46 वर्षापूर्वी प्रभात : अण्वस्त्ररहित विभागाविषयीचा पाकचा ठराव यूनोकडून मंजूर

अण्वस्त्ररहित विभागाविषयीचा पाकचा ठराव यूनोकडून मंजूर
संयुक्त राष्ट्रसंघ, दि. 13 – दक्षिण आशियात अण्वस्त्ररहित विभाग निर्माण करण्याविषयी पाकिस्तानने मांडलेला ठराव संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मंजूर झाला. भारताने मात्र पुन्हा असे जाहीर केले आहे की, या एकतर्फीपणाने आणलेल्या ठरावाच्या अंमलबजावणीत आम्ही सहकार्य करणार नाही.
ठरावाच्या बाजूने 105 मते पडली. विरुद्ध मत एकही पडले नाही. भारतासह 28 देशांनी मतदानात भाग घेतला नाही. अमेरिका, ब्रिटन, चीन, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. भारताप्रमाणेच ब्रह्मदेश व भूतान या देशांनीही मतदानात भाग घेतला नाही.
युवकांना काही गोष्टींचा त्याग करावाच लागेल
वाई – संख्या व सत्ता यांच्याविरुद्ध उभे राहण्याचे सामर्थ्य फक्त सत्यात असू शकते म्हणून ‘सत्यमेव जयते’ असा उद्घोष आपण स्वीकारला आहे. युवकांची शक्ती जर समता हे मूल्य मानून काम करू लागली, तर या देशात सामाजिक समता येण्यास वेळ लागणार नाही, असे उद्गार ‘साधना’चे संपादक यदुनाथ थत्ते यांनी काढले.
न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, समता या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. युवकांनी वास्तव जीवनातील निरनिराळ्या समस्यांना उघडपणे तोंड दिले पाहिजे म्हणजे त्यांचे जीवन अनुभवसंपन्न बनेल. त्याग केल्याशिवाय परिवर्तन शक्य नाही. काही गोष्टींचा त्याग करावाच लागेल.





