– प्रा. डॉ. गजानन र. एकबोटे अमेरिकेतील महाविद्यालये आणि विद्यापीठे हेच उच्च शिक्षणावरील अमेरिकन जनतेचा विश्वास कमी होण्यास मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहेत, असे येल विद्यापीठाच्या समितीने नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. येल विद्यापीठाच्या तज्ज्ञ समितीने तयार केलेल्या अहवालामध्ये, अमेरिकेतील महाविद्यालयांच्या आणि विद्यापीठांच्या घसरत्या दर्जाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. येल अहवालात, शैक्षणिक क्षेत्रात राजकीय व सांस्कृतिक शक्तींच्या वाढत्या भूमिकेचे कठोर चित्रण केले आहे. अमेरिकेतील उच्च शिक्षणाचे स्थान सध्या झपाट्याने बदलत आहे. उच्च शिक्षणाचा वाढता खर्च, अस्पष्ट व गुंतागुंतीची प्रवेश प्रक्रिया, असमान शैक्षणिक निकष आणि कॅम्पसमधील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव या सर्व कारणांमुळे उच्च शिक्षणाच्या उपयुक्ततेबद्दल अमेरिकेत असंतोष वाढत आहे, असे समितीने नमूद केले आहे. या निष्कर्षांमुळे अनेक वर्षांच्या सर्वेक्षण व मुलाखतींमध्ये अमेरिकन लोकांनी व्यक्त केलेल्या शंकांचे/भीतीचे प्रतिबिंब दिसते. अत्यंत प्रतिष्ठित येल विद्यापीठातील दहा प्राध्यापकांच्या समूहाने तयार केलेला हा अहवाल अमेरिकेतील शैक्षणिक क्षेत्रावर कठोर टीका करतो. अहवालात म्हटले आहे की, विश्वास म्हणजे आपण जे सांगतो ते कृतीत आणून आणि ते चांगल्या प्रकारे करून दाखविणे. उच्च शिक्षणाच्या मूलभूत उद्दिष्टांबद्दल अमेरिकन विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनिश्चितता आणि अस्पष्टता असल्यामुळे उच्च शिक्षण संस्थांवरील अमेरिकन जनतेचा विश्वास कमी होत आहे. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी मदत करण्याबाबत विद्यापीठांवर दबाव येत आहे, असे नमूद करताना समितीने म्हटले आहे. निवडक परंतु सर्वसमावेशक, परवडणारी परंतु चैनीची/आलिशान, आणि गुणवत्ताप्रधान परंतु न्याय्य अशी ‘प्रत्येकासाठी’ असण्याची मोठी आणि विचित्र अपेक्षा विद्यापीठांकडून केली जात होती. मात्र, उद्दिष्टे आणि ध्येये स्पष्ट नसल्यास, महाविद्यालये व विद्यापीठे आपल्या मूलभूत बांधिलकीला कितपत न्याय देत आहेत? हे ठरवणे कठीण होते, असे मत प्राध्यापकांनी व्यक्त केले. बहुतेक अमेरिकन शिक्षण संस्था येलसारख्या संस्थांपेक्षा खूप वेगळ्या आहेत, जिथे आर्थिक मदतीशिवाय पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा अंदाजित वार्षिक खर्च 90 हजार डॉलर्सपेक्षा जास्त असतो. अनेक संस्थांमधील प्रशासक, ज्यापैकी बहुतांश संस्थांचा खर्च खूपच कमी आहे आणि अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देतात, त्यांच्या संस्था निवडक विद्यापीठांशी अन्यायकारकपणे जोडलेल्या आहेत. या सर्वसाधारण समजुतींमुळे सध्या विद्यापीठांमधील अभ्यासक्रम, विद्यापीठांना करदात्यांचा पाठिंबा आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उच्च शिक्षण व्यवस्थेवर केलेल्या टीकेसंबंधी अमेरिकेत जोरदार चर्चा सुरू आहे. अमेरिकेतील उच्च शिक्षण (संग्रहित छायाचित्र) अमेरिकेत विद्यापीठे आणि महाविद्यालयांबाबतचे मतभेद आणि विवाद नवीन नाहीत. मात्र, समितीने सांगितले आहे की सध्याच्या काही पद्धतींच्या एकत्रित परिणामामुळे शैक्षणिक क्षेत्राची प्रतिमा वेगाने घसरली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये फक्त 35% अमेरिकन लोकांनी महाविद्यालयीन शिक्षण अत्यंत महत्त्वाचे मानले. हे प्रमाण 2013 च्या तुलनेत निम्मे आहे. 2013 मध्ये हे प्रमाण सुमारे 70% होते. ट्रम्प प्रशासनाने उच्चभ्रू विद्यापीठांवर टीका केल्यानंतर आणि विद्यापीठांना देण्यात येणार्या निधीमध्ये कपात सुरू केल्यानंतर, येलने हा अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले. येलचे अध्यक्ष मॉरी मॅकॅनिस यांनी सांगितले की, शैक्षणिक खात्याच्या नेत्यांनी लोकांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची गरज आहे. या अहवालात उच्च शिक्षणाच्या उद्दिष्टांचे कौतुक केले असले, तरी येलसह अनेक संस्थांनी त्यांच्याविषयी असलेला जनतेचा दृष्टिकोन नकारात्मक कसा होत गेला? याबाबत स्पष्टपणे मांडले आहे. उदाहरणार्थ, येल आणि इतर अनेक संस्था प्रचंड फी आकारतात, पण नंतर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रत्यक्षात कमी पैसे भरतात. तरीही या चुकीच्या धोरणामुळे त्यांच्यावरील जनतेचा विश्वास कमी झाला आहे. ही प्रणाली गुंतागुंतीची, अनिश्चित, गुप्त आणि नेहमी बदलणारी आहे. त्यामुळे जनतेचा विद्यापीठांवर विश्वास वाढण्याऐवजी कमी होतो, असे अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख डॉलरपेक्षा कमी आहे, त्यांना पदवीपूर्व शिक्षण शुल्क आकारले जाणार नाही. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 1 लाख डॉलरपेक्षा कमी आहे, त्यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे येलने जानेवारीमध्ये जाहीर केले होते. पदवीपूर्व प्रवेश प्रक्रिया चांगल्या हेतूने सुरू केल्या असल्या तरी, अनेकदा अपारदर्शक आणि गुंतागुंतीच्या असतात, हे लक्षात घ्या. कारण श्रीमंत विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकतील अशीच अनुकूल परिस्थिती असते. शैक्षणिक कामगिरीसारख्या मूलभूत बाबींसाठीही त्यात सुस्पष्ट मानकांचा पूर्णपणे अभाव असतो. येल ही अशा संस्थांपैकी एक आहे जिथे किमान चाचणी गुणांची देखील अट नाही. जेव्हा प्रवेश प्रक्रिया अनाकलनीयपणे अधिक वाईट आणि आधीच सधन असलेल्यांना फायदा होईल अशा प्रकारे पक्षपाती वाटतात, तेव्हा अनेक अमेरिकन नागरिक या प्रक्रियेवर विश्वास ठेवत नाहीत. एकंदरीत अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणाची परिस्थिती पारदर्शक नाही. अमेरिकेत महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये श्रीमंतांना अनुकूल अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य पालकांचा विद्यापीठे आणि उच्च शिक्षणावरील विश्वास कमी होत चालला आहे.