बांगलादेशातील कट्टरवाद्यांनी ढाक्यातील भारतीय उच्चायुक्तालयावर मोर्चा काढला. शेख हसीना यांचे प्रत्यार्पण करण्याच्या मागण्या करतानाच भारतविरोधी घोषणा दिल्या गेल्या. काही तास अगोदरच त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकार्याने चमत्कारिक दावा केला. बांगलादेश मुक्ती संग्रामात भारतीय लष्कराने बजावलेल्या भूमिकेबद्दलच त्यांनी शंका उपस्थित केली. आमच्या लोकांनीच आमचा देश मुक्त केला, असे त्यांचे म्हणणे होते. फेब्रुवारी महिन्यात त्या देशात निवडणुका होणार आहेत. त्याचाच हा परिणाम आहे. बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारताच्या विरोधात सौम्य आवाजात जी कुजबूज व्हायची त्याची जागा आता गदारोळ आणि निदर्शनांनी घेतली आहे. आतापर्यंत तेथील सत्तेबाहेरचे घटक विशेषत: जिहादी गट भारताच्या विरोधात बोलत असत. आता सरकारमधील घटकही बोलू लागले आहेत. हा निवडणुकीच्या राजकारणात शिरकावाचा एक भाग आहे. एका पक्षाच्या नेत्याने भारताच्या ईशान्येकडील राज्यांना ज्यांना भारतात सात भगिनी म्हणून अथवा सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखले जाते त्यांना भारतापासून तोडण्याची दर्पोक्ती केली आहे. भारताने अद्याप यावर कोणतीही मोठी प्रतिक्रिया अथवा इशारा दिलेला नाही. सौम्यपणे ज्या स्तरावर जे समजावून सांगायचे आहे ते सांगितले आहे. मालदीवबाबतचा पूर्वानुभव जमेस असल्यामुळे भारताला बांगलादेशात असे होणे अपेक्षित आहे. पण ज्या बांगलादेशाच्या मुक्तीसाठी भारताने निर्णायक भूमिका बजावली, ज्या बांगलादेश मुक्ती युद्धाचा विजय दिन भारतात अभिमानाने साजरा केला जातो, ज्या बांगलादेशच्या मुक्ततेसाठी इतक्या वर्षांनंतरही भारताचे फिल्ड मार्शल माणेकशॉ यांची आणि देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रशंसा केली जाते, त्यांना दुर्गा संबोधले गेले त्या बांगलादेशीयांना भारताबद्दल अचानक एवढा तिरस्कार निर्माण होण्याचे कारणच काय? पाकिस्तान सतत भारताला पाण्यात पाहतो ते सगळे समजू शकतात. पाकिस्तानचे स्वत:चे काही नव्हते. जे काही मिळाले होते किंवा आहे ते त्यांनी आपलेच ओरबाडून घेतले आहे. तथापि, बांगलादेशींना ते बंगाली आहेत म्हणून पाकिस्तानकडून होणार्या अत्याचारापासून भारताने मुक्त केल्यावरही ते भारताविरुद्ध विषच ओकत असतील तर हा प्रकार सर्वसामान्य भारतीयांना चक्रावणारा आहे. अर्थात, त्यात फार गंभीर व्हावे अशी आज स्थिती नाही. मात्र, भविष्यात तसे होऊ नये याची दक्षताही घ्यावी लागणार आहे. भारतविरोधी जनभावना निर्माण होण्याच्या कारणांपैकी असलेले प्रमुख कारण म्हणजे तेथील राजकारण. सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाला त्रास देण्याची तेथील परंपरा आहे. तशी ती सगळीकडेच असते. मात्र, येथे संघर्षाचा प्रकार रक्तरंजित वगैरे असतो. शेख हसीना सलग तिसर्या टर्मसाठी सत्तेवर होत्या. त्यांनी बांगलादेशात जे काही केले ते भारताच्या सांगण्यावरून अथवा भारताच्या पाठबळावरूनच केले असा समज सध्या तेथील लोकांचा करून देण्यात आला आहे. विशेषत: त्यांनी कट्टरवाद्यांना