– मोहन एस. मते
ज्यांच्या जीवनाची, कर्तृत्वाची आणि प्रतिभेची सारी धडपड स्वातंत्र्यासाठीच होती अशा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती.
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध क्रांतिकारक, हिंदू महासभेचे राजकीय पुढारी आणि बुद्धिवादी सुधारक बॅ. वि. दा. सावरकर हे आपल्या पूर्व वयात ज्वलजहाल क्रांतिकारक म्हणून तळपून गेले. ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध क्रांतिविषयक चळवळीत भाग घेतल्याच्या आरोपावरून त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
सावरकरांचे जीवन हे अत्यंत संघर्षमय होते. ते स्वातंत्र्य समरातील बिनीचे लढवय्येही होते आणि कवीही. स्वातंत्र्याचे ते महान उपासक होते. स्वतंत्रतेला त्यांनी देवत्वाच्या अत्युच्च सिंहासनावर बसविले होते. ऋषी मुनींची मुक्ती, योगी यांचा मोक्ष आणि वेदान्तियांचे परब्रह्म या सर्वांना देशाच्या स्वातंत्र्याच्या रूपातच त्यांनी पाहिले. स्वातंत्र्य हेच त्यांचे हृदयगान होते. स्वातंत्र्यच त्यांचे आराध्यदैवत होते. त्यांच्या जीवनाची, कर्तृत्वाची आणि प्रतिभेची सारी धडपड होती ती स्वातंत्र्यासाठीच. त्यांच्या हृदयाचे स्पंदन चालायचे ते स्वातंत्र्यासाठीच. त्यांची प्रतिभा हुंकारायची तीही स्वातंत्र्यासाठीच.
उत्तमातले उत्तम, उदात्ततेमधील उदात्त, सर्वोच्चतेतील सर्वोच्च म्हणजेच “स्वातंत्र्य’ असा त्यांचा मंत्र होता. त्यांचे जीवनगान होते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठीच आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठीच सावरकरांनी आपले आयुष्य वेचले. त्यामुळेच त्यांचे “स्वातंत्र्यवीर सावरकर’ हे नाव अन्वर्थक झाले आहे. अस्पृश्यता हा हिंदू समाजाला असलेला एक शाप आहे, कलंक आहे. जात-पात, वर्ण-भेद आदींनी हिंदू समाज हा दुभांगलेला आहे, छिन्नभिन्न झालेला आहे. हे पाहून सावरकरांनी स्पृश्यास्पृश्यतेविरुद्ध संघर्ष करण्याचा त्यावेळी निर्णय घेतला. सत्याग्रह करून त्यांनी रत्नागिरीचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करून घेतले. स्पृश्यास्पृश्याची भावना दूर व्हावी म्हणून सर्व हिंदूबांधवांनी एकत्र येऊन सहभोजन करावे, अशी कल्पना समोर आणली. तसे सहभोजनाचे कार्यक्रमही आयोजित केले.
1957 हे वर्ष भारतासाठी संस्मरणीय होते. भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या लढ्याचा शताब्दी महोत्सव त्यावर्षी स्वतंत्र भारतात धुमधडाक्यात साजरा केला गेला. राजधानी दिल्लीत संपन्न झालेल्या या महोत्सवाच्या कार्यक्रमाला सावरकर यांनी साभिमान सहकार्य दिले. त्यांनी आपल्या आवेशपूर्ण भाषणात पहिल्या स्वातंत्र्यलढ्याची रोमांचक माहिती दिली आणि असे प्रतिपादन केले की, भारताला जर आपले स्वातंत्र्य अबाधित राखावयाचे असेल तर त्याने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज व्हावयास हवे.
देशभक्तीने प्रेरित होऊन निखळ, नि:स्वार्थीपणाने मनुष्याने आपली राष्ट्रीय कर्तव्ये पाळली पाहिजेत, अशी सावरकरांची भावना आणि श्रद्धा होती. राष्ट्रहितासाठी कसल्याही फलाची अपेक्षा न ठेवता निष्काम कर्तव्य केले पाहिजे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. प्रबळ इच्छाशक्ती, जळजळीत लेखणी, घणाघाती विचारसरणी, जहाल अंत:करण नि दांभिकतेचा तीव्र तिटकारा या वृत्तीमुळे समाजात, धर्मात नि राजकारणात आढळून येणाऱ्या ढोंगधत्तुऱ्याचा त्यांना अत्यंत तिरस्कार होता. नव्या युगाच्या आगमनाची वर्दी देण्यासाठी आपण भूतलावर अवतीर्ण झालेले ईश्वराचे दूत आहोत, असा आव त्यांनी कधी आणला नाही किंवा कोणते सोंगढोंगही त्यांनी कधी केले नाही. त्यांचा आवाज हा चिकित्सक बुद्धीचा आवाज होता. विज्ञानाचा आवाज होता. त्यामुळे समाजातील धर्मांमधील नि राजकारणामधील सर्व प्रकारच्या भ्रांत लोकसमजुतीवर, वैचारिक बंधनावर नि सोवळ्या सोंगाढोंगावर त्यांनी घणाघात केले.
