भारताच्या महिला संघाने रविवारी इतिहास घडवला. महिलांच्या एकदिवसीय विश्वकरंडक विजेतेपदाला गवसणी घालताना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने गेल्या अनेक वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आणली. नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडिअमवर हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत विश्वविजेतेपद मिळवले. हा कोणा एकट्या खेळाडूचा विजय नाही, तर सांघिक विजय आहे. हरमनप्रीतचे नेतृत्व अधोरेखित करत असतानाच स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमीमा रॉड्रीक्स, अमनज्योत कौर या व अशा कितीतरी खेळाडूंनी या विजयात मोलाचा वाटा उचलला. या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून गेली 25 वर्षे आपण या क्षणाची प्रतीक्षा करत होतो. त्यातही तब्बल दोन वेळा अंतिम फेरी गाठूनही आपण विजेतेपदापासून वंचित राहिलो होतो. त्या सगळ्याची कसर यंदा भरून निघाली. भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात भारताच्या महिला क्रिकेट संघाने एक सोनेरी पान लिहिले. काय नव्हते या विजेतेपदात, जिद्द, कठोर मेहनत, पराभव विसरून केलेला जिगरबाज खेळ सगळे काही दिसत होते. उपांत्य लढतीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करत आपण थाटात अंतिम फेरी गाठली. याच ऑस्ट्रेलियाने आपल्याला वारंवार त्रास दिला होता. त्यांनी आपल्या तोंडून अनेकदा या स्पर्धेच्या विजेतेपदाचा घास हिसकावून घेतला होता. त्यातही यंदाच्या स्पर्धेत आपण साखळीतील सलग तीन सामने गमावले होते. त्यावेळी अनेकांनी विजेतेपदाची आशाही सोडली होती. मात्र, आपला संघ फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेताना दिसला. उपांत्य लढत खेळताना आपण त्रिशतकी धावांचा यशस्वी पाठलाग केला. तिथेच संपूर्ण संघ पेटून उठला व अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेलाही नमवत आपण विश्वविजेते बनलो. अंतिम लढतीत आपण एकवेळ सव्वातीनशे धावाही पार करू असे चित्र होते. परंतु तळातील फलंदाज अपयशी ठरल्याने आपल्याला 298 धावांवर समाधान मानावे लागले. दक्षिण आफ्रिकेला नमवणे सोपे नव्हते. त्यांची कर्णधार लॉरा वोल्वार्डटने शतकी खेळी करत आपल्यावरचे दडपण वाढवले होते. मात्र, दीप्ती शर्माने मोक्याच्या क्षणी एकाच षटकात दोन गडी बाद केले त्यात एक वोल्वार्डट होती. तिचा झेल घेतला गेला व संपूर्ण भारतीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 1973 मध्ये महिलांच्या एकदिवसीय विश्वकरंडकाची सुरुवात झाली. तेव्हापासून आपण सातत्याने विश्वविजेतेपदाची आशा करत होतो, तो क्षण यंदा अनुभवायला मिळाला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने तब्बल सात वेळा ही स्पर्धा जिंकल्यामुळे यंदाही तेच हॉट फेव्हरीट होते. तसेच इंग्लंडने चार वेळा ही स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे त्यांच्याकडेही संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते. स्पर्धा भारतातच होत असल्याने भारतीय संघावरही आशा होती. मात्र, साखळीतील तीन सामने गमावल्यावर ही आशा धूसर बनत चालली होती. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. हरमनप्रीत कौरच्या संघाने कसोशीने खेळ केला. मिळालेल्या सुट्टीच्या दिवसांत नेटमध्ये घाम गाळला. आपल्या चुका दुरुस्त केल्या व उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाला धूळ चारत अंतिम फेरी गाठली. या विजयात संघातील खेळाडूंबरोबरच मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचाही वाटा मोलाचा ठरला. सचिन तेंडुलकर व विनोद कांबळीसह अमोलही भारतीय संघात स्थान मिळवण्याचा दावेदार होता. मात्र, संपूर्ण कारकिर्दीत त्याला एकदाही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही. मात्र, आता महिला संघाचा प्रशिक्षक बनल्यावर त्याने सर्वात मोठे विजेतेपद देशाला मिळवून दिले. दीप्ती शर्माने टाकलेल्या चेंडूवर हरमनप्रीतने अफलातून झेल घेत दक्षिण आफ्रिकेचा डाव संपुष्टात आणला व भारताच्या विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली. दीप्तीने मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम गोलंदाजी करत पाच गडी बाद केले. यात एक गोष्ट महत्त्वाची होती. या स्पर्धेपूर्वी संघात निवड न झालेली शेफाली वर्मा घरात टीव्हीवर सामने पाहात होती. संघातील एक खेळाडू जायबंदी झाल्याने शेफालीचा संघात समावेश झाला व तीच अंतिम सामन्याची स्टार ठरली. देवाचीच ही इच्छा असावी. तिने 78 चेंडूत 87 धावा करत भारताच्या धावसंख्येत मोठा वाटा उचलला. तिच्यामुळेच आपण सर्वोत्तम धावसंख्या उभारू शकलो. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या सर्वच आघाड्यांवर भारताने दक्षिण आफ्रिकेला मागे टाकले व एक स्वप्नवत यश प्राप्त केले. भारताच्या महिला संघावर आता कौतुकाचा वर्षाव होत असला तरीही त्यामागे अफाट मेहनत आहे हे देखील लक्षात घेतले पाहिजे. आपल्या संघाने गेल्या दोन ते तीन वर्षांत ऑस्ट्रलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड व दक्षिण आफ्रिका या सर्वोत्तम संघांविरूद्ध सातत्याने सरस कामगिरी केली. त्यामुळे त्यांच्या खेळाडूंची बलस्थाने व कमकुवत दुवे आपण योग्य वेळी हेरले व त्याचाच या स्पर्धेत आपल्याला लाभ झाला. शेफाली वर्मा व दीप्ती शर्मा जरी विजयाच्या शिल्पकार ठरल्या असल्या तरीही अन्य खेळाडूंची साथही महत्त्वाची होती. या विजेतेपदाचा सामना पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक मैदानात तर लाखो प्रेक्षक घरात टीव्हीसमोर बसले होते, त्यांना आपल्या संघाने निराश केले नाही. स्टेडियम खचाखच भरलेले ते देखील महिलांच्या क्रिकेट सामन्याला असे चित्र पहिल्यांदाच पाहण्यात आले. पुरुष संघासाठी हे चित्र काही अपरिचित नाही मात्र, महिला संघासाठी हे खास होते. आता ही नव्या युगाची नांदी ठरणार आहे. भारतीय महिला क्रिकेटचा दबदबा आता जागतिक कीर्तीचा बनला आहे. माजी कर्णधार मिताली राजलाही आपल्या खेळाडूंनी करंडक उंचावण्याचा मान दिला तेव्हा संपूर्ण स्टेडियम स्तब्ध झाले. म्हणजेच याच वरिष्ठ खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवत आज हे यश आपण प्राप्त केले आहे. गेल्या 40 दिवसांचे वर्णन खरेतर शब्दात करणे शक्य नाही मात्र, या विजेतेपदाने संपूर्ण देशाला आपल्या देशातील महिला क्रिकेटपटूंच्या गुणवत्तेची साक्ष मिळाली. आता येत्या काळात असेच यश व कीर्ती भारतीय महिला मिळवेल अशी खात्री या विजेतेपदाने दिली आहे.