Uddhav Thackeray – शिवसेनेची स्थापनाच भूमीपुत्रांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी झाली आहे आणि महाराष्ट्राचा भूमीपुत्र मराठी आहे. आपण आपल्या परंपरागत चाललेल्या गोष्टी करत येथे राहत आलेलो आहोत. पण हल्ली या परंपरागत गोष्टी नाहिशा होत चालल्या आहेत. तोच एक मुद्दा घेऊन फडणवीस सरकार महाराष्ट्रातून मराठी संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. ससून डॉकच्या जागेविषयी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सध्या वाद सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवालय कार्यालय येथे कोळी बांधवांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत आणि आमदार सचिन अहिर हेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, आता शिवसेना तुमच्यासोबत आली आहे आणि तुमच्यासाठी आम्ही मैदानात उतरली आहे. परंतु काही दिवसांनी ज्यांच्यासाठी आम्ही मैदानात उतरलोय तेच गायब झाले, असं होऊ देऊ नका. एकत्र रहा आणि एकजुटीने रहा. शिवसेनाप्रमुख बोलले होते की, अन्यायावरती तुटून पडा, पण मी म्हणेन की, अन्याय करणाऱ्याला अन्यायासकट तोडून टाका, असा इशारा त्यांनी दिला.