पुसेगाव, (प्रतिनिधी)- मनुष्याच्या जीवनात वृक्षांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. माणसाच्या तिन्ही मूलभूत गरजा पुरवणारं निसर्गाचं देणं म्हणजे वृक्ष. याची जाण ठेवून फक्त वृक्षारोपण न करता वृक्षसंवर्धन, त्यांचे पालन, संरक्षण यासाठीही प्रयत्न करणं आवश्यक आहे, असे मत पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त हभप शिवाजी महाराज मोरे यांनी केले. पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्यावतीने आयोजित श्री सेवागिरी व्याख्यानमालेत ‘संत परंपरेतून पर्यावरण रक्षण’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव,बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोरे म्हणाले, “वृक्षांचे महत्त्व संतांनीही जाणले होते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा संत तुकारामांचा अभंग निसर्गप्रेमाचे उत्तम उदाहरण आहे. यात पर्यावरणवाद त्यांनी समर्पकपणे सादर केला आहे. वृक्ष हे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेले, निसर्गान मानवाला दिलेले अमृत वरदान आहे. वनचरे व पक्षी यांनाही अन्न, वस्त्र,निवारा देणारे तसेच कसलाही भेदभाव न करता सर्वांना समभावनेने अंगाखांद्यावर खेळवणारे, वृक्ष हे केवळ मानवच नव्हे, तर सर्व सजीवांचे जीवनदायी तत्त्व आहेत. भारतीय संस्कृतीत अशा प्रकारचे वृक्षप्रेम अनादी कालापासून आहे, तसेच त्याचे संवर्धन करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. भारतीय सण, उत्सव आदींमधूनही वृक्षांना अधिष्ठान प्राप्त आहे. वृक्ष भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान मिळवून असल्याचे त्यांनी सांगितले. रणधीर जाधव यांनी प्रास्ताविक केले. विश्वस्त संतोष जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले. संतोष वाघ यांनी आभार मानले.