Marathi Language : महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई महानगरीमध्ये रिक्षाचालक आणि टॅक्सीचालक यांना मराठी भाषा (Marathi Language) अनिवार्य करण्याबाबत जो विवाद सध्या सुरू आहे, त्यावरून एकच गोष्ट लक्षात येते ती म्हणजे मराठी भाषा अद्यापही व्यावहारिक भाषा झालेली नाही. मराठी भाषा (Marathi Language) ही महाराष्ट्र राज्याची राजभाषा आहे. या व्यतिरिक्त दोनच वर्षांपूर्वी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही दिला आहे. म्हणजे या भाषेला किमान दोन हजार वर्षांचा इतिहास असल्याचा दाखलाही त्या निमित्ताने मिळाला आहे. पण देशात सर्वात प्रगत राज्य म्हणून ख्याती असलेल्या महाराष्ट्रातच मराठीला अद्यापही व्यावहारिक भाषेचा दर्जा मिळालेला नाही हेच या ताज्या घडामोडींवरून सिद्ध होते. अनेक वर्षांपासून विविध राजकीय पक्षांनी मराठी भाषेचा मुद्दा हा राजकीय मुद्दा केला आहे आणि जेव्हा केव्हा अन्य एखादा मुद्दा चर्चेसाठी नसेल तेव्हा जाणीवपूर्वक अशा प्रकारचे मुद्दे बाहेर काढले जातात. महानगरी मुंबईमध्ये (Marathi Language) देशाच्या कानाकोपर्यातून लोक उदरनिर्वाहासाठी येत असतात. त्यापैकी अनेक जण खाद्यपदार्थांचा व्यवसाय करत असतात, हमाली करत असतात किंवा टॅक्सी, रिक्षा चालवत असतात. या सर्व लोकांना मराठी यायला हवे याबाबत कोणतेही दुमत नाही. पण ज्या प्रकारे हातावर पोट असणार्या या लोकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्यात आली आहे त्याच प्रकारे महानगरी मुंबईमध्ये लाखो आणि कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करणारे छोटे-मोठे उद्योगपती, कलाकार, खेळाडू, अभिनेते यांच्यापैकी किती जण मराठी भाषा सक्षमपणे बोलू शकतात हासुद्धा या निमित्ताने संशोधनाचा विषय ठरू शकतो. Marathi Language जे लोक अमराठी आहेत, म्हणजेच इतर राज्यातून महाराष्ट्रात उदरनिर्वाहासाठी आले आहेत किंवा मोठ्या व्यवसायानिमित्त स्थायिक झाले आहेत, त्यांना मराठी भाषा येते का हासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परप्रांतीय टॅक्सीचालक असो किंवा अब्जाधीश उद्योगपती असो सर्वांनाच मराठी यायला हवी. या निमित्ताने आणखी एक मुद्दाही समोर येतो, तो म्हणजे गेल्या अनेक पिढ्या महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहणार्या किती मराठी नागरिकांच्या घरात मराठीचा आदर केला जातो आणि रस्त्यावर वावरत असताना व्यावहारिक भाषा म्हणून मराठीचा वापर केला जातो हेसुद्धा या निमित्ताने पहावे लागेल. पिढ्यान्पिढ्या मुंबई, पुणे, नाशिक यासारख्या महानगरामध्ये राहणारी आधुनिक जेन झी पिढीसुद्धा नोकरीनिमित्त जेव्हा एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला जाते तेव्हा तेथे मराठी भाषा बोलण्याचा आग्रह या पिढीकडून केला जातो का हेसुद्धा या निमित्ताने शोधावे लागणार आहे. वास्तविकपणे मुंबई, पुणे सारखी महानगरे सोडली तर महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही शहरांमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये मराठी भाषेच्या वापराबाबत कोणतीही शंका नाही. तेथील सर्वसामान्य नागरिक दैनंदिन जीवनामध्ये मराठी भाषेचा वापर मनापासून करत आहेत. हा प्रश्न फक्त काही ठराविक शहरांपुरताच मर्यादित आहे. छोट्या छोट्या शहरात इतर राज्यांतून व्यवसायानिमित्त आलेले व्यावसायिकसुद्धा मराठी भाषा छान बोलू आणि वापरू लागले आहेत. कारण त्या छोट्या शहरांमधील सर्वसामान्य नागरिकसुद्धा तीच भाषा बोलत असतात. पण महानगरांमध्ये सर्वसामान्य मराठी नागरिकसुद्धा मराठी भाषा वापरताना दहा वेळा विचार करत असल्याने ती भाषा जर इतरांच्या कानावर पडत नसेल तर इतर परप्रांतीय मराठी भाषा शिकणार कसे, हा प्रश्नही या निमित्ताने निर्माण होत आहे. तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा या सर्व दक्षिणात्य राज्यांमध्ये त्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये सुद्धा त्यांची राजभाषा व्यवहारात बोलली जाते. इतर कोणत्याही भाषेत व्यवहार केला जात नाही. म्हणून या राज्यांमध्ये कधीच तेथील भाषेची सक्ती करण्याचा विषय येत नाही. सर्वसामान्य नागरिकच मनापासून आणि आनंदाने आपली राजभाषा वापरत असल्याने आपोआपच इतरांना ती भाषा वापरण्याव्यतिरिक्त अन्य पर्याय नसतो. महाराष्ट्रात मात्र दुर्दैवाने मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये हिंदी, इंग्रजी या इतर भाषांनी आक्रमण केले असल्याने मराठी भाषेकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. रिक्षा आणि टॅक्सीचालक यांच्यावरच फक्त मराठी भाषेची सक्ती करून संपूर्णपणे उद्देश साध्य होईल असे मानणे म्हणजे भाबडेपणा ठरेल. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आणि छोट्या छोट्या शहरांमध्ये ज्या प्रकारे अत्यंत सहजपणे आणि जाणीवपूर्वक मराठी भाषेचा वापर व्यवहारात केला जात आहे, त्याच प्रकारचा व्यवहार जोपर्यंत महानगरांमध्ये मराठी भाषेबाबत केला जात नाही तोपर्यंत परप्रांतीयांकडून मराठी भाषेची उपेक्षा चालूच राहणार आहे. तुम्हीच मराठी बोलत नाही तर आम्ही मराठी कशाला बोलू असा प्रश्न जर एखाद्या परप्रांतीयाने विचारला तर सर्वसामान्य मुंबईकर नागरिकाकडे त्याचे कोणते उत्तर असेल याचाही विचार यानिमित्ताने व्हायला हवा. महानगरांमधील पंचतारांकित हॉटेल्स असोत, मोठ-मोठी उपहारगृहे असोत, मॉल असोत, रेल्वे स्टेशन किंवा मेट्रो स्टेशन्स असोत सर्वत्र जेव्हा मराठीचा व्यावहारिक वापर होईल तेव्हाच परप्रांतीयांच्या कानापर्यंत आणि मनापर्यंत ही भाषा पोहोचू शकते. कोणतीही सक्ती करून एखादी भाषा शिकवली जात नाही. त्यामध्ये फक्त पळवाट काढून वेळ मारून नेली जाते. महाराष्ट्रातील महानगरांमध्ये किंवा इतर कोणत्याही शहरांमध्ये स्थायिक झालेला परप्रांतीयांनी मराठी भाषा बोलणे आणि समजणे आवश्यक असेल तर त्याची पूर्वतयारी म्हणून समस्त मराठी बांधवांनी आपल्या मराठी भाषेला व्यावहारिक मराठीचा दर्जा दिल्याशिवाय पर्याय नाही. मराठीत बोला आणि मराठीत व्यवहार करा हाच मंत्र महत्त्वाचा ठरणार आहे.