पुणे – बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर केंद्र सरकारने नुकतीच बंदी घातली आहे. यंदा तांदळाचे उत्पादन कमी होणार आहे. भाव नियंत्रित राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक बाजारपेठेत या निर्णयाचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. परदेशातील भारतीयांनी तांदुळ खरेदी करण्यास गर्दी केली आहे.
याविषयी दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया म्हणाले, अमेरिका आणि कॅनडामध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. भारत सरकारचा निर्णय तिकडे पोहोचताच तेथील मॉलमध्ये तांदूळ खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली. नागरिकांनी रांगा लावून तांदूळ खरेदी करायला सुरुवात केली. त्यामुळे स्थानिक नागरिकांची उत्सुकता वाढली आणि त्यांनीही तांदूळ खरेदी सुरू केली. त्यामुळे अमेरिका आणि कॅनडामध्ये तांदूळ खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे.
सोनामसुरी खरेदी करणाऱ्या एका अनिवासी भारतीयाने खरेदी पावती सोशल मीडियावर टाकून दिली. नऊ किलोंसाठी त्याने सुमारे 47 डॉलर मोजल्याचे पावतीवरून दिसते. भारताने बिगर बासमती तांदळावर बंदी घातल्याचे एक प्रमुख कारण म्हणजे, देशाअंतर्गत उपलब्धता अधिक व्हावी व भाव वाढू नयेत, शिवाय 2023 ची तांदूळ उत्पादन तूट गेल्या 20 वर्षांतील सर्वाधिक असल्याचे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे.
जागतिक तांदूळ निर्यात बाजारापेठेत सध्या भारत नंबर एकवर आहे. भारताचा सुमारे 40 टक्के वाटा आहे. तांदूळ उत्पादनातही भारत चीननंतर दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे. युक्रेन युद्ध आणि चीन-पाकिस्तानातील खराब हवामानाचा फटका तेथील उत्पादनाला बसला आहे. पाकिस्तानात तांदूळ उत्पादन 31 टक्क्यांनी घटणार असल्याचा अमेरिकी कृषी विभागाचा अंदाज आहे.
तांदळाचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने देशांतर्गत बिगर बासमती तांदूळ अर्थात, सर्वसामान्यांना लागणारा मसुरी, सोनामसुरी, कोलम, आंबेमोहर, इंद्रायणी या तांदळाच्या दरवाढीवर अंकुश येणार आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारपेठेतील सध्याची स्थिती पाहता चिंतेचे वातावरण दिसते. धुव्वाधार पावसामुळे पंजाब आणि हरियानातील 1509 तांदळाचा भाव क्विंटलला हजार रुपयांनी वाढला आहे. पण ही स्थिती फार काळ राहणारी नाही, असेच म्हणावे लागेल.
कारण, सध्या सर्व राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले असले, तरी तो भात पिकांसाठी अनुकूलच आहे. जुलै, ऑगस्टमध्ये भातलावणी होत असते. तसेच, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये नवीन हंगाम सुरू होतो, तेव्हा तांदळाचे भाव कमी होतील, असे जाणकारांचे मत आहे. बिगर बासमती तांदळावरील निर्यातबंदीमुळे बासमती तांदळाची निर्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व बासमती तांदळाच्या दरात वाढ झाली आहे.
भारतीय तांदळाला जगभरातून प्रचंड मागणी असते. यंदा त्यामध्ये वाढच झाली आहे. या वर्षी भारतातही बासमती आणि बिगर बासमती तांदळाच्या मागणीने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे बासमती व बिगर बासमती तांदळाचे देशांतर्गत भावही उच्चांकी पातळीवर गेले आहेत, असे दि पूना मर्चंटस चेंबरचे अध्यक्ष आणि तांदळाचे व्यापारी राजेंद्र बाठिया म्हणाले.
प्रतिक्विंटलचे भाव
बासमती (अख्खा) – 11000 ते 12500 रुपये
मसुरी तांदूळ – 3500 ते 3700
कोलम – 5500 ते 6000
सोनामसुरी – 4700 ते 5000
आंबेमोहर – 8000 ते 85