महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख उद्यापर्यंतचीच आहे. पण आज दिवस अखेरपर्यंत राज्यातल्या सर्व 29 महापालिकांमधील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर करेपर्यंत जो ओंगाळवाणा प्रकार पाहायला मिळत आहे त्यातून राजकारण या प्रकाराविषयीच लोकांच्या मनात तिटकारा निर्माण होण्याचीच शक्यता अधिक आहे. कोणाचाही कोणाला पायपोस नाही अशीच स्थिती सर्वच राजकीय पक्षांमध्ये पाहायला मिळाली आहे. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर 15 तारखेला मतदानाला जाताना मतदारांचीच आता कसोटी लागणार आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी अगदी आयत्या वेळेला या पक्षातून त्या पक्षात जाणार्या उमेदवारांची संख्या मोठी असली तरी त्याहीपेक्षा महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे एकमेकांशी बिनसत असल्याचे सर्वच ठिकाणचे चित्र आहे. एकट्या पुण्यापुरता आपण विचार केला, तरी इतकी कमालीची राजकीय गोंधळाची स्थिती पाहायला मिळाली की या सगळ्या प्रकारापासून आपण दूर राहिलेलेच बरे, असा तिटकारा मतदारांच्या मनात निर्माण झाला असावा. पुण्यासारख्या शहरात उमेदवारांप्रमाणेच मतदारांनीही खूप पूर्वीपासून स्वतःची एक राजकीय विचारसरणी जोपासली आहे. काहीजण पुरोगामी विचारसरणीचे, काहीजण हिंदुत्ववादी विचारसरणीचे, तर काहीजण उमेदवाराच्या व्यक्तिगत चारित्र्य आणि कार्यक्षमतेला प्राधान्य देणारे अशी मतदारांची विचारसरणी होती आणि त्यानुसार ते आपापल्या विचारसरणीच्या उमेदवारांना मतदान करीत. पण आता आपण ज्याला मतदान करणार आहोत तो नेमका आपल्या विचारसरणीला अनुरूप आहे का, असा प्रश्न अनेक उमेदवारांच्या बाबतीत निर्माण झाला आहे. कालपर्यंत काँग्रेसमध्ये असणारे आज अचानक भाजपचे उमेदवार म्हणून आपल्यापुढे उभे ठाकणार आहेत, तर कालपर्यंत भाजपचे मित्र पक्ष असलेले आज आपल्यापुढे भाजपचे विरोधक म्हणून उभे ठाकणार आहेत अशा परिस्थितीत मतदार बुचकळ्यात न पडतील तरच नवल. महायुती म्हणून आजपर्यंत जे पक्ष एकत्रितपणे गेल्या विधानसभा निवडणुकीला आपण पाहिले ते तीनही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आपल्याला पाहायला मिळाले. सगळ्यात कहर तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला. आधी आम्ही महाविकास आघाडी बरोबर निवडणूक लढवणार आहोत असे छातीठोकपणे सांगणारे शरद पवार पक्षाचे नेते अचानक अजित पवारांच्या दारात गेलेले पाहायला मिळाले. त्यानंतर त्यांनी तेथून माघार घेत आम्ही महाविकास आघाडी बरोबरच आहोत असे छाती ठोकपणे सांगितले. त्यानुसार त्यांच्या जागावाटपाचे सूत्रही जाहीर झाले पण त्यानंतर अचानक शरद पवार पक्षाचे नेते पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलेले पाहायला मिळाले. या घडामोडी इतक्या विलक्षण चमकदारपणे घडल्या की मतदारच सैरभैर झाले. 24 तासांत अशी राजकीय भूमिकांची अदलाबदल राजकारणात यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती. भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्या पक्षाला महापालिका निवडणुकीपुरती सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसविषयी अचानक उमाळा आला आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी तो प्रयत्न यशस्वी झाला तर काही ठिकाणी मात्र शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी बरोबरच कायम राहिलेली पाहायला मिळाली. पुण्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली ही धरसोडीची भूमिका काँग्रेससाठी मात्र नाहक तापदायक ठरली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे काँग्रेसलाही आपली भूमिका निश्चित करता आली नाही आणि शरद पवारांच्या पक्षामुळेच पुण्यातील महाविकास आघाडीची पुरती शोभा झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात काँग्रेसचे नेतृत्व नेमके कोणाकडे आहे हे काँग्रेसच्या उमेदवारांनाही कदाचित माहिती नसावे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसविषयी नेमकी भूमिका घेण्याचे धाडस काँग्रेस दाखवू शकली नाही. अगदी पहिल्या टप्प्यात तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरही युती करण्याची तयारी काँग्रेसने दाखवल्याचे समजते; पण नंतरच्या टप्प्यात प्रदेश पातळीवरूनच अजित पवारांच्या पक्षाबरोबर युती न करण्याची स्पष्ट सूचना शहर काँग्रेसच्या नेत्यांना दिली गेली. त्यामुळे तो प्रश्न निकाली निघाला तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र काँग्रेसची आणि परिणामी पुण्यातील महाविकास आघाडीची चांगलीच दमछाक केली. तिकडे भाजप आणि शिंदे सेनेतील धरसोडीचे राजकारणही पाहायला मिळाले. खुद्द भारतीय जनता पक्षातही आयत्यावेळी आयात केल्या गेलेल्या उमेदवारांमुळे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उद्विग्नता निर्माण झालेली पाहायला मिळाली. हे चित्र जवळपास सगळ्याच महापालिकांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाची ही अधोगती एकूणच राज्याच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला छेद देणारी ठरली आहे. भारतीय जनता पक्षाच्या एकूण राजकीय शैलीमुळेच हे राजकारण नासले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही, कारण पूर्वी राजकारणात तिकिटासाठी इतकी टोकाची उलथापालथ पाहायला मिळत नव्हती. पूर्वी एखाद्या पक्षात काम करणार्या निष्ठावान कार्यकर्त्याला तिकीट मिळाले नाही, तर तो फार तर बंडखोरी करून आपल्याच पक्षाच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरायचा, पण अचानक नेमक्या विरुद्ध विचारसरणीच्या राजकीय पक्षाकडे जाऊन उमेदवारी मागायला तो धजावायचा नाही. कारण, त्याच्या मनात विचारसरणीविषयी नीतिमत्ता असायची. आज मात्र ती पार लयाला गेलेली पाहायला मिळत आहे. यामुळे उद्या महापालिकेत निवडून येणारे आपले नगरपिते हे उपटसुंभ प्रवृत्तीचे असणार आहेत हे मात्र निश्चित. त्यामुळे मतदारांनी आता नेमके काय निकष लावून मतदान करायचे यावर विचार करायलाही मतदारांपुढे फार पर्याय उरलेला नाही. म्हणूनच महापालिकेची ही निवडणूक मतदारांचीच कसोटी पाहणारी निवडणूक ठरली आहे.