अग्रलेख : उत्सवाचे मांगल्य
पुण्याच्या डेक्कन भागातल्या गुडलक चौकात रविवारी पुणेकर एकत्र आले. हा केवळ काही नागरिकांचा मोर्चा नव्हता, तर तो गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील सांस्कृतिक सणांच्या (DJ Banned) नावाखाली चालू असलेल्या आवाजाच्या जाचाविरोधात उमटलेला एक प्रातिनिधिक एल्गार होता.

DJ Banned : पुण्याच्या डेक्कन भागातल्या गुडलक चौकात रविवारी पुणेकर एकत्र आले. हा केवळ काही नागरिकांचा मोर्चा नव्हता, तर तो गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील सांस्कृतिक सणांच्या (DJ Banned) नावाखाली चालू असलेल्या आवाजाच्या जाचाविरोधात उमटलेला एक प्रातिनिधिक एल्गार होता. जेव्हा सर्वसामान्य नागरिकाला स्वतःच्याच शहरात, स्वतःच्याच घरात सुरक्षित आणि शांत राहण्यासाठी आर्जव करत थेट रस्त्यावर उतरावे लागते, तेव्हा प्रशासनाने याचा अत्यंत गांभीर्याने विचार करणे आवश्यक असते.
गणेशोत्सव हा पुण्याचा प्राण, महाराष्ट्राचा अथांग अभिमान आहे. पुण्याच्या या उत्सवाची (DJ Banned) कीर्ती सातासमुद्रापलिकडे पोहोचली आहे. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातील गणेशभक्त उत्सुक असतात. केवळ राज्यातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्यातून आणि जगभरातून भाविक या दहा दिवसांच्या काळात लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी पुण्याची वारी करतात.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची पायाभरणी केली तो हेतू उदात्त होता, ती वेळ वेगळी होती व ते पुन्हा सांगण्याची गरज नाही. लाडक्या बाप्पाच्या आराधनेच्या निमित्ताने गणेशभक्तांना एकत्र आणणे, परस्परांमध्ये विचारांचे (DJ Banned) आदानप्रदान करणे आणि सामाजिक प्रबोधन करणे अशी सर्वसाधारण रूपरेषा होती. श्री गणेशाची भक्ती आजही कायम आहे, भक्तांची बाप्पावरील श्रद्धा अपार आणि जशीच्या तशीच आहे.
तथापि, उत्सवाच्या जल्लोषात अत्यंत उत्साहाच्या भरात मूळ हेतू आज डॉल्बी सिस्टिम आणि अक्राळविक्राळ डीजेच्या भिंतींमागे दबला जात असल्याचे मात्र निदर्शनास येते. परिस्थिती अशी झाली आहे की, विसर्जनाचे दोन-तीन दिवस आले की पुण्यातील आजारी व्यक्ती, वृद्ध आणि लहान मुलांना वाचवण्यासाठी कुटुंबांना थेट शहर सोडून इतरत्र जावे लागते आहे.
देशालाच नव्हे तर जगाला कायम प्रगतीशील विचार देणार्या विद्वानांचे आणि सुधारकांचे शहर म्हणून लौकिक असलेल्या पुण्याचे हे भूषण म्हणायचे का? पुण्याला या नव्या ओळखीमुळे कुठे कमीपणा जाणवत नाही का, याचा सर्वच पुणेकरांनी आणि गणरायाचे थाटात स्वागत करणार्या गणेशभक्तांनी विचार करण्याची गरज आहे. गेल्या काही काळात उत्सव प्रचंड थाटात आणि श्रीमंतीत साजरा केला जात असला तरी त्या दणदणाटात शांतता, उत्सवाचे मांगल्य, पावित्र्य आपल्याकडून निसटत तर चालले नाही ना, याचाही विचार व्हायला हवा.
