Editorial : अमेरिकेतील एपस्टिनचे प्रकरण बरेच गाजले. अनेक नामदार आणि मालदार (Editorial) मंडळींची नावे समोर आली. काहींचे फोटोही आले. आंबट-गोड सर्व प्रकारच्या चर्चा झाल्या. अचानक इराणच्या विरोधात युद्ध सुरू झाले. एपस्टिनचे जनक असलेले इस्रायल आणि त्याचे अनेक भक्त असल्यामुळे सर्वाधिक झळ पोहोचण्याची शक्यता असलेली अमेरिका यांनी युद्ध सुरू केले. एपस्टिनकडून लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी त्यांनी (Editorial) खामेनी यांच्याकडे मोर्चा वळवला, अन्यथा एवढ्या तातडीने इराणवर हल्ला करावा असे काही घडले नव्हते. एपस्टिनने अगोदरच जगाचा निरोप घेतला आहे. त्याच्या चर्चांनीही आता जगाचा निरोप घेतला आहे. या चर्चांच्या केंद्रस्थानी असणार्या अनेक धनिकांनी आणि बलाढ्यांनी मोकळा श्वास घेतला असेल. तिकडे जगातली खळबळ थंड झाली असताना महाराष्ट्रात कोण्या खरात बाबाची अचानक चर्चा सुरू झाली. खरात बाबाचे अनेक उपद्व्याप समोर आले असले आणि अजूनही पाइपलाइनमध्ये बर्याच गोष्टी असल्याचे सांगितले जात असले तरी बळी म्हणून महाराष्ट्रातील केवळ एका वलयांकित राजकारणी महिलेची खुर्ची तेवढी गेली. इतर लोकांना अद्याप काही हात लागला नाही. कोणी कोणी खरात बाबाला किती वेळा कॉल केले याची एक आकडेवारीच महाराष्ट्रातील एका कायम चर्चेत असलेल्या वलयांकित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सादर केली. कोणत्याही पक्षाची टोपी डोक्यावर नसताना आणि शाल अंगावर नसताना अंजलीताईंना खडान्खडा माहिती कशी मिळते हाच एक मोठा चमत्कार आहे. तथापि, आपण बाबा लोकांवर (Editorial) चर्चा करताना चमत्काराची भाषा बोलायला लागलो तर बाबा लोकांपुढे माना डोलावणारे भक्त आणि आपल्यात फरक तो काय राहणार? अंजली दमानियांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. Editorial भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचे कनेक्शन थेट मंत्रालयापर्यंत पोहोचले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार लोकांना पाइपद्वारे गॅस मिळेल यासाठी तातडीने कनेक्शन देण्याचे निर्देश देत असताना ते जमत नाही. मात्र भोंदू बाबांचे कनेक्शन मंत्रालयापर्यंत पोहोचतात हेच प्रगतीशील महाराष्ट्राने एवढ्या वर्षात कमावले हे मानून धन्य व्हावे लागते. खरातचे धागेदोरे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्यापर्यंत गेले आहेत असा दावा दमानिया यांनी केला. त्यांनी कोणाची नावे घेतली या तपशीलात जाण्याची गरज नाही. ती नावे खरीही असू शकतात किंवा खोटीही. वास्तविक खरी असण्याचीच शक्यता जास्त आहे, त्याचे कारण आताच्या आणि अगोदरच्या सरकारमधील अनेक नामांकित मंडळींनी खरातला फोन अ फ्रेंड या धरतीवर असंख्य वेळा फोन केले आहेत. त्यात कोण पहिल्या स्थानावर आहे आणि कोण पुढच्या स्थानांवर आहेत हेही एव्हाना अंजली दमानियांनी सांगितलेल्या संख्येवरून सगळ्यांना समजले आहे. खरातसोबतचे फोटो मात्र मोजक्याच मंडळींचे समोर आले आहेत. त्यातही विकेट फक्त एकाच महिलेची पडली आहे. इतर मंडळींना गॉडफादर असावा किंवा ते स्वत:च गॉडफादर असावेत म्हणून त्यांचे प्रताप बाहेर आले नाहीत किंवा खूप अगोदरच जेव्हा या प्रकरणाची कुणकुण लागली होती तेव्हाच सगळी साफसफाई झाली होती असेही म्हणतात. महाराष्ट्र सरकारला अमेरिका आणि इस्रायलप्रमाणे कोणत्या देशावर हल्ला करता येत नाही. त्यामुळे अनुल्लेखानेच हे प्रकरण मारण्याचा प्रयत्न दिसतो. चर्चा अशीही आहे की कोणाला तरी जागेवर स्थिर ठेवण्यासाठी खूप पूर्वीपासून माहीत असलेले खरात बाबा प्रकरण सर्वसामान्यांनाही माहीत व्हावे याकरता आता प्रदर्शित केले गेले. हिशेब चुकता करण्यासाठी किंवा शह देण्यासाठी. मंत्री पाच वर्षांसाठी असतात. त्यांची पात्रता असेल तर लोक त्यांना पुन्हा निवडतात. मात्र, खर्या अर्थाने राज्य चालवणारी अधिकारी मंडळीही तेथे नमस्काराला जात असतील तर पूर्वी निवडणुकीत म्हटले होते ना ‘अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र’ हा प्रश्न आता विचारात घ्यावा लागणार आहे. भारतात बाबा लोकांचा दुष्काळ कधीच नव्हता आणि भविष्यातही नसेल एवढे आपल्याकडचे लोक भोळे आहेत. लाखोंच्या घरात अनुयायी आणि अब्जावधींच्या घरात मालमत्ता असलेले काही व्हीआयपी बाबा बलात्काराच्या घृणास्पद गुन्ह्यांत तुरुंगात आहेत तरीही त्यांच्यावरची भक्तांची निष्ठा ढळलेली नाही. एक बाबा हल्ली त्यांना सातत्याने मिळणार्या पॅरोलमुळेच चर्चेत असतात. कदाचित तुरुंगातील जागाही पवित्र करण्यासाठी व तेथील कैद्यांनाही आपल्या सहवासाची दिव्यानुभूती व्हावी यासाठी हे बाबा तुरुंगात जात असावेत. एरव्ही सर्व प्रकारच्या राजांची कृपा त्यांच्यावर होते. काही व्हीव्हीआयपी महाराजही आहेत. काही बाबा उद्योगपती झाले आहेत. हजारो कोटींची उलाढाल आहे. या व्हीव्हीआयपींबद्दलही कुजबूज आणि न्यायालयांची दारे ठोठावली जात आहेत. त्यांचे कोणते बिंग अजून फुटले नसल्यामुळे कायदाही काही करू शकत नाही. या सगळ्यांची संपत्ती डोळे दीपवणारी आहे. लाखो अनुयायांचे तारणहार असल्याचे भासवणार्या व्यक्तीच्या विरोधात कोणी बोलू शकत नाही. कायदाही समोर काही येत नाही तोपर्यंत हातावर हात धरूनच बसलेला असतो. ज्यांनी डोळे उघडे ठेवून सगळीकडे लक्ष ठेवायचे असते ते अंमलबजावणी करणारे अधिकारीही भक्तांत सामील होऊ लागले तर भविष्यात अवघडच परिस्थिती निर्माण होईल. श्रद्धा असावी, त्याला कोणी आडवे जाण्याचे कारण नाही. तथापि, अंधश्रद्धा आली की विषय संपतो. चांगले चांगले भरकटतात. सगळीकडे भरकटलेली माणसेच दिसू लागतात. मंत्र्यांचे दु:ख नाही, अधिकार्यांनी एवढे शिक्षण घेतल्यावरही हेच करावे?