औंध : औंध येथे झालेल्या महारोजगार मेळाव्यामुळे परिसरातील हजारो युवकांना रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. बेरोजगार युवक-युवतींच्या कुटुंबांना उभारी देणे, हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ध्येय आहे. यापुढेही सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही औंध संस्थानच्या अधिपती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्यावतीने औंध येथील हर्षिताराजेराजे इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये झालेल्या महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मनीषा फडतरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मनोज देशमुख, योगेश फडतरे, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, शुभम शिंदे, रोजगार मेळाव्याचे समन्वयक श्रीराम सातपुते, दीपक नलवडे, उद्धव माने, संतोष शिंदे, इलियाज पटवेकरी, श्रीपाद सुतार, तानाजी इंगळे, प्रदीप कणसे, संजय निकम, सचिन शिंदे, हणमंत देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. गायत्रीदेवी म्हणाल्या, आज सर्वच क्षेत्रांमध्ये युवतींचा वाढता सहभाग कौतुकास्पद आहे. यापुढे महिलांना काम मिळावे म्हणून वेगवेगळे उपक्रम, योजना राबविण्यात येणार आहेत. हणमंतराव शिंदे म्हणाले, औंध संस्थानने नेहमीच दातृत्व दाखवले आहे. त्या काळी उद्योगपती किर्लोस्कर, ओगले यांना संस्थानातील जागा आणि आर्थिक मदत देऊन, उद्योगधंदे वाढण्यासाठी प्रयत्न केले गेले. तोच वारसा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधींनी जोपासला आहे. आज सर्व क्षेत्रात औंधचा विकास झाला आहे, हे त्याचेच द्योतक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळातही उद्योगधंद्यांच्या उभारणीसाठी प्रयत्न केला जाणार आहे. मनोज देशमुख म्हणाले, राष्ट्रहित प्रथम हे अजित पवार गटाचे ध्येय आहे. जगातील अनेक देशांमध्ये सर्वांत तरुण देश म्हणून आपला देश ओळखला जातो. जास्तीत जास्त क्षेत्रांमध्ये तरुणाईच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. सुलभा जगदाळे यांनी प्रास्ताविक केले. प्रमोद राऊत आणि श्रीपाद सुतार यांनी सूत्रसंचालन केले. अनिल इनामदार यांनी आभार मानले. 45 कंपन्यांचा सहभाग या मेळाव्यात राज्यातील 45 कंपन्यांचा सहभाग होता. मेळाव्यासाठी सुमारे सात हजार सुशिक्षित बेरोजगारांशी संपर्क साधण्यात आला होता.