Election : देशातील पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार राज्यांमध्ये तसेच आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (Election) मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता 4 मे रोजी होणार्या मतमोजणीची वाट पाहिली जात आहे. भारतासारख्या मोठ्या देशात सतत कोणत्या ना कोणत्या राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होतच असते. पण यावेळी ज्या राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे, ती राज्ये अत्यंत महत्त्वाची असल्याने देशातील आगामी राजकीय दिशा ठरवण्यासाठी या निवडणुकींचा (Election) निकालही महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः पश्चिम बंगाल राज्यातील मतदारांनी कोणता कौल दिला आहे हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. आसाम आणि बंगाल वगळता इतर कोणत्याही राज्यामध्ये भाजपाचा फारसा प्रभाव नसल्याने केरळ, तामिळनाडूमध्ये भाजपची सत्ता येईल अशी सध्या तरी चिन्हे दिसत नाहीत. पण गेल्या विधानसभा निवडणुकीपासून भाजपाने पश्चिम बंगालवर लक्ष केंद्रित केले आहे आणि 70 पेक्षा जास्त जागा जिंकून आपले अस्तित्व दाखवून दिले होते. आता या निवडणुकीमध्ये (Election) आपण बहुमत पार करू असा विश्वास भाजपच्या नेत्यांना वाटत आहे, तर गेली अनेक वर्षे पश्चिम बंगालमध्ये राज्य करणार्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीसुद्धा या निवडणुकीमध्ये कसून संघर्ष केला आहे. Election पंधरा वर्षांच्या सत्ताधारी कारकिर्दीनंतर मतदारांमध्ये नाराजी निर्माण होणे किंवा सरकारविरोधी वातावरण निर्माण होणे साहजिक असते. त्याचा फटका यावेळी आपल्याला बसू शकतो याची काही प्रमाणात जाणीवही ममता बॅनर्जी यांना आहे. पण आपल्याला सत्तेपासून बाजूला करण्याइतपत यश भाजपाला मिळेल असे ममता बॅनर्जी यांना वाटत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकेकाळी या राज्यात सत्तेवर असलेले कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची ताकद या राज्यामध्ये नगण्य आहे. साहजिकच या राज्यामध्ये फक्त भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशीच लढत आहे. निवडणुकीच्या आधी राज्यामध्ये मतदार याद्यांची जी पुनर्रचना मोहीम हाती घेण्यात आली त्याचा काही परिणाम निकालावर होतो का हे पाहणेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या कित्येक विधानसभा निवडणुकांचा विचार करता यावेळी प्रथमच 90% पेक्षा जास्त मतदान झाले आहे ही बाबसुद्धा लक्षणीय ठरणार आहे. मतदार याद्यांमध्ये नव्यानेच नावे दाखल केलेल्यांनी प्रथमच मतदान केले असेल, तर त्यांनी कोणाच्या पारड्यात मत टाकले हेसुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या अकरा वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांना देशात सर्वात जास्त विरोध करण्याचे काम ममता बॅनर्जी यांनीच केले होते. केंद्रातील प्रत्येक योजनेला त्यांनी कडाडून विरोध केला होता. मोदी यांना पर्याय म्हणूनच ममता बॅनर्जी यांच्या चेहर्याकडे विरोधी पक्ष पाहू लागले होते. या पार्श्वभूमीवर सुद्धा ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाने सत्ता राखली तर केंद्रीय पातळीवरसुद्धा ममता बॅनर्जी यांचे महत्त्व वाढणार आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायचीच या रणनीतीने निवडणुकीच्या (Election) मैदानात उतरणार्या भाजपाच्या नेत्यांनी या निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणतीही कसर बाकी ठेवली नव्हती. सर्व आघाडीचे नेते प्रचारासाठी मैदानात उतरले होते. ममता बॅनर्जी यांच्यावर कडक शब्दात टीका करत असतानाच केंद्रातील सरकार काय करू शकते याची आमिषेही दाखवण्यात आली होती. गेल्या काही वर्षांमध्ये देशांमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये निवडणूक यंत्रणेचा गैरवापर करूनच भाजपाने यश मिळवल्याचे नॅरेटिव्ह सेट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये हे मतदान झाले आहे. मतदार यादी पुनर्रचना असो किंवा सुरक्षा दलांचा वापर असो किंवा निवडणुकी यंत्रणांचा वापर असो या मुद्द्यांचा वापर करून भाजपाने निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही शस्त्रे वापरली अशी चर्चा आतापासूनच केली जात आहे. आता मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणुकीचे निकाल जेव्हा हाती येतील, त्यानंतरच राजकीय पक्षांच्या निश्चित प्रतिक्रिया काय असतील हे समजणार आहे. ममता बॅनर्जी यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व एका बाजूला आणि भाजपासारखा रणनीतीने निवडणूक लढणारा पक्ष एका बाजूला यांच्यातील राजकीय संघर्षात सर्वसामान्य मतदारांनी कोणाच्या पारड्यात कौल टाकला आहे हे 4 मे रोजी समजणार आहे. निवडणूक निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये शांतता कायम राहो, अशी आशा करायला हरकत नाही.