महागाईचा शेअर निर्देशांकावर परिणाम; वाहन, बांधकाम क्षेत्रासह सर्वच क्षेत्राचे निर्देशांक घसरले

मुंबई – परदेशातील परिस्थिती नकारात्मक असताना भारतातील किरकोळ किमतीवर आधारित महागाई 14 महिन्याच्या उच्चांकावर गेल्याची आकडेवारी जाहीर झाली. त्यानंतर शेअर बाजार निर्देशांक पुन्हा कोसळले.
सध्या शेअर बाजाराचे निर्देशांक चार महिन्याच्या निचांकावर आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार अस्वस्थ झाले आहेत. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 984 अंकांनी कोसळून 77,690 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 324 अंकांनी म्हणजे 1.36 टक्क्यानी कोसळून 23,559 अंकावर बंद झाला.
महिंद्रा, टाटा स्टील, अदानी, जेएसडब्ल्यू स्टील, इंडसइंड बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक या कंपन्यांचे शेअर कोसळले तर टाटा मोटर्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एशियन पेंट्स, इन्फोसिस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली. मात्र त्यामुळे निर्देशांकांना आधार मिळू शकला नाही.
जीओजीत वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले की, परदेशी संस्थागत गुंतवणूकदाराकडून एकतर्फी विक्री चालू असताना महागाई वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली. त्यामुळे रिझर्व बँक आता व्याज दरात कपात करणार नाही अशी भावना गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाली. अमेरिका आपले पत धोरण जाहीर कसे करते, भारतासोबत अमेरिकेचे आर्थिक संबंध कसे राहतील याबद्दल गुंतवणूकदारांच्या मनात शंका निर्माण झाल्या आहेत.
ऑक्टोबर महिन्यात महागाई वाढून 6.21% इतकी झाली आहे. स्मॉल कॅप व मिड कॅप जवळजवळ 3 टक्क्यांनी कोसळले. बांधकाम आणि वाहन क्षेत्रासह सर्वच क्षेत्राचे निर्देशांक कोसळल्यामुळे निर्देशांकांना कसलाही आधार मिळू शकला नाही. बांधकाम क्षेत्राचा निर्देशांक 3.23 टक्क्यांनी, भांडवली वस्तू क्षेत्राचा निर्देशांक 2.72 टक्क्यांनी, सेवा क्षेत्राचा निर्देशांक 2.54 टक्क्यांनी, धातू क्षेत्राचा निर्देशांक 2.54 टक्क्यांनी कोसळला. शेअर बाजारावर नोंदलेल्या 3,299 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली तर केवळ 670 कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ होऊ शकली.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री चालूच
भारतीय कंपन्यांच्या शेअरचे भाव जास्त असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात विक्री करून चिनी शेअर बाजारात खरेदी करीत आहेत. त्यातच महागाई वाढल्यानंतर या गुंतवणूकदारांनी विक्री जास्तच वाढविली आहे. बुधवारी या गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 3,024 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली असल्याची आकडेवारी जारी करण्यात आली.





