नवी दिल्ली – मका आणि सोयाबीनच्या किमती परिस्थितीजन्य कारणामुळे बर्याच वाढल्या आहेत. त्याचबरोबर पोल्ट्री उद्योगासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत सध्या देशातील बर्याच शहरात अंड्याचा दर प्रति नग आठ रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. मात्र एकूण परिस्थिती पाहता नजीकच्या काळात अंड्याचा दर कमी होण्याची शक्यता नसल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. प्रोटीनयुक्त अन्नाचे दर एकूणच वाढत आहेत. डिसेंबर आणि जानेवारीच्या दरम्यान भारतामध्ये सर्वच क्षेत्रात तपमान कमी होते. या कालावधीत अंड्याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. शाळा आणि महाविद्यालयाची वसतीगृहे आणि हॉटेलातही अंड्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे या कालावधीत अंड्याच्या किमती काही प्रमाणात जास्त असतात. मात्र यावर्षी सोयाबीन आणि मक्याचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर परवडत नसल्यामुळे देशातील बर्याच पोल्ट्री बंद झाल्या आहेत. त्यामध्ये छोट्या पोल्ट्रीची संख्या जास्त आहेत. पुन्हा अंड्याचे उत्पादन वाढविण्यासाठी अचानक प्रयत्न करता येत नाहीत. त्यामुळे बराच काळ अंड्याचे दर उच्च पातळीवर राहू शकतात असे समजले जाते.