Keir Starmer : ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान आणि लेबर पार्टीचे नेते कीर स्टार्मर (Keir Starmer) यांच्या विरोधात पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात वातावरण निर्मिती झाल्याने त्यांच्यावर पंतप्रधानपद सोडण्याचा दबावही वाढत चालला आहे. या निमित्ताने ब्रिटनमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या अस्थिरतेची प्रक्रिया अधिकच गडद होताना दिसत आहे. खरेतर गेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर काँजर्व्हेटीव्ह पक्षाचा पराभव करून कीर स्टार्मर (Keir Starmer) यांच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीने दीर्घकाळानंतर पुन्हा एकदा सत्ता मिळवली होती व सर्वसामान्य ब्रिटिश नागरिकांच्या मनातही काही आशा आकांक्षा प्रज्वलित झाल्या होत्या. मात्र, आज दोन वर्षांनंतर पंतप्रधान स्टार्मर यांच्या निष्क्रिय कारकिर्दीची अनेक उदाहरणे समोर येत असल्याने ब्रिटनमध्ये अस्वस्थता आणि अस्थिरता वाढत चालली आहे. भारतीय लोकशाहीपेक्षा वेगळे राजकारण करणार्या ब्रिटनमध्ये कदाचित क्वचितच अशा प्रकारची अस्वस्थता पाहायला मिळते. पण गेल्या दहा-पंधरा वर्षांत ही अस्वस्थता आणि अस्थिरता वाढत चाललेली दिसते. गेल्या 5 ते 6 वर्षांच्या कालावधीमध्ये ब्रिटनने तेवढ्याच संख्येचे पंतप्रधान बघितले. बोरीस जॉन्सन यांच्यासारख्या कॅज्युअल अॅप्रोच असणार्या पंतप्रधानानंतर कोणत्याही पंतप्रधानाला पाच वर्षे पूर्ण करता आले नाहीत. Keir Starmer लिझ ट्रस, टेरेसा मे किंवा ऋषी सुनक यांनीसुद्धा अल्पकाळच आपली कारकीर्द गाजवली. ऋषी सुनक पंतप्रधान असतानाच ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. पण सुनक यांच्या नेतृत्वाखाली काँजर्व्हेटीव्ह पक्षाला निवडणूक जिंकता आली नाही आणि ब्रिटिश (Keir Starmer) जनतेने पुन्हा लेबर पार्टीकडे सत्ता सोपवली. पण कीर स्टार्मर यांना गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये कोणताही प्रभाव दाखवता आलेला नाही. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लेबर पार्टीचा झालेला दारुण पराभव हा अखेरचा घाव ठरला आणि लेबर पार्टीमधीलच अनेक संसद सदस्य आणि स्टार्मर यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी स्टार्मर यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मते व्यक्त केली आहेत. स्टार्मरबाबत निश्चितच अविश्वासाची भावना तयार झाली आहे. जरी त्यांनी थेट राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली नसली तरी स्टार्मर यांनी आपण पदावरून कधी उतरणार आहोत याचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी मात्र जोर धरत आहे. ब्रिटिश लोकशाहीतील नियमाप्रमाणे 20% पेक्षा जास्त संसद सदस्यांनी जर मागणी केली तर पंतप्रधान पदावरील व्यक्तीला आपल्या नेतृत्वाचा फेरविचार करावा लागतो. या परिस्थितीमध्ये संबंधित नेत्याने राजीनामा दिला नाही तर पर्याय उभा करून निवडणूक घेतली जाते आणि जी व्यक्ती निवडून येईल त्याला पंतप्रधानपद दिले जाते. स्टार्मर यांनी अद्यापही आपल्या राजीनाम्याचे वेळापत्रक जाहीर केले नसल्याने आगामी कालावधीमध्ये लेबर पार्टीमध्ये अधिकच अस्वस्थता वाढू शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की अनेक वर्षांनंतर प्रथमच ब्रिटनमध्ये दोनपेक्षा जास्त पक्षांचे राजकारण सुरू झाले आहे. खरे तर ब्रिटनमध्ये पूर्वापार लेबर पार्टी विरुद्ध काँजर्व्हेटीव्ह पार्टी अशीच लढत असायची. लिबरल पार्टीसारखे एक-दोन छोटे पक्ष निवडणुकीच्या रिंगणात असायचे. पण त्यांचा कोणताही प्रभाव निवडणुकीच्या राजकारणावर नसायचा. पण गेल्या काही दिवसांपासून यूके रिफॉर्म आणि ग्रीन या नावाच्या दोन राजकीय पक्षांनी ब्रिटनमध्ये आपला प्रभाव वाढायला सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यूके रिफॉर्म या राजकीय पक्षाने अत्यंत चांगली कामगिरी केल्यामुळेच लेबर पार्टीमध्ये अस्वस्थता वाढली आहे. वृत्तवाहिन्यांनी आणि माध्यमांनी केलेले सर्वेक्षण पाहता पंतप्रधान स्टार्मर यांची लोकप्रियता झपाट्याने कमी होत आहे आणि त्याचा परिणाम लेबर पार्टीच्या लोकप्रियतेवरही होऊ लागला आहे. आतापर्यंत फक्त काँजर्व्हेटीव्ह पक्षासोबत लढत देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरणार्या लेबर पार्टीसाठी आता यूके रिफॉर्म आणि ग्रीन यासारख्या नवीन राजकीय पक्षांचा प्रभावही आव्हानात्मक वाटू लागला आहे. त्यातूनच पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी स्टार्मर यांना बाजूला करण्याची मोहीम सुरू झाली आहे. इतर जागतिक अर्थव्यवस्था झपाट्याने वाढत असताना ब्रिटिश अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. विद्यमान सरकारने अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. बेरोजगारी वाढत आहे, महागाईवर नियंत्रण नाही. सर्वसाधारण नागरिकांच्या मनात विद्यमान सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. आता जर मध्यावधी निवडणूक झाली तर लेबर पार्टीला यश मिळणार नाही असेच सर्व कल आणि कौल सांगतात. साहजिकच ह्या परिस्थितीमध्ये पंतप्रधान स्टार्मर यांना बाजूला करून त्यांच्या जागी अन्य एखाद्या प्रभावशाली नेत्याची नियुक्ती करण्याचा विचार लेबर पार्टीमध्ये सुरू आहे. अनेक इच्छुकांनी आपली फिल्डिंग लावली असली तरी जोपर्यंत स्टार्मर स्वतःहून राजीनामा देत नाहीत किंवा आपण पदावरून कधी उतरणार आहोत याचे वेळापत्रक जाहीर करत नाहीत तोपर्यंत ब्रिटनमधील ही अस्थिरता आणि अस्वस्थता कायमच राहणार आहे. अर्थात, नजीकच्या कालावधीमध्ये कधी ना कधी ब्रिटनमध्ये (Keir Starmer) सत्ता बदल होणे अपरिहार्य आहे. पण जो कोणी नेता नव्याने ब्रिटनची सत्ता हातात घेईल त्याला ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा गाडा रूळावर आणण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.