पिंपरी (प्रतिनिधी) – महापालिका प्राथमिक शाळांचा पट वाढविण्यासाठी मुख्याध्यापकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. शाळांचा सध्या 35 हजार 632 इतका पट आहे. खासगी शाळांतील काही विद्यार्थी महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेणार असल्याने हा पट वाढणार आहे. महापालिकेच्या 105 प्राथमिक शाळांमध्ये विविध सुविधा दिल्या जात आहेत. प्रामुख्याने मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच अन्य शालेय साहित्य दिले जाते.
गणित लॅब, स्मार्ट टीव्ही, शैक्षणिक ऍप, शैक्षणिक वेबसाइटच्या माध्यमातुन गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी निश्चित कालबद्ध कार्यक्रम राबविला जाणार आहे. याबाबतची माहिती महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांकडून ऑनलाइन दिली जात आहे. त्यामुळे महापालिका शाळांचे वाढते महत्त्व अधोरेखित केले जात आहे.
खासगी शाळांनी 15 टक्के शैक्षणिक शुल्क माफ केलेले नाही. तसेच, ऑनलाइन शिक्षणही योग्य पद्धतीने न मिळाल्याने पालकांमध्ये नाराजी आहे. परिणामी, खासगी शाळांतील विद्यार्थी देखील महापालिका शाळांकडे वळू लागले आहे. 13 जून रोजी शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा नेमका हजेरीपट किती वाढतो, त्यावरून नव्याने किती विद्यार्थी संख्या वाढली, हे समजू शकणार आहे. सध्या महापालिकेच्या पहिली ते आठवीच्या वर्गात एकूण 35 हजार 632 इतकी विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे.
शाळांसाठी आवश्यक पूर्वतयारी सुरू
शहरामध्ये शाळा 13 जूनपासुन सुरू होणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक पूर्वतयारी सध्या जोरात सुरू आहे. सोमवारी (दि. 13) शाळेच्या पहिल्या दिवशी आयुक्त राजेश पाटील यांच्यासह विविध अधिकारी, प्रशासन अधिकारी, कर्मचारी, विषय तज्ज्ञ, दिव्यांगांचे शिक्षक यांच्यामार्फत 35 ते 40 शाळांना भेट देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, पाठ्यपुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळावे, असे नियोजन केले आहे, अशी माहिती सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान यांनी दिली.