पुण्याच्या राजकारणातील एक झंजावाती नेतृत्व म्हणून सर्वपरिचित असलेले माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचे आज निधन झाले. पुण्याच्या राजकारणातील त्यांची कारकीर्द अनेक अर्थाने गाजली. त्यांचे समर्थक त्यांच्यासाठी एक घोषणा कायम द्यायचे, ती म्हणजे ‘सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी’. ही घोषणा अनेक अर्थाने त्यांच्याबाबतीत समर्पकच होती. एकेकाळी पुण्यात काँग्रेसचे मोठे वर्चस्व होते. बॅरिस्टर गाडगीळ यांचे शहर काँग्रेसवर एक हाती वर्चस्व असतानाच्या काळात कलमाडी हे शरद पवार यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून त्यावेळच्या समाजवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. पुढे शरद पवारांनी त्यांची समाजवादी काँग्रेस पार्टी काँग्रेसमध्ये विलीन केली. त्यानंतर सुरेश कलमाडी यांना राजकारणाचे एक मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले. नंतरच्या काळात बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचा प्रभाव जसा कमी होत गेला तसा कलमाडींनी पुणे शहरावरील आपला प्रभाव वाढवत नेला आणि शहराचे तसेच काँग्रेस पक्षाचे ते सर्वेसर्वा बनले. हे अनेक अर्थाने हरहुन्नरी असे व्यक्तिमत्त्व होते. मुळात त्यांची ओळख सुरुवातीच्या काळात उत्कृष्ट क्रीडा संघटक अशी होती. देशपातळीवरील क्रीडा क्षेत्राचेसुद्धा ते अनेक वर्ष अनभिषिक्त सम्राट होते. एकीकडे आपली क्रीडा क्षेत्रातील वाटचाल सुरू ठेवतानाच त्यांनी पुण्यातील राजकारणावरची आपली पकड मजबूत करत नेली. केंद्रीय राजकारणात सुरुवातीला ते राज्यसभेचे सदस्य होते. त्यानंतर जशी त्यांनी पुण्यातील लोकसभा निवडणूक जिंकली तसे त्यांचे कार्यकर्तृत्व आणखीनच झळाळून निघाले. पुण्यातून तीन वेळा ते लोकसभेवर निवडून गेले. त्यांची राजकारणातील शैलीसुद्धा पुणेकरांचे डोळे दीपवणारी ठरली. राजकारणाला त्यांनी कॉर्पोरेट व्यवहाराचे स्वरूप दिले. कॉर्पोरेट क्षेत्रात जसे उत्तम व्यावसायिकपणे काम केले जाते तशाच पद्धतीने त्यांनी राजकारण करताना शहरातील एकूणच राजकारणाची शैली बदलून टाकली. पुढे महापालिकेवरसुद्धा त्यांची एकहाती सत्ता आली. एकीकडे खासदार आणि दुसरीकडे महापालिकेतील सत्ता या बळावर त्यांनी शहरात जो झंजावात निर्माण केला तो अक्षरशः अभूतपूर्व होता. शहराच्या विकासात त्यांनी या माध्यमातून दिलेले योगदान विसरता येणार नाही. क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही पुण्याचा लौकिक केवळ देशपातळीवर नव्हे तर जागतिक पातळीवर पण व्हावा या संकल्पनेने त्यांना झपाटले होते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी पुण्यात गणेश उत्सवाच्या काळात पुणे फेस्टिव्हलचा दिमाखदार संस्कृती सोहळा सुरू केला आणि त्याला देशभर कशी प्रसिद्धी मिळेल याची रचना केली. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचेही ते आयोजक होते. या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत जगातले अनेक नामवंत खेळाडू सहभागी झाल्याने या स्पर्धेलाही देशपातळीवर महत्त्व आले. याच काळात त्यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही पुण्यात सुरू करून सगळीकडे धामधुम उडवली. कलमाडी यांचे हे सगळे इव्हेंट आयोजित करण्याची शैलीसुद्धा डोळ्यात भरण्यासारखी असायची. या इव्हेंटच्या काळात पुण्याचे सुशोभीकरण व्हावे, चारही बाजूला विस्तृत रस्त्यांचे जाळे उभे राहावे यासाठी ते कटाक्षाने कार्यरत असत. बालेवाडीच्या क्रीडा नगरीच्या उभारणीत त्यांचे योगदानही मोठे आहे. याच क्रीडा नगरीत राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करून पुण्याच्या लौकिकात त्यांनी भरच घातली. