडत असलेले अपघात आणि त्यात नागरिकांना गमवावे लागत असलेले जीव बघता लोणावळा शहरात एखादा अपघात घडल्यावर प्रशासनाला जाग येणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.





