भविष्यात ‘एटीपी 500’ स्पर्धेचे महाराष्ट्रात आयोजन करण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री फडणवीस

पुणे : श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. टाटा ओपन टेनिस स्पर्धेचे आयोजन यापुढेही महाराष्ट्रातच करण्यात येईल. या स्पर्धेस पुढील पाच वर्षे राज्य शासनाचे आर्थिक सहकार्य असेल आणि भविष्यात एटीपी 500 स्पर्धेचे महाराष्ट्रात आयोजन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, खेळाच्या विकासाप्रती शासनाची कटिबद्धता आहे. राज्यातील पुण्यासह 9 शहरात महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याने सर्वाधिक पदके मिळविली आहेत. शासन प्रत्येक शहरात खेळासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. त्यामुळे भविष्यात राज्यातून चांगले खेळाडू घडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
येत्या काळात राज्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामुळे खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. आज खेळ सुनियोजित पद्धतीने खेळला जात असल्याने त्यासाठी प्रशिक्षण, प्रशिक्षक, शारीरिक क्षमतेची गरज आहे.
Pune : भिडे वाड्यासाठी शासनाची भूमिका न्यायालयात प्रभावीपणे मांडावी
यादृष्टीने आवश्यक वातावरण आणि सुविधा खेळाडूंसाठी निर्माण करण्यात येत आहेत. बालेवाडी येथे पहिले क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येत आहे. यातून खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