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनी केंद्र सरकारात लॉबिंग करून शहराच्या पायाभूत सुविधा विकासासाठी अब्जावधी रुपयांचा निधी पुण्यात आणला. त्यातून शहरातील सर्व महत्त्वाचे रस्ते चार पदरी किंवा सहा पदरी झाले. पुण्यात आपल्याला भविष्यात ऑलिम्पिक स्पर्धासुद्धा घ्यायची आहे या संकल्पनेनेही ते झपाटले होते. थोडी नशिबाची साथ त्यांना मिळाली असती तर कदाचित त्यांनी त्यांचे हे स्वप्नसुद्धा साकार करून दाखवले असते इतकी प्रचंड ऊर्जा आणि कुवत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामावलेली होती. हे सगळे करत असताना त्यांना पुण्यात विरोधच झाला नाही असे नाही. पण विरोधकांशीसुद्धा त्या त्या पातळीवर जुळवून घेत कायम भविष्याचा वेध घेत कार्यरत राहणारा एक हा एक उत्कृष्ट संघटक होता. राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलेले अनेक नेते पुण्याला लाभले त्या यादीत कलमाडी यांचे स्थान लक्षणीय स्वरूपाचे आहे. पुण्यात वैचारिक अंगाने राजकारण करणार्या कार्यकर्त्यांची मोठी फळी सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये होती; पण कलमाडी यांनी विचारांची कास धरतानाच राजकारणाची ही परंपरागत कार्यशैली मोडीत काढली. त्यामुळेच कलमाडी यांनी पुण्याच्या राजकारणाचे व्यापारीकरण केले असा आरोप त्यांच्यावर सातत्याने केला गेला, पण अशा टीकेमुळे ते कधीही व्यथित झाले नाहीत किंवा त्यांनी कधीच नमते घेतले नाही. जशी त्यांच्यावर टीका सुरू व्हायची तसा त्यांना अधिक काम करण्यासाठी चेव चढायचा. अशा या पूर्ण वेगळ्या धाटणीच्या नेत्याने पुणेकरांवर नक्कीच भुरळ घातली, त्याच आधारावर त्यांना पुणेकरांनी तब्बल तीन वेळा मोठ्या मताधिक्याने लोकसभेवर पाठवले. दिल्लीच्या राजकारणावरही त्यांनी उत्तम प्रभाव निर्माण केला होता. आपले राजकीय गुरू असलेले शरद पवार यांच्याही विरोधात जाऊन त्यांनी आपले स्वतःचे राजकीय अस्तित्व आणि प्रभाव कायम टिकवला होता हे त्यांचे राजकीय यश लक्षणीय मानावे लागेल. नरसिंहराव सरकारच्या काळात त्यांना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्रिपद मिळाले; पण त्यांचे हे मंत्रिपद जेमतेम सहा महिन्यांसाठी होते कारण त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका होणार होत्या. त्यावेळी पत्रकारांनी पुण्यात त्यांना विचारले की मंत्री म्हणून तुम्ही या सहा महिन्यांच्या अवधीत किती काम करू शकाल, त्यावर कलमाडी यांनी दिलेले उत्तर लोकांच्या अनेक दिवस लक्षात राहिले. ते म्हणाले की, ‘सहा महिन्याचा दिवस आणि सहा महिन्याची रात्र असे एक वर्ष माझ्या हातात आहे आणि मला ते पुरेसे आहे.’ खरंच त्यांनी सहा महिन्यांच्या अवधीत रेल्वेमंत्री म्हणून केवळ पुण्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय उत्तम कामगिरी करून दाखवली. या नेत्याला जर केंद्रीय मंत्री म्हणून आणखी काही काळ मिळाला असता तर पुण्याचे अनेक अर्थाने भले झाले असते. त्यांच्या या सगळ्या झंजावाती राजकीय कारकिर्दीला दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या काळातील भ्रष्टाचाराच्या आरोपाचा डाग लागला. वास्तविक दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे अत्यंत उत्कृष्ट संयोजन त्यांनी एकहाती यशस्वी करून दाखवले पण, त्या काळात त्यांच्यावर राष्ट्रीय टीव्ही मीडियाने आणि एकूणच प्रसारमाध्यमांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाची जी झोड उठवली त्यातून त्यांची प्रतिमा मलीन झाली. याचीच परिणीती म्हणून त्यांना काँग्रेसमधून नुसते निलंबित करण्यात आले नाही, तर त्यांना थेट तिहारच्या कारागृहात पाठवले गेले. तेव्हापासून मात्र कलमाडी मनाने खचत गेले आणि एकटे पडत गेले. त्यानंतर ते राजकारणापासूनही दूर झाले. पण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या भ्रष्टाचाराचा सबळ पुरावा मिळालेला नाही, त्यामुळे सीबीआयनेच त्यांच्यावरील आरोपाची केस बंद केली आणि कलमाडींचे नेतृत्व निर्दोष सिद्ध झाले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कलमाडी आता मनाने आणि शरीरानेही थकले होते. एकांतवासात त्यांनी उर्वरित काळ घालवला आणि आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या स्मृती पुणेकरांच्या मनात कायम राहतील आणि शहराच्या इतिहासातील त्यांची नोंदही कायम राहील एवढे मात्र नक्की.