– सुनील देशपांडे Editorial – शके 1811 च्या चैत्र शुद्ध 1 म्हणजे वर्षप्रतिपदेसारख्या अगदी साडेतीन मुहूर्तातल्या शुभदिनी (Editorial) केशवराव हेडगेवार यांचा जन्म झाला. जन्मासवेच विजयाची गुढी उभारीत शुभसमयी जन्मलेले डॉ. हेडगेवार यांची आज जयंती.त्यानिमित्ताने… एका धगधगत्या क्रांतिकारकाने तो लखलखत्या विद्युलतेचा मार्ग सोडून, डोळे दिपवून टाकणारा मार्ग त्यागून, मिणमिणत्या शांत पणतीचा प्रकाश बनण्याचे ध्येय वयाच्या 35व्या वर्षी निवडले, ती व्यक्ती म्हणजे डॉ. हेडगेवार (Editorial) व तो मार्ग म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या बदलाची व दीर्घदृष्टीची तुलना कदाचित योगी अरविंद यांच्या प्रवास वळणाशी होऊ शकेल. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काय? किंवा स्वातंत्र्यप्राप्ती कशासाठी? या प्रश्नांनी पछाडलेल्या सर्व महापुरुषांना तत्कालीन स्वाभाविक जनभावनेपेक्षा वेगळ्या वाटेने जावे लागले, पण आजमितीला त्या महापुरुषांनी स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी स्वीकारलेली थोडी वेगळी वाट किती आवश्यक होती हे लक्षात येते. Editorial स्वामी विवेकानंद हे वंदे मातरम्ने भारावले होते, बद्रिसहाय टुलधरिया यांना सांस्कृतिक राष्ट्र संकल्पना स्पष्ट करणारे पुस्तक लिहिण्यास प्रोत्साहित केले; पण स्वतः मात्र हिंदू चिंतन वैश्विक चिंतन आहे हे सांगण्यासाठी शिकागोला गेले. योगी अरविंद तर प्रत्यक्ष सरकार विरोधात सशस्त्र क्रांती कार्यात होते, वंदे मातरम् काव्याने प्रेरित होते; पण हिंदू अध्यात्मिक चिंतन आधुनिक परिभाषेत सांगण्याचा मार्ग निवडला. तिसरे व अत्यंत वेगळेपणाने भारतीय जनजीवनाच्या भविष्यावर प्रभाव टाकलेले महापुरुष म्हणजे डॉ. केशव बळीराम हेडगेवार. डॉ. हेडगेवार हे क्रांतीकार्यात होते, काँग्रेसच्या आंदोलनात होते, देशासाठी, स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचायचे म्हणून सांगून अविवाहित राहिले होते, तरी स्वातंत्र्याची पूर्व अट हिंदू संघटन आहे हे कळल्यावर सर्व मार्ग सोडून ‘एषा पंन्था’ म्हणून शाखा सुरू केली. देशभक्ती सिद्ध करण्याचा धोपट मार्ग सोडून हिंदू संघटन हे आडवळणाचे काम सुरू केले. संघटनेसाठी संघटना असे म्हणून अन्य सर्व तत्कालीन वादळापासून संघटनेला दूर ठेवले. स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रयत्नात माझे योगदान असलेच पाहिजे हे प्रथम पुरुषी एकवचनी ध्येय डोळ्यासमोर ठेवून आंदोलन काळात संघाची जबाबदारी सोडली; पण स्वातंत्र्य प्रयत्नातील स्वतःचा सहभाग सोडला नाही. पण संघटनेला मूळ उद्दिष्टापासून इतरत्र भटकू दिले नाही. 1940 साल हे डॉ. हेडगेवार यांच्या आयुष्यातील, संघाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे वर्ष ठरले. या वर्षी डॉ. हेडगेवार यांचे निधन झाले; पण त्या वर्षीच्या संघ शिक्षा वर्गात समारोप करताना त्यांनी जे सांगितले ते डॉ. हेडगेवार यांच्या जीवन उद्दिष्ट पूर्तीसाठी फार महत्त्वाचे होते. त्यांनी म्हटले की, आज समोर मी हिंदू राष्ट्राचे छोटेसे स्वरूप पहात आहे. त्यांच्या जीवनोद्देशा प्रमाणे संघटना चालत होती. स्वयंसेवक व संघासाठी उद्दिष्ट स्पष्ट केले की, हे हिंदू राष्ट्र आहे व ते हिंदू राष्ट्र स्वतंत्र करायचे आहे. व भारतीय नरनारींना व भारतमातेला हा विश्वास दिला की इंग्रज हाकलणे म्हणून फक्त नाही तर हिंदू मूल्यांवर आधारित हिंदू राष्ट्र स्वातंत्र्य ही संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. आज भारत बदलत आहे. त्याला स्वतःचे भान आले आहे. हे घडले आहे ते प्रामुख्याने डॉ. हेडगेवार यांच्या चिंतनाने व त्यासाठी त्यांनी उभारलेल्या व्यक्ती निर्माण करणार्या कार्यपद्धतीमुळे. 1925 साली बीज रोवले, 1940 पर्यंत स्वतः जोपासले व अगामी 100/200 वर्षे पुरेल असे नेमके पाथेय दिले. परिस्थिती बदलली तरी नवीन आव्हानाला समजून घेणारी पिढी घडवली. आज हिंदू हा शब्द सर्व अर्थाने व सर्व अंगांनी पुष्ट बनत आहे व मार्गदर्शक बनत आहे. कारण, भारताने कोणतीही गोष्ट ठरवली, तर ती सर्व नागरिकांची असते. प्रत्येक भारतीयाने स्वयंप्रेरणेने देश, समाजासाठी काम करावे ही भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सततच्या 100 वर्षांच्या प्रयत्नांतून देशाच्या कानाकोपर्यात सामान्य नागरिकात कृतीने उत्पन्न केली. म्हणून आज हिंदूस्थान प्रभावी राष्ट्र म्हणून उभे रहात आहे. हिंदुस्थान सर्वेतुपरे हे कृतीने कसे शिकवलं? याचे उत्तर आहे डॉ. हेडगेवार यांची प्रथम कृती. काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनातील संपूर्ण स्वातंत्र्य ठरावाचे प्रत्येक शाखेतून अभिनंदन करण्यात आले. गोळवलकर गुरुजी यांनी 1962च्या चीन युद्धात संघाने पूर्ण सहकार्य दिले व जबाबदारी संभाळली. बाळासाहेब देवरसांनी If untouchability is going let it go log stock & barrel असे सांगून समाज सामाजिकदृष्ट्या दोषरहित बनवत सेवाभावी बनवला. ह्या उक्तींमधून बनलेला समाज आज विजयाकांक्षी भारताचे नेतृत्व (Editorial) करत आहे. हे संघाच्या यशाचे मर्म आहे व म्हणूनच डॉ. हेडगेवार हे भारत बदलाच्या कोंदणातील हिरा ठरतात.