Editorial : सध्या महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणामध्ये विविध राजकीय पक्षांचे नेते किरकोळ कारणावरून एकमेकांवर तुटून पडत असताना आणि ह्या हल्ल्याला अनेक वेळा जातीय आधार असतानाच महाराष्ट्रातीलच अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासे तालुक्यातील सौंदाळा नावाच्या गावाने जो आदर्श घालून दिला आहे त्याचे अनुकरण राज्यात सर्व स्तरावर होण्याची गरज आहे. या गावाने नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये आपले गाव जातीमुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्राच्या व्यासपीठावर एकीकडे जातीय संघर्ष मोठ्या प्रमाणात तीव्रपणे समोर येत असताना या छोट्या गावाने घालून दिलेला आदर्श केवळ इतर गावांनी नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांनी अनुकरण करावा असा आहे. राजकीय नेते धार्मिक, जातीय राजकारण करतात हे महाराष्ट्राला काही नवीन नाही. याच पार्श्वभूमीवर सौंदाळा गावाचा हा आदर्श अत्यंत महत्त्वाचा आहे. सरकारी पातळीवर दरवर्षी आदर्श गावांची घोषणा होत असली तरी त्यामध्ये समावेश झालेली गावे खर्या अर्थाने आदर्श असतातच असेही नाही; पण सौंदाळा नावाच्या या छोट्या गावाने गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने आदर्श अनुकरणीय उपक्रम राबवत आपण खर्या अर्थाने आदर्श आहोत हे लक्षात आणून दिले आहे. नवीन पिढीला आणि एकूण सामाजिक वातावरण खराब करणार्या सोशल मीडियाला या गावामध्ये स्थान नाही. गावात ठराविक कालावधीमध्ये मोबाइलचा वापर संपूर्णपणे बंद ठेवला जातो. शिवाय गावामध्ये बालविवाह लावले जात नाहीत आणि विधवा विवाहाला प्रोत्साहन दिले जाते. गावामध्ये सकाळी दररोज राष्ट्रगीत लावले जाते आणि स्पीकरवरून हे राष्ट्रगीत प्रसारित होत असताना सर्वजण त्याला मानवंदना देतात. अशा प्रकारचे अनेक आदर्श उपक्रम राबवून या छोट्या गावाने आपला ठसा उमटवला आहे. पण या गावाचे उदाहरण देत असतानाच सर्वांनीच त्याचे अनुकरण करण्याची गरज आहे हे मात्र अनेकांच्या लक्षात येत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये एकीकडे सौंदाळा गावाच्या आदर्श उपक्रमांची चर्चा होत असतानाच दुसरीकडे विविध राजकीय पक्षांचे नेते देवांच्या व महापुरुषांच्या प्रतिमा, पुतळे आणि त्यानिमित्ताने होणारा धार्मिक-जातीय संघर्ष यावरच लक्ष केंद्रित करत होते. राजकीय पक्ष आणि त्यांचे नेतेच अद्याप जातीमुक्त झाले नसल्याने विविध जातींमध्ये महापुरुषांची विभागणी करण्याचे अनिष्ठ काम त्यांनी केले आहे आणि मग तुमचा महापुरुष श्रेष्ठ की आमचा श्रेष्ठ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सामाजिक समरसताच विस्कटून गेली आहे. कोणताही महापुरुष हा कोणत्याही विशिष्ट जातीचा किंवा धर्माचा नसतो तर, संपूर्ण समाजाचा असतो याचा विसर जाणीवपूर्वक पडावा यासाठी तेवढ्याच जाणीवपूर्वकपणे प्रयत्न केले जात आहेत. महापुरुषांची जात पाहूनच त्याचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व ठरवण्याची अनुचित पद्धत महाराष्ट्रामध्ये विकसित होऊ लागली आहे. एखादा महापुरुष विशिष्ट जातीचा आहे म्हणजे तो चांगला आहे किंवा वाईट आहे असेच ठरवण्याकडे कल वाढत आहे. महापुरुषांना अशा प्रकारे एकाच जातीमध्ये गुंतवून ठेवण्याचे राजकारण होत असण्याच्या पार्श्वभूमीवर सौंदाळा गावाने स्वतःला जातीमुक्त करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत ठळकपणे उठून दिसत आहे. जातीमुक्त समाजाचे स्वप्न पाहणारे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातच दुर्दैवाने गेल्या काही वर्षांमध्ये जातीय अस्मितांचा संघर्ष प्रचंड प्रमाणात वाढला आहे आणि राजकारणी लोक त्याला आपल्या फायद्यासाठी खत पाणीही घालत आहेत. सामाजिक वातावरण कलुषित करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. त्यात सोशल मीडियावरील तथाकथित तज्ज्ञ आणि इन्फ्लूएन्सर्स आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारची चुकीची मांडणी करून लोकांची माथी भडकवण्याचे काम करत आहेत. या सर्व परिस्थितीमधून कशा प्रकारे बाहेर पडायचे याबाबत कोणाच्या मनात संभ्रम असेल तर त्याचे उत्तर सौंदाळा नावाच्या या छोट्या गावाने दिले आहे. जातीमुक्त समाज सामाजिक वातावरण स्वच्छ आणि निखळ करू शकेल असा संदेश या छोट्या गावाने दिला आहे. भारतीय घटनेने प्रत्येकाला आपल्या धर्माचे आणि जातीचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले असले, तरी हे करत असताना इतर धर्माला किंवा जातीला कमी लेखण्याचे कोणतेही कारण नसते. आपली स्वतःची धार्मिक किंवा जातीय अस्मिता कायम ठेवून इतर धर्म आणि जातींचे अस्तित्व मान्य करणे महत्त्वाचे असते. सौंदाळा गावाने आपल्या छोट्याशा निर्णयातून हेच सिद्ध करून दाखवले आहे. महाराष्ट्रातील हजारो खेड्यांनी अशा उपक्रमाचे अनुकरण केले तर जातीय आणि धार्मिक कारणावरून निर्माण होणार्या संघर्षाचे प्रमाण शून्यावर येण्यास अजिबात वेळ लागणार नाही. महापुरुषांची आणि देवांची नावे घेतल्याशिवाय ज्यांचे एकही भाषण पूर्ण होत नाही, असे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षाचे नेते यांनीसुद्धा या आदर्श गावापासून धडा घेऊन आपापल्या पातळीवर आणि आपापल्या क्षेत्रामध्ये या आदर्शाचे अनुकरण केले जाईल, हे जाणीवपूर्वक पाहण्याची वेळ आली आहे.