Arvind Kejriwal : ‘जो शिलालेख बनता उसको अखबार बनाके क्या पाया’, असे डॉ. कुमार विश्वास यांनी त्यांच्या एका कवितेत म्हटले आहे. ते आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनाच उद्देशून होते. कुमार विश्वास आता अपने अपने राम या कार्यक्रमात गुंतले असून राजकारणापासून त्यांनी फारकत घेतली आहे. त्यांच्या अगोदर प्रशांत भूषण, योगेंद्र यादव व इतर अनेक नेते जे प्रकाशझोतात आले होते, ते सगळे पक्ष सोडून गेले आहेत किंवा त्यांना जावे लागले. गेल्याच आठवड्यात आणखी सात जणांनी आपची साथ सोडली. हे सर्व जण राज्यसभेचे सदस्य होते. केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या लाटेवर पक्ष स्थापन केला आणि दोन राज्यांत सत्तेवर आणण्याची किमया साधली. इतर राज्यांतही पक्षाने लक्षणीय मते मिळवली व राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त केला. कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला व नेत्यांना सुखावणारेच यश ‘आप’ला मिळाले. तथापि, व्यक्ती महत्त्वाची की पक्ष संघटनेची शक्ती महत्त्वाची यात अघोषित संघर्ष सुरू होतो तेव्हा आणि एक व्यक्ती संपूर्ण संघटनेवर हावी होऊ लागते तेव्हा पक्षाचा प्रवास त्याच दिशेने जातो ज्या दिशेने आता आम आदमी पार्टी चालली आहे. राजकारणात अशा स्थितीचा सामना करावा लागणारा हा एकमेव पक्ष नाही. इतिहासाची पुनरावृत्ती होते. Arvind Kejriwal जे आपच्या नशिबी आज आले ते काँग्रेस या देशातील सगळ्यांत जुन्या आणि एकेकाळी सगळ्यांत मोठ्या पक्षाच्या नशिबीही आले. नव्वदच्या दशकात काँग्रेसला खर्या अर्थाने सत्तांतराचा हादरा बसला तथापि, पक्षाला गळती त्याच्याही अगोदरपासून (Arvind Kejriwal) सुरू झाली होती. गाव-खेड्यापर्यंत पाळेमुळे रूजली असल्यामुळे काँग्रेस आजही दुबळी झाल्याचे दिसत असली तरी भक्कमपणे उभी आहे. ते त्यांनी सव्वाशे वर्षांत कमावले आहे. केजरीवालांनी एका दशकात जे कमावले त्या भांडवलावर एवढे मोठे हादरे सहन करणे त्यांना जरा अवघडच जाणार आहे. व्यक्ती म्हणजे ते स्वत: आणि त्यांना आवडणारी दोन-चार जवळची माणसे महत्त्वाची की पूर्ण संघटना महत्त्वाची याचा त्यांना विचार करावा लागेल. देशात स्वकीयांची राजवट असली पाहिजे आणि खर्या अर्थाने लोकशाही असली पाहिजे हे स्वांतत्र्यासाठी लढणार्या प्रत्येकाचे स्वप्न होते. शेवटच्या रांगेत असलेला घटकही कशापासून वंचित राहू नये आणि त्याचे अश्रू पुसले जावेत अशी कामना त्या पिढीची होती. स्वातंत्र्य मिळाले आणि सुरुवातीची दीड-दोन दशके देश म्हणजे काँग्रेसची राजवट त्या उच्च मूल्यांवर चालली. नंतर मात्र स्वार्थ आणि लोभी विचारांचा शिरकाव राजकारणात झाला आणि कौटुंबिक पक्षांचा उदय झाला. स्वत:ला पक्षसंघटनेपेक्षा मोठे आणि वेगळे मानणार्यांमुळे हे घडले व त्यांच्या मूळ पक्षांची शक्ती घटत प्रादेक्षिक शिलेदार उभे राहिले. सत्ताप्राप्ती हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून तत्त्वशून्य किंबहुना उबग आणणार्या तडजोडी होत गेल्या. या सगळ्यांत देशाचे हित आणि समाजाचे कल्याण हे विचार मागे पडले. आम आदमी पक्षाने पर्यायी राजकारणाचे स्वप्न दाखवले होते. केजरीवाल आणि त्यांच्यासोबत सुरुवातीला दिसणारी तेव्हाची डझनभर मंडळी हाच पक्ष नव्हता तर बदलाचे स्वप्न पाहणारे लाखो लोक त्यांच्यासोबत होते. भ्रष्टाचार मुक्तीचा नारा दिला गेला होता आणि खरेच तसे होऊ शकते, देशात पारदर्शीपणा येऊ शकतो हा विश्वास निर्माण झाला होता. दिल्ली आणि पंजाबमध्ये त्याचे प्रत्यंतर आले. गुजरातची अभेद्य तटबंदी किलकिली करण्यात ‘आप’ला यश आले. नंतरच्या टप्प्यात आत्मकेंद्री राजकारण प्रभावी होत गेले आणि ज्या बदलाची हाक देत आपण येथे आलो होतो त्याचा विसर पडत गेला. स्थापनेच्या वेळी काही ठराविक मंडळी केजरीवाल यांची अगदी खास होती. त्यातले मनीष सिसोदिया सोडले तर इतर जण लुप्त झाले. नंतर काही काळाने आणखी काही जवळची मानली जाणारी मंडळीही प्रवाहातून बाहेर गेली. आताच्या बॅचमधील राघव चढ्ढा, संदीप पाठक आणि स्वाती मालिवाल ही केजरीवाल यांच्या विशेष मर्जीतील. यातील मालिवाल यांच्याशी कधीचेच बिनसले होते. मद्य धोरण प्रकरणानंतर चढ्ढा आणि पाठक विशेषत: चढ्ढा पक्षापासून दूर जाताना दिसले. राघव चढ्ढा आणि अन्य दोघे म्हणजे मालिवाल आणि संदीप पाठक हे आपचे कार्यकर्ते तरी म्हणता येऊ शकतात. किंबहुना ते करिअर म्हणूनच राजकारणात आले होते. मात्र त्यांच्यासोबत जे अन्य चार जण आता भाजपच्या छावणीत गेले आहेत त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचे निकष काय होते असा प्रश्न जर आज कोणी विचारत असेल तर तो अस्थानी नाही. नगरसेवकाची उमेदवारी देतानाही त्यावर खुली आणि पारदर्शक चर्चा झाली पाहिजे असे सुरुवातीच्या टप्प्यात ‘आप’चे म्हणणे होते. तसे केले तरच आपण व्यवस्थेत बदल घडवून आणू शकतो असा तेव्हा पक्षाचा विश्वास होता. मात्र यालाच सोयीस्कर बगल देत राज्यसभेवर उद्योगपतींची वर्णी लावली गेल्यावर उक्ती आणि कृतीतील फरक दुर्लक्षित होऊ शकला नाही. उद्योजक त्याला जेथे नफा दिसतो तेथेच जातो. पक्ष चालवणार्या व्यक्तीने हे विचारात घेणे आवश्यक होते. पक्षाच्या शक्तीपेक्षा आपण मोठे आहोत असे गृहीत धरल्यामुळे जे व्हायचे होते तेच झाले व कदाचित पुढेही होत राहील.