शैक्षणिक : फक्त पाठीवर ओझे!
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे (School Bag) काही केल्या कमी होत नाहीये. सरकारी उपयायोजना लागू करूनदेखील फारसा काही फरक पडलेला नाही. विद्यार्थ्यांना पाठीवरील हे ओझे कायमच वाहावे लागणार, असे दिसते.

– पांडुरंग म्हेत्रे
School Bag : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे (School Bag) काही केल्या कमी होत नाहीये. सरकारी उपयायोजना लागू करूनदेखील फारसा काही फरक पडलेला नाही. विद्यार्थ्यांना पाठीवरील हे ओझे कायमच वाहावे लागणार, असे दिसते.
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्याने प्रत्येक परीक्षेत असामान्य यश मिळवावे अशी अपेक्षा सामान्य झाली आहे. ज्ञानात भर पडावी म्हणून विविध विषयांची पुस्तके, वह्या, संदर्भसाहित्य आणि इतर शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना दररोज शाळेत घेऊन जावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे (School Bag) वजन दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
ज्ञानाच्या ओझ्यापेक्षा दप्तराचे ओझे पेलणे विद्यार्थ्यांना अशक्य होत आहे. परिणामी त्यांच्या आरोग्यासाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. त्या अनुषंगाने दप्तराचे वजन नक्कीच कमी झाले पाहिजे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने काही उपाययोजना केल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे ही लहान वयातील मुलांच्या आरोग्यासाठी एक समस्या बनली आहे. दप्तराच्या जास्त वजनामुळे लहान मुलांच्या खांद्यांवर आणि स्नायूंवर ताण येतो. पाठदुखी, मानदुखी असा त्रास होतो. चुकीच्या पद्धतीने जड दप्तर पाठीवर वाहिल्यास मणक्यांवर अतिरिक्त दबाव पडून मणक्याचा त्रास होतो. शाळेत ये-जा करताना लवकर थकवा येतो आणि ऊर्जा कमी होते.
शारीरिक अस्वस्थता आणि थकवा यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण होते. विद्यार्थ्यांच्या एकूणच शारीरिक विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा सर्व बाबींचा विचार करून शालेय शिक्षण विभागाने नुकत्याच मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. या सूचना केंद्र सरकारच्या School Bag Policy 2020 या तत्त्वानुसार आहेत. आपल्या राज्यात याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्या दिलेल्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शरीराच्या वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असा नियम शासन स्तरावर व शासकीय मार्गदर्शक सूचनांनुसार स्पष्ट करण्यात आला आहे. इयत्ता सहावी व आठवीसाठी वर्षातून दहा दप्तरविरहित दिवस ठेवण्याची कल्पना असून त्यादिवशी अनुभवावर आधारित आणि प्रत्यक्ष कृतीवर आधारित शिक्षण देण्याचा विचार आहे; परंतु त्याला अनेक मर्यादा येत असल्यामुळे त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होईलच हे ठामपणे सांगता येत नाही.
शासकीय निर्णयानुसार शाळांनी वेळापत्रकाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. रोजची आवश्यक असणारी पुस्तके व वह्याच मुलांच्या दप्तरात असाव्यात, त्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शाळेने वर्गनिहाय वेळापत्रकाचे योग्य नियोजन करून दप्तराचे (School Bag) वजन कमी करण्याची जबाबदारी घ्यावी. शाळा व्यवस्थापनाला शक्य असल्यास डिजिटल साधनांचा वापर करावा.
शाळांमध्ये साहित्यासाठी सुरक्षित कपाटे उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शाळेने वेळापत्रकानुसार संबंधित दिवशी आवश्यक असलेलीच पुस्तके व वह्या आणण्याच्या सूचना द्याव्यात. वह्यांची संख्या व आकार मर्यादित ठेवावा. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वेळोवेळी वजन तपासावे आणि ते त्यांच्या वयाच्या व वजनाच्या मानाने योग्य आहे का हे पाहावे. त्यासाठी शाळेत डिजिटल वजन काटा ठेवण्याची शिफारस यापूर्वी प्रशासनाने केली आहे. विद्यार्थ्यांना गृहपाठ देताना अनावश्यक वह्या पुस्तकांची घरी ने-आण होणार नाही याची काळजी घ्यावी.
दुसरी बाजू पाहता दप्तराचे ओझे कमी करण्यात शाळेची भूमिका महत्त्वाची असली तरी या कामात शाळेलाही काही मर्यादा येतात. काही विषयांसाठी स्वतंत्र पुस्तके, कार्यपुस्तिका, सराव पुस्तिका असल्यामुळे दप्तराच्या वजनावर नियंत्रण ठेवणे अशक्य होते. नियमित स्वाध्याय, वर्गकार्य, गृहपाठ असल्यामुळे विद्यार्थ्यांना वह्या शाळेत आणाव्या लागतात.
विज्ञान, गणित, चित्रकला, हस्तकला, कार्यानुभव या विषयांसाठी लागणारे आवश्यक साहित्य शाळेत नेणे अपरिहार्य ठरते. शिवाय प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांची पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध असतेच असे नाही.
प्रत्येक विद्यार्थ्याची गरज व विषयानुसार असलेले साहित्य यात वेगळेपण येते. डिजिटल शिक्षणाचा वापर करण्यासाठी आवश्यक असणारी साधने, इंटरनेट सुविधा प्रत्येक विद्यार्थ्याकडे व शाळेकडे उपलब्ध नसते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालकाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. दप्तराच्या वजनाबाबत पालकांनीही दक्ष असणे आवश्यक आहे.
विद्यार्थी रोज बॅग भरण्याचा कंटाळा करतात तर कधी सर्व वह्या, पुस्तके घेऊन शाळेत जातात. म्हणून मुलाने दप्तरात अनावश्यक पुस्तके, वह्या, खेळणी किंवा इतर वस्तू ठेवलेल्या नाहीत याची तपासणी करावी. विशेष करून आठवी ते बारावीच्या वर्गातील मुलांच्या दप्तराची तपासणी दररोज करावी. दुसर्या दिवसाच्या वेळापत्रकानुसार फक्त आवश्यक साहित्यच दप्तरात (School Bag) आहे याची काळजी घ्यावी. मुलासाठी हलके, योग्य आकाराचे आणि खांद्यांवर व्यवस्थित बसणारे दप्तरच निवडावे.
शाळेची गुणवत्ता मोठी पुस्तके, जास्त वह्या, अधिक गृहपाठ यावर ठरत नसून आनंदी वातावरणात कृतीतून मिळणारे शिक्षण अधिक प्रभावी ठरू शकते. दप्तराचे वजन हे केवळ पुस्तकांचे ओझे नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर आणि आनंदी बालपणावर परिणाम करणारे ओझे आहे. त्यामुळे दप्तराचे वजन कमी करण्यासाठी शाळा, शिक्षक आणि पालकांनी एकमेकांच्या समन्वयाने नियोजन केल्यास दप्तराचे ओझे निश्चितच कमी होईल.






