प्रभात वृत्तसेवा पिंपरी – राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांसाठी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या तिसऱ्या टप्प्यास शासनाने मान्यता दिली आहे. १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानामध्ये विविध स्तर आणि वर्गवारीमध्ये विजेत्या शाळांना एकूण ७२ कोटी २२ लाख रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. या अभियानासाठी राज्यातील शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, अशा दोन वर्गवारीत करण्यात येणार आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ही वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. हे अभियान बृहन्मुंबई महापालिका कार्यक्षेत्र, वर्ग अ आणि वर्ग ब च्या महापालिकांचे कार्यक्षेत्र, तसेच उर्वरित महाराष्ट्र अशा स्तरावर राबविले जाईल. पूर्वतयारीसाठी २४ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ हा कालावधी असणार आहे.अभियानातंर्गत शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण, विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमांमधील तसेच व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग, शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम, शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम अशा विविध बाबींचा समावेश असेल. या बाबींच्या आधारे शाळांनी केलेल्या या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. क्रीडा प्रबोधिनीने पटकावला होता द्वितीय क्रमांक.. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्यामध्ये महाराष्ट्रातील १० हजारांपेक्षा जास्त शाळांनी सहभाग नोंदविला होता. या अभियानाच्या माध्यमातून शाळांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थ्यांच्या संवर्धनासाठीचे उपक्रम, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या सक्रिय विकासात सहभाग घेण्यासाठी घेतलेले उपक्रम, सामाजिक बांधिलकीचे उपक्रम असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये विद्यार्थी शिक्षकांनी उस्फूर्त प्रतिसाद दर्शवला. शहरातून महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी या शाळेने द्वितीय क्रमांक पटकावला होता. त्यावेळी शाळेला १५ लाखांचे बक्षीस मिळाले होते. कसे होणार मूल्यांकन? -स्पर्धेतील शाळांना पायाभूत सुविधा – ३८ गुण -शासन ध्येयधोरण अंमलबजावणीसाठी – १०१ गुण -शैक्षणिक संपादणुकीसाठी – ६१ गुण -एकूण – २०० गुण या अभियानात त्या शाळांचा विचार केला जाणार नाही.. मागील वर्षीच्या टप्पा-१ किंवा टप्पा-२ मध्ये प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकासाठी शाळेचा विचार केला जाणार नाही. ३१ डिसेंबरला मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाचा कालावधी पूर्ण होईल. १ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत मूल्यांकनाची प्रक्रिया होईल. स्पर्धेत अशी आहेत पारितोषिके -तालुका स्तर : तीन, दोन आणि एक लाख रुपयांची तीन पारितोषिके, -जिल्हा स्तर : साडेअकरा लाख आणि तीन लाख रुपयांची पारितोषिके. -महापालिका स्तर : २१ लाख १५ लाख आणि ११ लाख रुपयांची पारितोषिके.