महाराष्ट्राच्या बदलापूर शहरात स्त्रीबीज विकून अपत्यहीन दाम्पत्यांना स्वस्त दरात आयव्हीएफ तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारे एक रॅकेट उघडकीस आल्याने आधुनिक काळातील गुन्हेगारीचा एक वेगळा आणि काळा चेहरा समोर आला आहे. सध्याची कोणतीही अर्थव्यवस्था बाजारपेठेच्या माध्यमातूनच चालत असल्याने, बाजारपेठेत ज्याची मागणी असते त्याप्रमाणेच पुरवठा करण्याचे एक अर्थशास्त्रीय तत्त्व आहे. आता हे तत्त्व मातृत्वाच्या बाजारपेठेलासुद्धा लागू झाले आहे ही चिंताजनक बाब आहे. बदलापूर परिसरातील तीन महिला अनेक महिन्यांपासून गरीब महिलांना आकर्षित करून त्यांना पैसे देऊन त्यांचे स्त्रीबीज काढून घेणारी यंत्रणा राबवत होत्या. नंतर हे स्त्रीबीज आयव्हीएफ सेंटर्सना आणि अपत्यहीन दाम्पत्यांवर उपचार करणार्या सेंटरकडे पाठवले जात असे. ही एक प्रकारे स्त्रीबीजाची तस्करीच मानली जाते. म्हणूनच परिसरातील आरोग्य अधिकार्यांनी तातडीने कारवाई करून या महिलांना ताब्यात घेतले. पण अशा प्रकारचा एखादा वैद्यकीय गुन्हा महाराष्ट्रात चालू आहे हीच मुळात आश्चर्याची आणि चिंतेची बाब आहे. एकेकाळी महाराष्ट्रमध्ये स्त्रीभ्रूणहत्याचे प्रमाण वाढले होते, तेव्हा गर्भलिंग तपासणी करणार्या रुग्णालयांनीसुद्धा आपले उखळ पांढरे करून घेतले होते. त्या विषयावर आणि त्या प्रकारावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असतानाच आता हा मातृत्वाचा बाजार नव्याने समोर आला आहे. बदलापूरमध्ये तीन महिलांना जरी या प्रकरणी अटक करण्यात आली असली तरी या विषयाच्या मुळापर्यंत जाणे तितकेच महत्त्वाचे आहे. कारण वरपर्यंत संबंध असल्याशिवाय आणि संपूर्णपणे वैद्यकीय तंत्रज्ञानाचे ज्ञान असल्याशिवाय अशा प्रकारच्या गुन्हेगारी व्यवसायामध्ये सहभाग शक्य नाही. साहजिकच या गलिच्छ व्यवसायाची सुरुवात या तीन महिलांपासून झालेली नाही, तर अशा प्रकारचा व्यवसाय फलदायी ठरू शकतो याची माहिती असणार्या वैद्यकीय मेंदूनेच हे काम सुरू केले आहे हे उघड आहे. ही एक साखळी आहे आणि संघटित गुन्हेगारी आहे. या तीन महिलांना फक्त गरीब आणि पैशाची गरज असलेल्या महिलांना आकर्षित करून त्यांच्या नकळत त्यांचे स्त्रीबीज काढून देण्याची जबाबदारी देण्यात आली असावी आणि त्यानंतरची सगळी पुढील प्रक्रिया वैद्यकीय ज्ञान असणार्या लोकांनीच राबवली आहे हे उघड आहे. एकीकडे महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्यामध्ये मूल व्हावे म्हणून अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे अनेक विषय समोर येत असतानाच आता वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या निमित्तानेसुद्धा एक वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी समोर येत आहे हेच या बदलापूर घटनेने सिद्ध केले आहे. अपत्यहीन दाम्पत्यांना नैसर्गिक पद्धतीने जर अपत्य प्राप्त झाले नाही तर आयव्हीएफ किंवा तत्सम तंत्रज्ञान वापरली जातात. हे सर्व उपचार महागडे असतात आणि सर्वांनाच परवडतात असेही नाही. या तंत्रज्ञानासाठी स्त्रीबीज देण्यासाठी कोणी राजीखुशीने तयार होतो असेही नाही. या पार्श्वभूमीवर जसा एखादा अवयव दान केला जातो किंवा अनेकवेळा विकत घेतला जातो, त्याच पद्धतीने स्त्रीबीज मिळवून त्या आधारे ह्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सर्वसामान्य गरीब घरातील आणि कोणतेही वैद्यकीय ज्ञान नसलेल्या महिलांची ही एक प्रकारची फसवणूक आणि पिळवणूकच आहे. कारण त्यांच्या नकळत त्यांच्या स्त्रीबीजाचा व्यापार केला जात आहे. जरी या माध्यमातून एखाद्या अपत्यहीन दाम्पत्याच्या घरात समाधान येणार असले तरी या महिलांची फसवणूक करून त्यांना या रॅकेटचा भाग बनवण्यात आला आहे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. देशामध्ये अवयवदानाची मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी किडनी किंवा यकृतासारखे अनेक अवयव अनेक वेळा मोठी किंमत देऊनच खरेदी करावे लागतात.तशीच काहीशी परिस्थिती आयव्हीएफ तंत्रज्ञानाबाबतही असल्याने या तंत्रज्ञानासाठी वापरण्यात येणारे स्त्रीबीजसुद्धा खरेदी करूनच आणले जात आहे हीच गोष्ट या मातृत्वाच्या बाजाराने समोर आणली आहे. आतापर्यंत या मातृत्वाच्या बाजाराचा खूप छोटा भाग समोर आला असला तरी तो दूरवर पसरला असेल यात कोणतीही शंका नाही. साहजिकच सरकारने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खोलवर तपास करून या रॅकेटच्या सूत्रधारांचाही शोध घेण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टी केवळ एकाच ठिकाणी घडतात असे नाही, तर अनेक ठिकाणी असे बाजार सुरू असू शकतात. त्याचाही तपास करण्याची गरज आहे. आर्थिक परिस्थितीमुळे आणि गरिबीमुळे गांजलेल्या सर्वसामान्य महिलांची पिळवणूक करून त्यांच्याकडून नकळत त्यांची स्त्रीबीज काढून घेऊन दुसरीकडे अपत्यहीन दाम्पत्यांच्या भावनांशी खेळणारा हा मातृत्वाचा बाजार निश्चितच निषेधार्ह आहे. सरकारने त्याची गंभीर दखल घेऊन हा बाजार त्वरित बंद होईल याची खात्री करायला हवी. सर्व संबंधित व्यक्तींना कडक शासन करायला हवे.