Editorial : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालानंतर या ग्रामीण भागातील मतदारांनीसुद्धा पुन्हा एकदा महायुतीच्या बाजूनेच कौल दिल्याचे दिसून येते. जरी या निवडणुकीमध्ये महायुतीचे घटक पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली नसली तरी त्यांना स्वतंत्रपणे जे यश मिळाले आहे ते एकत्रितपणे मोजले तर राज्याच्या ग्रामीण भागामध्येही महायुतीचाच दबदबा असल्याचे समोर येते. नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये राज्यातील नागरी मतदारांनी महायुतीच्या बाजूनेच कौल दिला होता. आता ग्रामीण भागातील मतदारांनीसुद्धा महायुतीच्याच पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे असे दिसते. दीर्घकाळाने झालेल्या या निवडणुकीमध्ये काही उलथापालथ होईल असे वाटत होते. पण विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या कानाकोपर्यामध्ये ज्या प्रकारे महायुतीच्या घटक पक्षाने आपला विस्तार केला होता, त्याची फळे आता समोर येताना दिसत आहेत. कोणतेही राजकारण ग्रामीण भागापासून सुरू होते आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या राजकारणापासूनच कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा त्यांच्या नेत्यांची मुळे घट्ट व्हायला सुरुवात होत असते. या देशामध्ये आणि राज्यामध्येसुद्धा दीर्घकाळ काँग्रेसने राज्य केले. कारण ग्रामीण भागामधील त्यांचा पाया मजबूत होता. विकास संस्था, बाजार समिती, दूध संघ, पंचायत समित्या, जिल्हा परिषद या सर्वच ठिकाणी काँग्रेसची दीर्घकाळ एक हाती सत्ता होती. नंतरच्या कालावधीमध्ये काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व संस्थांवर बहुतांशी ताबा घेतला. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आत्ताच्या निवडणुकीमध्ये सर्वात कमी यश मिळालेले दिसून येते. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना असो किंवा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो या दोन्ही पक्षांनी या निवडणुकीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या उलट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला असे लक्षणीय यश मिळालेले दिसत नाही. काँग्रेसने आपल्या नेहमीच्या ठिकाणी म्हणजेच लातूर आणि कोल्हापूरमध्ये काही प्रमाणात यश मिळवले असले, तरी ज्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाने सर्व जिल्हा परिषदांमध्ये आणि पंचायत समितीमध्ये आपले अस्तित्व लक्षणीयपणे दाखवून दिले आहे तसे करणे काँग्रेसला किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांना जमलेले नाही. राज्यातील बारा जिल्हा परिषदांपैकी किमान आठ जिल्हा परिषदांमध्ये भाजपची सत्ता येण्याचे संकेत मतमोजणीनंतर मिळत आहेत. तर दोन ठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि एका ठिकाणी अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची सत्ता येईल असे दिसत आहे. राज्यातील 125 पंचायत समित्यांपैकी बहुतांशी पंचायत समित्यांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांची सत्ता असणार आहे. हा आकडा 100 च्या वर जात आहे. काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षांचा आकडा 10 च्या पुढेसुद्धा जाताना दिसत नाही. राज्यातील ज्या एकूण जिल्हा परिषदेच्या 731 जागा होत्या त्यापैकी किमान 400 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या घटक पक्षांनी आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत. साहजिकच ग्रामीण भागातील राजकारणामध्येही भारतीय जनता पक्षाने आपला विस्तार केला आहे आणि त्याला एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची साथही लाभली आहे. साधारणपणे जिल्हा परिषद निवडणुकीची रणनीती जेव्हा आखली जाते तेव्हा त्याची जबाबदारी त्या भागातील आमदारावरच दिली जाते आणि भारतीय जनता पक्षाने यावेळीसुद्धा त्या त्या भागातील आमदारांनाच अधिकार दिल्यामुळे अनेक तालुक्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पक्षाला चांगले यश मिळवून दिले. इतर राजकीय पक्षातून भारतीय जनता पक्षामध्ये येऊन आमदार किंवा मंत्री झालेल्या अनेक नेत्यांनीसुद्धा भारतीय जनता पक्षाला यश मिळावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केल्यामुळे ग्रामीण भागामध्येसुद्धा आता भारतीय जनता पक्षाची मुळे खोलवर गेलेली दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा झालेला दुर्दैवी अपघाती मृत्यू असो आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकीत प्रचार न करण्याची घेतलेली भूमिका असो, त्याचा या निवडणुकीवर काही परिणाम होईल का याबाबत चर्चा होती. पण शेवटी ग्रामीण भागातील या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या नजीकच्या नेत्यांच्या असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्येसुद्धा आपली सत्ता मिळवता आली. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे आणि राज्यातही भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे, त्यामुळे तुमच्या भागाचा विकास करायचा असेल तर तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येसुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता हवी हा भाजपाच्या प्रचाराचा मुद्दा पुन्हा एकदा प्रभावी ठरत असल्याचे दिसून येते. साहजिकच सतत भारतीय जनता पक्षाचा विजय का होत आहे, याची कारणे शोधण्यापेक्षाही सतत पराभूत होणार्या किंवा अपेक्षित यश न मिळणार्या विरोधी पक्षांनी आपल्या पराभवाची कारणे शोधण्याचे काम आता करायला हवे. दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये राज्यातील नगर, महानगर आणि ग्रामीण भागातील मतदारांनी भारतीय जनता पक्षावर सातत्याने विश्वास दाखवला आहे, हे वास्तव विरोधी पक्षांना स्वीकारावेच लागेल.