जे वेसण घातले त्याचा राग कट्टरवाद्यांच्या गटांकडून आता काढला जातो आहे. तशी संधी त्यांना आता मिळाली आहे. पलायन केल्यानंतर हसीना यांनी भारतातच आश्रय घेतल्यामुळे हा समज आणखी दृढ झाला. बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्या खालिदा झिया यांची प्रकृती गंभीर आहे तर मुलगा परदेशात आहे. अशा स्थितीत जे फुटकळ पक्ष पाच टक्के मतांपर्यंत जेमतेम मजल मारू शकत होते ते आणि त्यांचे कथित नेते उधळले आहेत. शेख हसीना यांच्याकडून झालेल्या कथित दडपशाहीच्या विरोधात जनमत एकत्रित करण्यासाठी भारताचा वापर केला जातो आहे. मालदीवमध्येही असेच घडले होते. निवडणुकांच्या वेळी विरोधात असलेल्या मोहम्मद मोइज्जू यांनी भारतावर गरळ ओकण्यास सुरुवात केली. त्यांच्या देशातील तत्कालीन सरकार भारताकडे कसे झुकले आहे हाच त्यांनी प्रमुख मुद्दा बनवला आणि एवढ्यावरच न थांबता ‘इंडिया आउट’चा नाराही दिला. आपण जास्तीत जास्त चीनधार्जिणे असण्याचा आणि दिसण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. त्यावेळीही भारताने सबुरीचेच धोरण स्वीकारले. मोइज्जू यांचे सरकार आल्यावर त्यांनीच भारतासोबत संबंध सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला आणि आज जवळपास पहिल्यासारखीच स्थिती आहे. बांगलादेशच्या संदर्भातही चीनचा एक पैलू आहेच. तेथील विद्यमान सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूसही चीनच्या संदर्भात जास्तच स्नेह दाखवण्याच्या प्रयत्नात फार पुढे निघून गेले. वास्तविक युनूस राजकारणात आउटसाइडर आहेत. त्यांना राजकारणात भविष्य नाही, मात्र, त्यांनी भारताच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संमती दर्शवून देशाचे नुकसानच केले. चीनसोबतच पाकिस्तानबद्दल त्यांचे ममत्व विशेष दिसून आले. वास्तविक आपण अगोदर बंगाली आहोत मग मुसलमान आहोत यातूनच त्याकाळी संघर्ष सुरू झाला होता आणि पाकिस्तानचा भाग असलेल्या आताच्या बांगलादेशींच्या पूर्वजांना त्रास आणि अत्याचार सहन करावा लागला होता. त्याच बांगलादेशात आता ते अगोदर मुसलमान आहेत आणि नंतर बंगाली असे ठसवले जात आहे किंवा त्यांनी ठसवून घेतले असून त्यातूनच भारताला खलनायक म्हणून रंगवण्याचा प्रयत्न होतो आहे. शेख हसीनांच्या राजवटीबाबत तेथील विरोधकांचे लाख आक्षेप असू शकतात, मात्र त्यांनी कट्टरपंथीयांना, दहशतवाद्यांना तोडले होते. त्या कट्टरवाद्यांना आता पुन्हा संधी दिसत आहे. त्याची परिणती म्हणूनच भारतीय उच्चायुक्तालयावर काढलेल्या मोर्चाकडे पाहता येईल. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, सध्या जो काही भारतविरोधी प्रचार सुरू आहे ती राजकीय भूमिका आहे व ती पुढच्या दिवसांत आणखी वाढलेली दिसेल. त्यावर भारताने फार आक्रमक होण्याची गरज नाही. बांगलादेशातील राजकीय नेत्यांना चीनधार्जिणा अथवा पाकधार्जिणा दिसण्याची किंवा भासवण्याची आवश्यकता वाटत असेल. त्यातून कदाचित ते सत्तेपर्यंत पोहोचूही शकतील, मात्र परिस्थिती फार काळ सारखी राहात नाही. बदल होतो, मालदीवमध्ये झाला, श्रीलंकेत झाला आणि नेपाळमध्येही झाला.