कैरो, (इजिप्त) : जगातील सर्वात मोठ्या संग्रहालयाचे आज इजिप्तमध्ये उद्घाटन करण्यात आले. हे संग्रहालय उभारण्यासाठी तब्बल दोन दशकांचा कालावधी लागला असून या संग्रहालयामुळे देशाच्या पर्यटन उद्योगाला अधिक चालना मिळेल, अशी आशा आहे. तीन पिरॅमिड आणि जगप्रसिद्ध स्फिंक्स असलेल्या गिझा पठारावर हे संग्रहालय इजिप्तच्या संस्कृतीला दर्शवणारे असणार आहे. राजधानी कैरोपासून जवळच असलेल्या या संग्रहालयामध्ये इजिप्तच्या पुरातन संस्कृतीशी संबंधित तब्बल ५० हजार कलाकृती सादर केल्या आहेत. जगभरातील अनेक देशांचे राजे, राष्ट्रप्रमुख आणि सरकारचे प्रमुख नेते या संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार असल्याची माहिती इजिप्तच्या अध्यक्षांच्यावतीने देण्यात आली. हे संग्रहालय म्हणजे देशाची संस्कृती आणि जीवनमानाचे दर्शन घडवणारे एक ऐतिहासिक वारसा स्थळ असणार असल्याचे अध्यक्षांच्या कार्यालयाने म्हटले आहे. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल अल-सिसी यांनी २०१४ मध्ये पदभार स्वीकारला, तेंव्हापासूनच त्यांनी या भव्य संग्रहालय उबारणीच्या कामाला प्रारंभ केला होता. देशाच्या अर्थकारणाला अनेक वर्षांपासून आलेली आणि २०११ च्या अरब स्पिंग उठावानंतर आणखी वाढलेली मरगळ दूर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी मोठी गुंतवणूक केली होती. या संग्रहालयाची उभारणी फारसा गाजावाजा न करता केली गेली. गेल्या दोन आठवड्यांपासून हे संग्रहालय बंद ठेवले गेले होते. त्यापुर्वी फारच थोडे पर्यटक येथे भेट देऊन गेले होते. संग्रहालयाचा आजूबाजूचा आणि गिझा पिरॅमिडच्या परिसराचे नूतनीकरण करण्यात आले. कैरोच्या पश्चिमेला ४० मिनिटांच्या अंतरावर स्फिंक्स आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आला आहे. या संग्रहालयासाठीच्या सुविधांसाठी १ अब्ज डॉलर खर्च करण्यात आला. प्रत्यक्ष बांधकामाला २००५ मध्ये सुरुवात झाली मात्र राजकीय अस्थिरतेमुळे या बांधकामात वारंवार अडथळे आले होते. जवळच्या पिरॅमिडच्या प्रतिकृतीचे दर्शन घडवणाऱ्या या संग्रहालयाचा परिसर तब्बल २४ हजार चौरस मीटरवर पसरला आहे. सहा मजले इमारतीत, प्रमुख नेत्यांचे पुतळे, पर्यटकांसाठी पिरॅमिड बघण्यासाठी पूल, १२ मुख्य गॅलरी, रोमन काळातील वास्तूकला, शिल्पकला आणि रहाणीमानाची जिवंत दर्शन पर्यटकांना घडणार आहे. तुतानखामूनचा संग्रह हा संग्रहालयाचा उत्कृष्ट नमुना आहे, असे इजिप्तचे सर्वात प्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पुरातन वास्तूंचे माजी मंत्री जाही हवास म्हणाले.