मतचोरीच्या विषयावर पुन्हा एकदा जोरकसपणे आवाज उठवण्यासाठी काँग्रेसने दिल्लीत रामलीला मैदानावर एक प्रचंड रॅली आयोजित केली. रॅलीला झालेली गर्दीही मोठी होती आणि त्यात झालेली भाषणे काँग्रेसचा पीळ अजून कायम आहे हे दर्शवणारी होती. नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडी यांचा जो दारूण पराभव झाला त्यातून काँग्रेस नामोहरम झाली असेल, असे भासले होते. गेले काही दिवस काँग्रेसच्या वाट्याला सातत्याने पराभवामागून पराभव येत आहेत, नुसतेच निसटते पराभव नव्हे तर एकतर्फी दारुण पराभव म्हणावा इतकी भीषण स्थिती काँग्रेसवर अलीकडच्या काळात ओढवली आहे. बिहारच्या निवडणुकीने तर काँग्रेसचे अवसानच गळून पडेल असे वाटले होते. पण ते तसे बिलकुल नाही हे स्पष्टपणे दर्शवण्याचे काम काँग्रेसच्या दिल्लीतील रॅलीने केले आहे. मराठीत एक फार जुनी म्हण आहे …सुंभ जळाला तरी पीळ कायम राहतो. कालच्या दिल्लीतील मोठ्या रॅलीने काँग्रेसने आपला पीळ कायम असल्याचे दाखवले आहे. काँग्रेसचा हा धीर किंवा अवसान पाहून भाजपच्या धुरिणांना बुचकळ्यात पडल्यासारखे झाले असावे. राहुल गांधींचा नेमका गेम काय आहे हेच त्याला कळेनासे झाले असावे. काल विविध वाहिन्यांवर याच अनुषंगाने चर्चा पण झाल्या, त्याचा सूरही हाच होता. दिल्लीच्या रॅलीत विविध नेत्यांची जी भाषणे झाली त्यातील भाषा आव्हानात्मक होती. खुद्द राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भाषणेही अत्यंत आव्हानात्मक होते. या दोन्ही नेत्यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवताना तेथे कार्यरत असलेल्या तीनही निवडणूक आयुक्तांची नावे उच्चारली आणि ही नावे लक्षात ठेवा, असे आवाहन त्यांनी उपस्थिताना केले. प्रियांका गांधी यांनी तर या तीनही आयुक्तांची नावे उच्चारून लोकांकडून ती वदवून घेतली आणि ही तीन नावे कायम लक्षात ठेवा, असे म्हटले. संबंधितांना धडकी भरावी असाच हा हेतू असावा. काँग्रेसच्या कालच्या रॅलीत त्यामुळेच मोठा दम असल्याचे दिसून आले. जनमताचा कौल सातत्याने विरोधात जात असताना आणि सरकार किंवा निवडणूक आयोग आपले सारे प्रयोग पुन्हा त्याच पद्धतीने राबवत असतानासुद्धा काँग्रेसपण तसूभरही मागे हटायला तयार नाही, हे जनमानसावर बिंबवण्याचे काम कालच्या रॅलीने केले. त्याचा काँग्रेसला किती फायदा होईल किंवा निवडणूक आयोगाच्या कामकाज पद्धतीवर त्याचा नेमका काय परिणाम होईल हे इतक्यात सांगता येणार नसले, तरी काँग्रेसने आपला दम अजूनही कायम असल्याचे या निमित्ताने दाखवून दिले. त्यामुळे ही लढाई अजून संपलेली नाही, हा स्पष्ट संदेश यातून गेला आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीत दिल्लीतल्या रामलीला मैदानासारख्या मोठ्या मैदानावर सभा आयोजित करणे आणि त्याला मोठी गर्दी जमवणे हे सोपे काम नव्हते. या रॅलीसाठी बाहेरील राज्यातून गर्दी बोलवण्यात आली असली, तरी लोक ती गर्दी करायला तयार झाले यातूनही एक वेगळा संदेश जातो आहे. अर्थात, हे सगळे जरी खरे असले तरी देशात जर मतचोरीचे प्रकार होत असतील तर ती काही एकट्या काँग्रेसची समस्या नाही. देशाच्या सगळ्याच विरोधी पक्षांना त्याला तोंड द्यावे लागत आहे. सध्या बारा राज्यांत पुन्हा एसआयआरचा प्रयोग सुरू आहे. तेथेही समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी अशा इंडिया आघाडीतील अन्य पक्षांना मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे मतचोरीच्या मुद्द्यावर एकटी काँग्रेसच लढते आहे असे जे चित्र निर्माण झाले आहे ते एव्हाना दूर व्हायला हवे होते. बाकीच्या राजकीय पक्षांनीसुद्धा याबाबतीत संघटितपणे आवाज उठवायला हवा, पण विरोधकांना या मुद्द्यावर संघटित करायला काँग्रेस अजूनही कमी पडते आहे. किंबहुना काँग्रेस तसा प्रयत्न करताना दिसत नाही. या मतचोरीच्या मुद्द्यावर जर देशव्यापी व्यापक जनआंदोलन उभारायचे असेल, तर बाकीच्या पक्षांना बरोबर घेणे काँग्रेसला महत्त्वाचे आहे. हा प्रयत्न काँग्रेसकडून का होत नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. समोर भाजपसारखे अति शक्तिशाली आव्हान आहे, हे आव्हान समर्थपणे एकट्याच्या जीवावर पैलणे निदान आज तरी काँग्रेसला शक्य आहे असे दिसत नाही. इंदिरा गांधींसारख्या बलाढ्य राजवटीच्या विरोधात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली मोठे जनआंदोलन उभे राहिले होते. त्या आंदोलनात तत्कालीन जन संघ, कम्युनिस्ट या काही परस्पर विरोधी विचारधारांचे पक्ष एकत्र घेऊन जे एकसंध आंदोलन चालवले गेले त्यातून देशात मोठी क्रांती झाली आणि खुद्द इंदिरा गांधींसह त्यांचे सरकार पराभूत झाले. भाजपच्या विरोधात काँग्रेसला जर अशी क्रांती करायची असेल तर अशाच एखाद्या विशाल जनआंदोलनाची गरज आहे. त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे. काँग्रेसला ते जमेल का या प्रश्नाच्या उत्तरावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. त्या दृष्टीने काँग्रेसने आता प्रयत्न केले पाहिजेत. विरोधी पक्षांचे नेतृत्व केवळ आपल्याकडेच असावे ही काँग्रेसची राजकीय इच्छा आहे हे खरे असले, तरी आपले नेतृत्व इंडिया आघाडीतील अन्य पक्षांच्या गळी उतरवण्यासाठी काँग्रेस किती प्रयत्नशील राहील आणि त्यात त्यांना अन्य पक्षांची किती साथ मिळेल यावरही बरेच काही अवलंबून आहे.