सध्या भारताच्या आश्रयाला असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेशातील लवादाने मानवतेच्या विरोधात अपराध केल्याच्या कारणावरून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे शेख हसीना यांचे एकूणच भवितव्य आता संकटात सापडले आहे. बांगलादेशात फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकात भाग घ्यायला शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग पक्षाला या आधीच बंदी घालण्यात आली आहे. मुळात अवामी लीग या पक्षावरच तेथे बंदी लागू आहे त्यामुळे बांगलादेशात सत्तेवर येण्याचा त्यांचा मार्ग बंद झाला आहे. बांगलादेशात जे नवीन सरकार सत्तेवर येईल ते सरकार या फाशीच्या शिक्षेच्या संबंधात काय निर्णय घेईल यावर बरेच काही अवलंबून आहे. स्वतः शेख हसीना यांनी हा निर्णय फेटाळून लावला असून आपल्या विरोधातील खटला हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवावा अशी मागणी त्यांनी केली आहे. शेख हसीना भारताच्या आश्रयाला असल्याने त्या जोपर्यंत येथे आहेत तोपर्यंत त्यांच्या जीविताला कोणताही धोका नाही, हे जरी खरे असले तरी त्या येथे परावलंबी किंवा परदेशी आश्रयावर किती दिवस राहणार हाही प्रश्न आहे. शेख हसीना या बांगलादेशच्या चार टर्म पंतप्रधान होत्या आणि पंतप्रधान पदाची त्यांची पाचवी टर्म सध्या सुरू होती. पण गेल्या वर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात त्यांच्या सरकारच्या विरोधात आंदोलकांनी मोठा उठाव केला. त्यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या विरोधातील आंदोलन शस्त्राच्या बळावर दडपून टाकण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांवर लष्कराकडून सर्रास गोळीबार केला गेला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका समितीच्या अहवालानुसार आंदोलकांवर करण्यात आलेल्या गोळीबारात सुमारे चौदाशे लोक ठार झाले आहेत. परंतु तरीही हे आंदोलन शमत नाही हे पाहिल्यानंतर स्वतः शेख हसीना या आपल्या काही सहकार्यांसह भारतात पळून गेल्या. कालच्या घडामोडीनंतर त्यांचे बांगलादेशात परतणे जवळपास अशक्य झाले आहे. वास्तविक शेख हसीना यांनी अत्यंत समर्थपणे बांगलादेशचा राज्यकारभार चालवला आणि या देशाला त्यांनी बर्यापैकी आर्थिक सुस्थितीत आणून ठेवले. इस्लामिक कट्टर पंथीयांचा मोठा प्रभाव असलेल्या या देशात शेख हसीना यांनी सेक्युलर पद्धतीने राज्यकारभार चालवताना समाजातल्या सर्व धर्मीयांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यांच्या आवामी लीग या पक्षाचे नाव पूर्वी पूर्व पाकिस्तान अवामी मुस्लीम लीग असे होते, पण त्यांनी आपल्या पक्षाच्या नावातून मुस्लीम हा शब्द वगळला. त्यांच्या या कृतीतूनच त्यांची सेक्युलर प्रतिमा स्पष्ट होते. पाकिस्तान प्रमाणेच बांगलादेशचा राजकीय इतिहासही रक्तरंजित राहिला आहे. शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांनी बांगलादेश स्वतंत्र करण्यासाठी मोठेच योगदान दिले आहे. ते नंतर राष्ट्रप्रमुखही झाले; पण 1975 मध्ये त्यांची हत्या करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या घरातील तब्बल 17 जणांना ठार मारले गेले. मात्र त्यावेळी हसीना आणि त्यांची बहीण रेहाना विदेशात असल्यामुळे त्या सुदैवाने बचावल्या. बांगलादेशच्या या आधीच्या पंतप्रधान बेगम खलिदा या बांगलादेशचे राष्ट्र प्रमुख झियाउर रहमान यांच्या कन्या आहेत. पण झियाउर रहमान यांचीही 1981 मध्ये हत्या झाली. बांगलादेशचा राजकीय इतिहास या दोन महिला नेत्यांच्या नेतृत्वाखालील राजकारणाच्या अनेक रंजक घडामोडीने व्यापला आहे. आज शेख हसीना यांचे राजकीय भवितव्य अंधुक दिसत असले तरी बेगम खलिदा जिया मात्र बांगलादेशातील राजकारणात अजूनही सक्रिय आहेत. अर्थात आज त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही. त्यामुळे येत्या फेब्रुवारीत बांगलादेशात निवडणूक झाल्या आणि त्यांचा पक्ष सत्तेवर आला तरी त्या पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता कितपत आहे याची शंका आहे. सध्या बेगम खलिदा झिया यांचा मुलगा तारीख रहमान हा आपल्या पक्षाची धुरा सांभाळतो आहे. फेब्रुवारीतील निवडणुकीनंतर बांगलादेशात सत्तेवर येणार्या सरकारवर शेख हसीना यांचे भवितव्य अवलंबून आहे. भावी सरकार उदारमतवादी असले तरच शेख हसीना यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेबाबत फेरविचार होऊ शकतो, अन्यथा त्यांचे भवितव्य अंधकारमय आहे हे मात्र निश्चित. शेख हसीना यांच्याबाबत वादप्रवाद काहीही असले तरी त्यांनी बांगलादेश कट्टर इस्लामिक लोकांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवला हे त्यांचे योगदान नाकारता येत नाही. बांगलादेशच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळेच बांगलादेशचे दरडोई उत्पन्न एका टप्प्यावर भारताच्याही पुढे गेले होते. बांगलादेश कर्जबाजारी होणार नाही याचीही काळजी त्यांनी घेतली होती, अन्यथा चीनने भारतालगतचे देश आपल्या कर्जाच्या सापळ्यात अडकवले आहेत. शेख हसीना यांच्यामुळेच चीनला बांगलादेशमध्ये आपला पाय रोवायला जागा मिळाली नाही. त्या भारताच्या उपकाराची जाण ठेवून होत्या. त्यामुळेच त्यांनी भारताशी खूप चांगले मैत्रीचे संबंध जपले होते. शेख हसीना यांचा बांगलादेशातील प्रभाव नष्ट होणे किंवा त्यांचा पक्ष भविष्यातील निवडणुकीत सत्तेपासून दूर राहणे भारतासाठी नव्याने डोकेदुखी निर्माण करणारे ठरणार आहे. बेगम खलिदा जिया यांची बांगलादेश नॅशनल पार्टी बांगलादेशात सत्तेवर आली तर तेथे इस्लामिक कट्टरपंथीय पुन्हा डोके वर काढतील आणि तेथील हिंदूंचे जीवन पुन्हा धोक्यात येईल अशी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांचे बांगलादेशात पुनरुज्जीवन करण्यासाठी भारताने स्वतःहून पुढाकार घेऊन भूमिका निभावणे गरजेचे आहे असे या निमित्ताने सुचवावेसे वाटते. मुळात बांगलादेशची स्थापनाच भारताच्या पुढाकाराने झाली आहे त्यामुळे तेथील घडामोडीत भारताने सक्रियपणे लक्ष घालणे अपेक्षित आहे.