पुणे – शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन आहे, असे मानणाऱ्या डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागात शिक्षणाची दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिली. त्यांनी कधीही गुणवत्तेशी तडजोड केली नाही. अनेक विद्यार्थ्यांचे जीवन घडवून डॉ. कदम यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती केली, असे मत भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी व्यक्त केले. भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त मध्यवर्ती कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात “विचारभारती’च्या डॉ. पतंगराव कदम विशेषांकाचे प्रकाशन करताना ते बोलत होते. यावेळी सहकार्यवाह व. भा. म्हेत्रे, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील, विचार भारतीचे संपादक प्रा. मिलिंद जोशी, लेखाधिकारी ऐश्वर्या हर्डीकर, भारती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष बी. बी. कड, वसंतराव माने, अरुंधती निकम उपस्थित होते. डॉ. पतंगराव कदम यांनी केवळ संस्था उभ्या केल्या नाहीत, तर माणसे उभी केली, असे सांगत प्रा. जोशी म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी शिक्षणाची गंगा समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत नेण्यासाठी भारती विद्यापीठाची स्थापना केली. डॉ. कदम यांची ध्येयनिष्ठा, अविश्रांत परिश्रम, गुणवत्तेचा ध्यास आणि दूरदृष्टी यामुळे भारती विद्यापीठाच्या यशाचा आलेख सतत उंचावत राहिला. विद्यापीठाने गेल्या 58 वर्षांत देशाच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विकासात दिलेले योगदान मोलाचे आहे. डॉ. आप्पासाहेब पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठाच्या धनकवडी आणि एरंडवणे शैक्षणिक संकुलात प्राचार्य, प्राध्यापक, अधिकारी वर्ग व शिक्षकेतर सेवक यांनी डॉ. पतंगराव कदम यांना अभिवादन केले.