Editorial : इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल या लष्करी संघर्षाला (Editorial) आता एक महिना पूर्ण होत आला आहे. या तीन देशांचा सहभाग असलेले युद्ध प्रामुख्याने इराण, इस्रायलच्या भूमीवर आणि आखातातील काही देशांच्या भूमीवर लढले जात असले तरी त्याच ताकदीचे दुसरे एक युद्ध अफवांच्या माध्यमातून लढवले जात आहे. या महिन्याभराच्या कालावधीमध्ये (Editorial) युद्धाच्या बातम्यांमुळे माध्यमांना ब्रेकिंग न्यूजचा मोठा मसाला मिळाला. यानिमित्ताने खरे किंवा खोटी याची फारशी खात्री न करतासुद्धा बातम्या पुढे येत गेल्या. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म्सने तर या निमित्ताने संधीच साधली आणि अफवांचा अक्षरशः बाजारच मांडला. इस्रायलचे सर्वेसर्वा बेंजामिन नेतान्याहू यांचा मृत्यू झाल्याची अफवा असो किंवा इराणचे नवे प्रमुख मोजतबा यांचासुद्धा हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची बातमी असो किंवा तेलाच्या जहाजांचा प्रवास यावरून निर्माण झालेल्या विविध अफवा असो, माध्यमांनी अशा प्रकारच्या चुकीच्या बातम्यांना प्राधान्य देऊन समाजमन अस्वस्थ करण्याचेच काम केले. या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम अप्रत्यक्षपणे सर्व जगावर झाला तो म्हणजे इंधनाचा विस्कळीत पुरवठा. साहजिकच भारतासह सर्वच देशांना इंधनाचा तुटवडा जाणवणार हे गृहीत होते. अर्थात, गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये अजूनही भारतात फारशी बिकट परिस्थिती निर्माण झालेली नाही. पेट्रोल आणि डीझेलचे भावही वाढवण्यात आले नाहीत. Middle East War: फक्त प्रीमियम पेट्रोलच्या दरामध्ये काही प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. पण समाज माध्यमांनी पेट्रोल, डीझेलचेही दर अफवांच्या माध्यमातून अजून वाढवून ठेवले होते. त्यातच आता पेट्रोल आणि डीझेल संपल्याच्या अफवा पसरू लागल्याने पेट्रोल पंपांवरच्या रांगाही वाढू लागल्या आहेत. खरेतर गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डीझेल या इंधनाच्या पुरवठ्यावर आणि त्याच्या विक्रीवर कोणताही परिणाम झाला नव्हता. एखाद्याच पेट्रोल पंपावर इंधन संपल्यामुळे पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला असावा. पण गेल्या दोन दिवसांच्या कालावधीमध्ये आता पेट्रोलची प्रचंड टंचाई अशा प्रकारच्या अफवाही पसरू लागल्या आहेत. अशा युद्धाच्या परिस्थितीमध्ये भविष्यकाळात काहीही होऊ शकते या भीतीने सर्वसामान्य नागरिक नेहमीच साठवणूक करण्याच्या मानसिकतेत असतोच. त्यातूनच स्वयंपाकाचा गॅस असो अथवा पेट्रोल डीझेल असो त्याची साठवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढला होता. नेहमीच्या सर्वसाधारण मागणीपेक्षा अनेकपट मागणी या कालावधीमध्ये वाढली होती. त्याचा परिणाम थेटपणे इंधन पुरवठा साखळीवर होणे गृहीतच होते. अनेक वेळा साठेबाज अशा परिस्थितीचा फायदा करून घेऊन नफा मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक टंचाईच्या अफवा पसरवतात आणि काळा बाजारांमध्ये इंधन भरमसाठ दराने विकतात असेही अनुभव यापूर्वी आले आहेत. साहजिकच अफवांच्या या बाजारामध्ये नक्की कोणाचा फायदा होत आहे हे सर्वसामान्य नागरिकांनीसुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अर्थात, सरकारनेसुद्धा आपली जबाबदारी टाळता कामा नये. इंधनपुरवठ्याबाबत आणि इंधनाच्या उपलब्धतेबाबत जे काही तथ्य आहे ते दररोज नागरिकांच्या समोर येणे अत्यंत आवश्यक आहे. कोविड महामारीच्या कालावधीमध्ये दररोज दुपारी तीन वाजता केंद्रातील आरोग्य विभागाचे अधिकारी पत्रकार परिषद घेऊन देशातील महामारीची परिस्थिती काय आहे याबाबत निवेदन करत असत. त्यामुळे त्या काळामध्ये अफवांवर बर्यापैकी नियंत्रण बसले होते. आता या युद्ध परिस्थितीमध्ये सुद्धा भारतापुरता विचार करायचा झाल्यास केंद्रातील अधिकार्यांनी दररोज योग्य प्रकारचे निवेदन करून वस्तुस्थिती देशासमोर मांडायला हवी. केवळ प्रशासकीय अधिकार्यांचे हे काम आहे असे नाही तर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही विशेषतः सत्ताधारी नेत्यांनी आपापल्या भागातील मतदारांपर्यंत वास्तव परिस्थिती पोहोचवणे आवश्यक आहे. एखादी समस्या अस्तित्वात नसतानासुद्धा केवळ घबराटीच्या परिस्थितीमुळे ती समस्या निर्माण होते असे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये इंधन पुरवठ्याबाबत कोठेही समस्या निर्माण झाल्याचे लक्षात येत नव्हते. पण आता जर अशा अफवा (Editorial) तीव्र स्वरूपात पसरू लागल्या तर विनाकारणच घबराटीची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्याचा थेट फटका अर्थव्यवस्थेला आणि पुरवठा साखळीला बसू शकतो. हा अफवांचा बाजार आणि हे अफवांचे युद्ध थांबवण्यासाठी खरी परिस्थिती आणि वस्तुस्थिती काय आहे हे सरकारकडून लोकांपर्यंत पोहोचवणे हीच आता प्राधान्याची गोष्ट मानावी लागेल. जमिनीवरील खर्या युद्धापेक्षाही हे अफवांचे युद्ध जास्त भीषण, भयानक आणि नुकसानकारक असू शकते ही बाब आता गांभीर्याने लक्षात घ्यावी लागेल.