लवकरच होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा काँग्रेस पक्षाने केली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये महागठबंधनच्या निमित्ताने इतर पक्षांशी युती करून कमी जागा लढून कमीच जागांवर यश मिळवलेल्या काँग्रेससाठी हे स्वबळाचे चिंतन निश्चितच महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये सातत्याने अपयश पाहणार्या काँग्रेसला आता स्वबळाची आजमावणी करूनच पहावी लागणार आहे. कदाचित पुन्हा एकदा भारतीय राजकारणामध्ये नव्याने भरारी घेण्यासाठी त्यांच्यासाठी स्वबळ महत्त्वाचे शस्त्र ठरू शकते. देशातील सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष असे विशेषण मिरवणार्या काँग्रेसने गेल्या काही वर्षांमध्ये विविध राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांशी युती करून निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यानिमित्ताने काँग्रेसचे राष्ट्रीय महत्त्व कमी होत चालले होते. महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या साथीने जर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला असता तर काँग्रेसला दुय्यमच भूमिका घ्यावी लागली असती. कारण मुंबई महापालिकेच्या राजकारणामध्ये शिवसेनेचा बोलबाला जास्त आहे. त्यात उद्धव ठाकरेंच्या साथीला आता राज ठाकरे आल्यामुळे या निवडणुकीमध्ये आपल्याला अतिशय दुय्यम भूमिका मिळू शकते याची कल्पना काँग्रेसला आहे. म्हणून अत्यंत योग्य वेळी त्यांनी ही भूमिका घेतली आहे आणि अशाच प्रकारची भूमिका त्यांना इतर सर्वच निवडणुकांमध्ये घेण्याची वेळ आता आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने 243 पैकी फक्त 62 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी फक्त सहा जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता. कदाचित काँग्रेसने कोणाशीच युती न करता सर्व 243 जागा लढवल्या असत्या तर विजयी जागांची संख्याही वाढली असती. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या एक कलमी कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रादेशिक पातळीवर किंवा राष्ट्रीय पातळीवरही इतर पक्षांशी आघाडी करण्याच्या नादात काँग्रेस आपले राष्ट्रीय महत्त्व गमावून बसत आहे. गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा 99 जागा जिंकून काँग्रेसने गेल्या काही निवडणुकांपेक्षा चांगले यश मिळवले असले, तरी इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांची विजयी उमेदवारांची संख्या काँग्रेसच्या उमेदवारांपेक्षा जास्तच राहिली, ही गोष्टही काँग्रेसला लक्षात घ्यावी लागणार आहे. काही वर्षांमध्ये देशात प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि या पक्षांना नेहमीच आपल्या राज्यापुरतेच स्वारस्य असते. साहजिकच लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा बार्गेनिंग पॉवरमध्ये प्रादेशिक पक्ष काँग्रेसला नेहमीच कमी महत्त्व देताना दिसतात. ज्या पक्षाचे देशावर दीर्घकाळ राज्य होते आणि देशातील अनेक राज्यांमध्ये दीर्घकाळ सत्ता होती त्या काँग्रेस पक्षाची सध्या अनेक राज्यांमध्ये सत्ता नाही आणि प्रतिनिधित्वही नाही ही परिस्थिती लक्षात घेता काँग्रेसला आता स्वबळाचा विचार करूनच पुढे यावे लागणार आहे. गेल्या काही कालावधीमध्ये भाजपाची घोडदौड सुरू आहे, त्याला एकमेव कारण म्हणजे भारतीय मतदारांच्या मनात भाजपाला पर्याय कोण याबाबत एक सुप्त शंका आहे. भाजपाच्या राजकारणाला काँग्रेस हाच एकमेव पर्याय आहे हे आता ठामपणे मतदारांच्या मनावर बिंबवण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी काँग्रेसला स्वबळाचाच विचार करावा लागणार आहे. भाजपसुद्धा आघाड्यांचे राजकारण करत आहे, पण हे राजकारण करत असताना भाजप स्वतःचे बळ वाढवण्यावरच लक्ष ठेवत असतो आणि भाजपासोबत जाणार्या मित्र पक्षांचे महत्त्व आणि बळ कमी करणे, अशाच प्रकारे भाजपचे राजकारण चालू असते. काँग्रेसला मात्र तसे जमत नाही किंवा या पक्षाच्या नेत्यांची तशी मानसिकता नाही. त्यामुळेच काँग्रेसबरोबर येणार्या मित्र पक्षांची ताकद वाढत असताना त्याच प्रमाणात काँग्रेसची ताकद कमी होताना दिसते. भाजपाच्या आघाडीबाबत मात्र याच्या उलट चित्र दिसते. यापासून आता काँग्रेसनेही धडा घेण्याची गरज आहे. आघाडीच्या राजकारणामध्ये कार्यकर्त्यांची सुद्धा कोंडी होते, कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही, काम करण्याचा उत्साह राहत नाही, अनेक वेळा मग पक्ष बदल केला जातो. काँग्रेसला गेल्या काही वर्षांमध्ये याच मानसिकतेचा फटका बसला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असेल तर ती एक केस स्टडी मानून त्यानंतर येणार्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसने हे स्वबळाचे चिंतन प्रत्यक्षात आणायला हवे. देशात जेव्हा आघाड्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली होती तेव्हा अनेक वेळा निवडणूक निकालानंतर सुद्धा आघाड्या प्रत्यक्षात आल्या होत्या. साहजिकच निवडणूक पूर्व आघाड्यांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा स्वबळावर निवडणूक लढवून स्वतःची ताकद वाढवून नंतर समविचारी पक्षांना एकत्र करणे हीसुद्धा एक महत्त्वाची राजकीय रणनीती ठरू शकते. मुंबई महापालिकेच्या निमित्ताने ही स्वबळाची कृती सुरू झाली हे बरे झाले.