Editorial : जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेली अमेरिका आणि नेहमीच लष्करी संघर्षाच्या तयारीत असलेला इस्रायल यांनी एकमेकांच्या साथीने इराणवर केलेल्या युद्ध हल्ल्यामुळे आधीच होरपळलेल्या जगाला युद्धाचे चटके अधिकच तीव्रतेने जाणवणार आहेत. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्षाने जगाला हादरवून सोडले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील छोटा लष्करी संघर्षही समोर आला होता. इस्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील लष्करी संघर्ष दीर्घकाळ सुरू आहे. सध्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुद्धा युद्धसदृश परिस्थिती आहे. हे सर्व कमी होते म्हणून की काय आता इस्रायलने इराणवर घातक हल्ले करून जगाला आणखी एका मोठ्या युद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडले आहे. अर्थात, अमेरिकेच्या पुढाकाराने आणि सहकार्यानेच इस्रायलने हे हल्ले केले असल्याने या हल्ल्यामागे अमेरिकेचा मेंदू आहे हे उघड आहे. खरे तर एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये जिनेव्हा येथे शांतता चर्चा सुरू असतानाच अशा प्रकारचे हल्ले करण्यात आले. या चर्चेतून काय निष्पन्न होत आहे याची वाट पाहण्याची तसदीही अमेरिका आणि इस्रायल यांनी घेतली नाही. अर्थात, या दोन्ही देशांना कोणत्या ना कोणत्या कारणाने इराणवर हल्ला करण्याची संधी हवीच होती. गेल्या वर्षीसुद्धा जून महिन्यामध्ये जे बारा दिवसांचे युद्ध झाले तेव्हासुद्धा या दोन देशांनी अशाच प्रकारे संधी मिळताच इराणला टार्गेट केले होते. इराणने आपला आण्विक कार्यक्रम थांबवावा आणि इराणी जनतेने आपले नेते बदलावेत या मागण्या अमेरिकेने कायम समोर ठेवल्या आहेत. पण इराणने कधीही अमेरिकेच्या या मागणीला महत्त्व दिलेले नाही. गेल्या काही वर्षांमध्ये उलट इराणने आपला आण्विक कार्यक्रम तीव्रतेने राबवला आहे. या कार्यक्रमासाठी लागणार्या युरेनियम या इंधनाचा साठा इराणकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. जरी आम्ही अण्वस्त्र निर्मिती करत नाही असे इराणने जाहीर केले असले, तरी इस्रायल आणि अमेरिकेचा त्यावर विश्वास नाही. प्रादेशिक शांततेसाठी इराणने आपला आण्विक कार्यक्रम थांबवावा अशी मागणी सातत्याने या दोन देशांकडून करण्यात येत होती. इराणने या मागणीला महत्त्व न दिल्यानेच योग्य संधी साधून अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हल्ला केला. या युद्धात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचाही बळी गेला असल्याने इराणमध्ये सत्तांतर करण्यासाठी अमेरिकेने युद्धनीती वापरली आहे. अर्थात, ह्या युद्धाचे चटके फक्त या दोन देशांना बसत नाहीत तर इतरही अनेक देशांना होरपळ जाणवणार आहे. अमेरिका नेहमीच लांबवरून युद्ध लढते. अमेरिकेच्या भूमीवर अद्यापपर्यंत युद्ध झाले नसल्याने तेथील जनतेला युद्धाचे चटके जाणवत नाहीत. पण अमेरिकेचे मध्य पूर्व प्रदेशात हवाई आणि नाविक तळ आहेत त्यावर इराणने हल्ले केल्यामुळे दुबई, जॉर्डन, बहरिन यासारख्या देशांना विनाकारणच या हल्ल्यांचा त्रास होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराणवर हल्ला करताना युद्धाचा मूलभूत नियमही इस्रायलने पाळला नाही.तेहरानमधील एका हल्ल्यामध्ये मुलींचे एक महाविद्यालय उद्ध्वस्त झाल्याने अनेक विद्यार्थिनी ठार झाल्या. युद्धामध्ये प्रत्यक्ष भाग घेणारे सैनिक आणि त्यांचे कमांडर यांची प्राणहानी ही समजण्यासारखी असली तरी सर्वसामान्य नागरिकांवर जेव्हा अशा प्रकारचे हल्ले केले जातात तेव्हा युद्धाचा अन्य हेतू आहे की काय अशी शंका आल्याशिवाय राहत नाही. अमेरिकेला फार पूर्वीपासूनच इराणमध्ये सत्तांतर हवे आहे त्यांना अशा प्रकारचा संघर्ष गरजेचाच होता. दुसरीकडे इस्रायलबरोबर नेहमी लष्करी संघर्ष करणारी हमास आणि हिजबुला या दहशतवादी संघटनांना इराणतर्फे सर्व प्रकारची आर्थिक आणि लष्करी मदत दिली जात असल्याचा दावा इस्रायलकडून केला जात असल्याने हा हल्ला करण्यामागे तेसुद्धा कारण आहे. अमेरिकेची सत्ता जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या हातात आली आहे तेव्हापासून त्यांनी जागतिक व्यवस्था विस्कळीत करण्याची सुपारी घेतली आहे की काय अशी शंका येते. एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करणारे आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष माझ्यामुळे संपला, असा दावा करणारे डोनाल्ड ट्रम्प इराणवर हल्ला करण्याची योजना राबवतात हा विरोधाभास न समजण्यासारखा आहे. जागतिक पातळीवर शांतता निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्याने करत असल्याबद्दल आपल्याला नोबेल पुरस्कार दिला जावा अशी मागणी करणारे डोनाल्ड ट्रम्प यांनीच या नवीन युद्धाला सुरुवात केली आहे हा विरोधाभासही लक्षात घेण्यासारखा आहे. नेहमीसारखे युनोच्या सुरक्षा समितीने या संघर्षाला सुरुवात झाल्यानंतर तातडीने बैठक घेऊन या संघर्षाचा निषेध केला असला, तरी त्या पलीकडे सुरक्षा समिती काही करू शकेल असे वाटत नाही. गेल्यावर्षी जून महिन्यामध्ये बारा दिवस चाललेल्या युद्धानंतर संघर्षाला विराम मिळाला असला, तरी यावेळी अमेरिका-इस्रायल आणि इराण या तीनही संबंधित देशांचे इरादे लक्षात घेता या वेळेचा हा लष्करी संघर्ष लवकर संपेल अशा प्रकारचे कोणतेही संकेत मिळत नाहीत. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराण गप्प बसून अमेरिका आणि इस्रायलला शरण जाईल असेही वाटत नाही शिवाय जागतिक पातळीवरही तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. साहजिकच आणखी काही दिवस जगाला या युद्धाच्या चटक्यांनी होरपळावे लागणार आहे.