अनेक क्षेत्रांमध्ये एक महापुरुष म्हणून सावरकर सर्वसामान्य झाले होते. महाकवी म्हणून महाराष्ट्राने त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. महान साहित्यिक म्हणून त्यांचा गौरव करताना साहित्यिकांनी त्यांचे वाङ्मय अमर असल्याचा निर्वाळा दिला होता. महान देशभक्ती या नात्याने सावरकर अखिल भारतात वंदनीय मानले गेले होते. भारतात लेखक म्हणून सावरकरांना एक आगळेच स्थान प्राप्त झाले होते. समाजातील अनिष्टे, अज्ञान आणि भ्रम दूर करून समाज निकोप बनवावा यासाठी सावरकरांनी निर्भयपणे अपार कष्ट केले होते. या भौतिक जगात विज्ञान हा माणसाचा खरा धर्म आहे असे त्यांचे मत होते.
“समाजातील अन्यायकारक बंधने, रूढी आणि जुनी मूल्ये दूर करण्याच्या उद्देशाने समाजावर आसुडाने फटके ओढून समाजाची साफसफाई करणारा जो पुरुष असतो तोच महापुरुष होय’, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. या न्यायाने सावरकर खरेखुरे महापुरुष होते.
सामाजिक हितबुद्धीच्या प्रेरक शक्तीनेच ते कार्यप्रवण झाले होते आणि विचार -प्रचाराचा आसूड वापरून समाजातली मलिनता धुऊन काढण्याचे कार्य त्यांनी केले होते. भारतीय क्रांती, महाराष्ट्रातील सामाजिक क्रांती आणि भाषाशुद्धीची वाङ्मयीन चळवळ यांचा इतिहास अभ्यासावा, असे जर कधी कोणाच्या मनात आले, तर त्याला सावरकरांचा अभ्यास अवश्य करावा लागेल. त्यांचा दृष्टिकोन पूर्णत: बुद्धीवादी नि अद्ययावत होता.
भारताला जीवनकलहात टिकून राहायचे असेल तर आपल्या सामाजिक, राजकीय, सैनिकी जीवनावर भारताने बुद्धीवादी वृत्तीचे वर्चस्व राखले पाहिजे असे त्यांचे मत होते. शेतीचे यांत्रिकीकरण नि उद्योगधंद्याचे आधुनिकीकरण झाले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. शारीरिक, मानसिक, यांत्रिक, तांत्रिक आणि सैनिकी अशा सर्व दृष्टीने भारत सुसज्ज नि समर्थ बनला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. दुसऱ्या राष्ट्रांना स्वत:चे दास बनवून टाकण्यासाठी नव्हे, तर लोकभ्रमापासून साम्राज्यवादापर्यंत, सर्व तऱ्हेच्या बेड्यांपासून जगातील दास्यपीडित जनतेचे विमोचन करण्यासाठी भारत स्वत: सुसज्ज आणि समर्थ बनला पाहिजे ही त्यांची आकांक्षा होती. भारताने आपली मूळ प्रकृती सोडून देऊ नये आणि देशाच्या जीवनात राष्ट्रीय बहुसंख्येची संस्कृती प्रतिबिंबित झाली पाहिजे, अशी सावरकरांची आकांक्षा होती.
सावरकर म्हणजे असे व्यक्तित्त्व, ज्याने भारताच्या इतिहासात कीर्तीची हाव ठेवली नाही, “लक्ष्मी’ची आराधना केली नाही आणि वैयक्तिक मोठेपणाची हाव बाळगली नाही, ज्याने राष्ट्रीय हिताचीच सदैव चिंता वाहिली. राष्ट्रीय एकात्मतेसाठी, एकमतासाठी संपर्ण जीवन वेचले. मायभूमीचे विच्छेदन टाळण्यासाठी अखंड झगडा केला आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेसाठीच कार्य केले. भावी पिढ्यांवरही त्यांच्या जीवनाचा सखोल प्रभाव सतत पडत राहील. एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे त्यांचे संपूर्ण जीवन भावी पिढ्यांना प्रकाश देत राहील.