भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्फूर्तीदायक गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ या रचनेला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय संसदेत विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ गीताला समोर ठेवून विरोधी पक्षांना विशेषतः काँग्रेस पक्षाला लक्ष्य केले आणि वंदे मातरम् राष्ट्रीयगीताच्या निमित्ताने वंदे राजकारणम्चे दर्शन घडवले. ज्या मंत्राने स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली आणि त्या तपस्येचा मार्ग दाखवला त्या वंदे मातरम्चे पुण्यस्मरण करणे सर्वांचे सौभाग्य आहे, अशा शब्दात पंतप्रधान मोदींनी चर्चेला प्रारंभ केला असला, तरी आपल्या भाषणामध्ये त्यांनी काँग्रेसलाच लक्ष्य करून या निमित्ताने पुन्हा एकदा देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावरही टीका केली. देशातील अल्पसंख्याक समाज नाराज होईल म्हणून काँग्रेसने वंदे मातरम्बाबत तडजोड करत त्याचे तुकडे केले आणि या निर्णयाला सामाजिक सलोख्याचे आवरण घातले, वस्तुस्थिती अशी आहे की काँग्रेसने मुस्लीम लीगसमोर गुडघे टेकले. या तुष्टीकरणाच्या धोरणामुळेच नंतर देशाच्या फाळणीसाठीही झुकावे लागले, असा खळबळजनक आरोप नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये केला. खरे तर वंदे मातरम् सारख्या प्रेरणादायक राष्ट्रीय गीतावर विशेष चर्चा आयोजित केली असताना त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता या राष्ट्रीयगीताने स्वातंत्र्यलढ्याला कशी प्रेरणा दिली आणि आजही दीडशे वर्षानंतर हे गीत कसे प्रेरणादायी ठरत आहे हे सांगणे गरजेचे असताना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सर्वच सहकार्यानी काँग्रेसला लक्ष्य करण्याचे एक कलमी धोरण अवलंबलेले दिसले. याबाबत जी वस्तुस्थिती नंतर काही समाजतज्ज्ञांनी समोर आणली ती पाहता वंदे मातरम्चे जे तुकडे करण्याचा आरोप केला जातो त्यामध्ये पुढाकार भाजपाला वंदनीय असलेल्या वल्लभभाई पटेल यांनीच घेतला होता. वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस अशा काही नेत्यांनीच तसा प्रस्ताव मांडला होता आणि वंदे मातरम् संक्षिप्त स्वरूपात समोर आणण्यात आले होते, असा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. अर्थात, काँग्रेसवर या संसदेच्या सभागृहात टीका होत असताना त्याबाबतीत कोणताही बचाव काँग्रेस नेत्यांना करता आला नाही. पण संसदेबाहेर मात्र अनेक नेत्यांनी तशा प्रकारचा बचाव करून नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील फोलपणा उघड केला. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मात्र अशा प्रकारच्या चर्चेची कोणतीही गरज नव्हती, पश्चिम बंगालची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच जाणीवपूर्वक ही चर्चा घडवण्यात आल्याचा आरोप केला. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. कारण भारतीय जनता पक्ष हा देशातील एकमेव पक्ष आहे जो 24 तास निवडणूक मोडमध्येच असतो. त्यांचा कोणताही निर्णय आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच असतो. वंदे मातरम् या राष्ट्रीयगीताला पश्चिम बंगालची मोठी पार्श्वभूमी असल्यामुळेच या विषयावर जाणीवपूर्वक चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला हे उघड आहे. भारतीय जनता पक्षाचे म्हणजे सत्ताधारी पक्षाचे हे राजकारण विरोधी पक्षांच्या उशिरा लक्षात आले. संसदेच्या व्यासपीठावर या राजकारणाचा पर्दाफाश करणे विरोधी पक्षांना शक्य होते. पण ही चर्चा जास्त गांभीर्याने घेतली नाही. आणि ज्यांनी ज्यांनी मोदींचे वक्तव्य खोडून काढले त्यांना माध्यमांनी प्रसिद्धी न देता नेहमीप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आणि जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या टीकेलाच प्राधान्य दिले. त्यानिमित्ताने सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी राजकारण किती महत्त्वाचे हे आहे हे पुन्हा एकदा दिसून झाले. गेल्या काही वर्षांमध्ये जाणीवपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या निर्णयाबाबत शंका उपस्थित करून गेल्या 70 वर्षांमध्ये काँग्रेसच्या राजवटीत काहीच झाले नाही हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी कोणतीही संधी मिळाली तर नरेंद्र मोदी यांची राजवट आणि पूर्वीच्या राजवटी यांची तुलना करून आत्ताचे सरकार कसे जास्त सक्षम आणि बळकट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. संसदेत किंवा संसदे बाहेर जेव्हा अशा प्रकारची रणनीती भारतीय जनता पक्षाकडून आखली जाते तेव्हा विरोधी पक्षांकडून विशेषतः काँग्रेसकडून त्याला मुहतोड जबाब देण्याची कोणतीही रणनीती आखली जात नाही. केवळ नरेंद्र मोदी यांच्या अशा कोणत्या भाषणांचा निषेध करून काही साध्य होणार नाही, तर मोदी यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याला ठोस उत्तर देणे गरजेचे आहे हे अद्याप काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आलेले नाही. वंदे मातरम् या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आगामी कालावधीमध्येसुद्धा देशात ठीकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल आणि या निमित्ताने सत्ताधारी पक्ष किती बळकट आणि सक्षम आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळेच देशाला फाळणीला सामोरे जावे लागले हा विषय जो नरेंद्र मोदी यांनी प्राधान्याने समोर आणला आहे, तो विषयसुद्धा सातत्याने मांडला जाईल. त्याला ठोस उत्तर देण्याचे काम आगामी काळामध्ये काँग्रेस नेत्यांना करावेच लागणार आहे.