Ashok Kharat : अध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ करणारा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला पोलिसांनी अटक केल्यानंतर महाराष्ट्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या विषयाला राजकीय वलय असल्यामुळे मूळ विषय बाजूला पडून यामधील राजकारण (Ashok Kharat) समोर आणण्याचा प्रयत्नही या निमित्ताने समोर येताना दिसत आहे. गेल्या कित्येक वर्षांच्या कालावधीमध्ये सातत्याने भाषणे गाजवताना व्यासपीठावर महाराष्ट्राला पुरोगामी हे विशेषण दिले जात असले, तरी हे केवळ व्यासपीठ गाजवण्यासाठीच दिले जाते की काय, अशी शंका यावी अशा घटना महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत. ज्या महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने आणि नरेंद्र दाभोळकर यांच्या आग्रहामुळे बुवाबाजी अंधश्रद्धा विरोधी कायदा झाला, त्याच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि सतत बुवा बाबा यांचे फॅड वाढलेले दिसते. Ashok Kharat Case अशोक खरात (Ashok Kharat) या तथाकथित अध्यात्मिक गुरू आणि भोंदू बाबाच्या ज्या लीला सध्या उघडकीस येत आहेत, त्या पाहता या अध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ केला जात होता हे सहज लक्षात येते. अनेक बाबा आणि बुवा सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूकही करत असतात. आपली संपूर्ण मालमत्ता एखाद्या बाबा किंवा बुवाच्या नावावर करून देणारे भक्तही आढळतात. याच मालिकेतील हा अशोक खरात हा भोंदू बाबा असला तरी या प्रकरणाला राजकीय वलय असल्यामुळे हा विषय आणखी काही काळ तरी पेटता राहील असे दिसते. महाराष्ट्र असो किंवा देशातील इतर राज्य असोत राजकारणी लोक धार्मिकतेचा वापर राजकारणासाठी करतात. ज्या प्रकारे निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतरसुद्धा आपल्या धार्मिक श्रद्धा असलेल्या ठिकाणी नतमस्तक होण्याचे काम राजकीय नेत्यांकडून केले जाते, ते पाहता राजकीय नेत्यांनी एखाद्या बाबाचे किंवा बुवाचे भक्त होणे ही काही वेगळी गोष्ट मानता येत नाही. राजकारणात असुरक्षिततेचे प्रमाण जास्त असल्यामुळे राजकीय नेत्यांना कोणत्या ना कोणत्या बाबा बुवाचा आशीर्वाद हवाच असतो आणि जेव्हा अशोक खरातसारखा एखादा बाबा समोर येतो तेव्हा हे नेते कोणताही विचार न करता अशा भोंदू बाबांसमोर नतमस्तक होतात. अशा अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत. अशोक खरातच्या घटनेमध्ये महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा सहभाग आढळल्याने त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. आणखीही काही नेते सध्या रडारवर आहेत. खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी एका वादग्रस्त महाराजांची पाद्यपूजा झाली होती तो विषयही त्याकाळी मोठा गाजला होता. भारतीय संविधानाने सर्वांना आपल्या धार्मिक श्रद्धा जपण्याचे स्वातंत्र्य दिले असले, तरी सामाजिक आणि राजकीय चेहरा म्हणून वावरत असताना आपण या धार्मिक श्रद्धेमध्ये किती वाहवत जायचे याचा विचार राजकीय नेत्यांना करावा लागतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्या बाबा किंवा बुवाच्या नादी लागलो आहोत तो भोंदू आहे का खरोखरच अध्यात्मिक मार्गदर्शन करणारा गुरू आहे यातील फरकही स्पष्ट करता आला पाहिजे. महाराष्ट्रातच नाही तर देशातही अनेक ठिकाणी गेल्या काही वर्षांमध्ये बाबा आणि बुवांचे फॅड वाढत चालले आहे. तो एक समृद्ध व्यवसाय बनत चालला आहे. आधुनिक काळातील असुरक्षितेची भावना आणि स्पर्धात्मक वातावरण यामुळे तरुणाईपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या अध्यात्मिक गुरूच्या आशीर्वादाची गरज वाटू लागली आहे. भोंदू बाबा आणि बुवांना यामध्येच मोठी बाजारपेठ दिसत असल्यामुळे थोडे ज्योतिषविषयक ज्ञान, थोडेफार बोलण्याची क्षमता आणि मार्केटिंगचे ज्ञान या बळाबर अनेक भोंदू अध्यात्मिक महाराज म्हणून उदयाला येऊ लागले आहेत. अध्यात्मिक मार्गदर्शन हा एक व्यवसाय म्हणून विकसित होऊ पहात आहे ही सर्वात चिंतेची गोष्ट आहे. अशोक खरात सारख्या भोंदू बाबांच्या कहाण्या अनेकांना माहीत असतात. या अशा महाराजांच्या आश्रमामध्ये किंवा ठिकाणामध्ये काय काय चालते याची कल्पना अनेकांना असते. पण त्याबाबत कोणीही वेळीच बोलत नाही. जेव्हा एखादी घटना समोर येते तेव्हाच अनुषंगिक घटनाही समोर येतात. वर्षापूर्वीच काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये अशोक खरातच्या विरोधात काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण त्याबाबतही दडपशाहीचे धोरण वापरून या विषयावर पडदा पाडण्याचा प्रयत्न झाला होता. पण आता अशोक खरात आणि त्याच्या काही सहकार्यांना अटक करण्यात आल्यामुळे हा विषय समोर आला आहे आणि प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या विशेष पथकाने हा विषय शेवटपर्यंत नेणे गरजेचे आहे. या विषयाला लागलेले राजकारणाचे वलय बाजूला ठेवून संपूर्णपणे या विषयाच्या खोलापर्यंत जाऊन अशोक खरातला (Ashok Kharat) शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे झाले तरच भोंदू बुवाबाजीच्या व्यवसायावर नियंत्रण बसू शकेल. अन्यथा ठराविक कालावधीनंतर नवनवीन बाबा बुवा समोर येत राहतील आणि समाजाच्या पिळवणुकीचे विषयही त्याच पद्धतीने पुढे येत राहतील.