सगळ्यात प्रथम हे समजून घेण्याची गरज आहे की, ज्याप्रमाणे मंडळांचे गणेशभक्त बाप्पाच्या आगमनासाठी आतूर असतात तेवढीच आतूरता सर्वसामान्य नागरिकांनाही असते व तेही या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी सज्ज असतात. गणपती विघ्न दूर करतात अशी साधार श्रद्धा आहे. मात्र उत्सवाच्या उन्मादात याच श्रद्धेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. डीजेला विरोध करत एकत्रितपणे रस्त्यावर उतरणार्यांची मागणी अगदी रास्त आणि स्पष्ट आहे.
सणाला किंवा परंपरेला कोणाचाही विरोध नाही; विरोध आहे तो मानवी आरोग्याची दुरवस्था करणार्या त्या इलेक्ट्रॉनिक आवाजाच्या भिंतींना. ध्वनी प्रदूषण नियमांनुसार निवासी भागांत दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबलची मर्यादा आखून दिलेली असताना, उत्सवाच्या दिवसांत हा आवाज 110 ते 115 डेसिबलच्या पार जातो. हा केवळ आवाज उरत नाही, ती एक जीवघेणी धडधड असते. ही धडधड कानाचा पडदा तर फाडतेच, पण हृदयाचा ठोका चुकवणारी ठरते. दुसरीकडे, काही गणेश मंडळांचे प्रतिनिधी या मागणीला एकतर्फी किंवा गणेशोत्सवालाच लक्ष्य करणारे मानत आहेत.
वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत मुख्य विषयाला बगल देण्याचा आणि अकारण वाद निर्माण करण्याचा, विषयाला आस्तिकता आणि नास्तिकतेकडे नेण्याचा आणि मने कलुषित करण्याचा तसेच मनात अढी धरण्याचा प्रकार होताना दिसतो आहे व ते टाळणे सर्वथा शक्य आहे. सण कोणताही असो, तो नागरिकांच्या जीवावर उठणारा नसावा, तर एक आनंददायी सोहळा असावा, हे साधे भान प्रत्येकालाच असायला हवे. प्रशासनाने आता मध्यस्थीचे आणि कठोर कारवाईचे सोपस्कार सुरू केले आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्लाझ्मा साउंड, लेझर सिस्टीम आणि प्रेशर मिडवर 100% बंदी घातल्याचे जाहीर केले आहे; तसेच 4 बेस + 4 टॉपची मर्यादा ठरवली आहे. कागदावर हे नियम अत्यंत सुंदर आणि कौतुकास्पद दिसतात पण; प्रश्न हा आहे की, विसर्जन मिरवणुकीत जेव्हा हजारोच्या संख्येने लोक रस्त्यावर असतात, तेव्हा या नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार का? की दरवर्षीप्रमाणे कायद्याचा बडगा फक्त कागदावरच राहणार? याच वेळी पारंपरिक ढोल-ताशा पथकांच्या मुद्द्यावरही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
ढोल-ताशा हे पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतीक असले, तरी अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार त्यांचा एकत्रित आवाजही मोठा आहे. आवाजाचा स्रोत कोणताही असो, मानवी कानाला सहन होणार्या मर्यादेतच तो राहिला पाहिजे. मुळात आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही आणि कोणाचा जीव धोक्यात येणार नाही हा अत्यंत प्राथमिक आणि माणुसकीचा विचार आपण करू शकत नाही का? असंख्य पुणेकरांनी ऑनलाइन याचिकेवर स्वाक्षर्या करून यासंदर्भात आपले मत नोंदवले आहे.
ही केवळ आकडेवारी नाही, तर नाराजीचा तो स्पष्ट संकेत आहे. ही नाराजी गणेशाच्या विरोधी नाही तर भक्तीच्या अविचारी गोंगाटावर आहे. गणेशोत्सव हा आनंदाचा, भक्तीचा आणि ऐक्याचा सण आहे. या उत्सवातून (DJ Banned) कोणालाही आजारी पडून शहराबाहेर पळावे लागू नये, हीच बाप्पाच्या चरणी खरी प्रार्थना ठरेल. मंडळांनीही संवेदनशीलतेचा मार्ग स्वीकारावा. त्यांच्या बाप्पालाही त्यांच्याकडून हेच अपेक्षित असणार.






