संडे स्पेशल : पाण्याचे मोल

उन्हाळा सुरू होताच ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या महिला, पुरुषांचे छायाचित्र आपण पाहतो. दिवसेंदिवस स्थिती भयावह होत असून या स्थितीला आपणही तितकेच जबाबदार आहोत. या सर्व पार्श्वभूमीवर नद्यांचे संवर्धन, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजन याबाबत सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आजघडीला संपूर्ण जग पाणीटंचाईचा सामना करत आहे. एकीकडे ग्लेशियर वितळणे आणि दुसरीकडे महापूर येणे ही बाब आता सर्वसामान्य होत आहे. अनेक भागांतील नद्या आटत आहेत. ग्लेशियर जेव्हा वितळतात, तेव्हा वरच्या बाजूस असणाऱ्या नदीच्या उगमाजवळच या पाण्याचा वापर केला जातो. दुसरीकडे ग्लेशियर वितळल्यामुळे समुद्रावर देखील त्याचा दुष्परिणाम होत आहे. वाहत्या नद्यांवर संकट वाढत आहे. जलस्रोतही संकटात येऊ लागले आहेत. या संकटापासून वाचण्यासाठीचे उपाय स्पष्ट आहेत. ज्या ठिकाणी ग्लेशियर वितळत आहेत, तेथे जंगल असणे गरजेचे आहे.
वनाच्छादित क्षेत्रामुळे सूर्यापासून येणाऱ्या तीव्र उष्णतेमुळे पृथ्वीवरच्या जमिनीचे तापमान कमी राहण्यास मदत होते. परिणामी, हवामानातील उष्णताही कमी राहील. पर्यायाने हवामानाचे वेळापत्रकही बिघडणार नाही. त्यामुळे ग्लेशियरजवळ हिरवळ असणे महत्त्वाचे आहे. यासाठी त्या भागात होणारी बेसुमार जंगलतोडही थांबणे गरजेचे आहे; परंतु आज ज्या ठिकाणी ग्लेशियर वितळत आहेत, तेथे जंगलेच दिसेनाशी झाली आहेत.
वास्तविक, कधीकाळी हा संपूर्ण भाग वनांनीच व्यापलेला होता. त्यामुळे पूर्वी ग्लेशियर एवढ्या वेगाने वितळत नव्हते. पण आज त्यांचा वितळण्याचा वेग प्रचंड वाढत चालला आहे. म्हणूनच ज्या प्रमुख कारणाने ग्लेशियर वितळणे सुरू झाले आहे, त्यावर आपल्याला लक्ष द्यावे लागेल. हा एक सोपा मार्ग असून यामागे शास्त्र आहे. ते काही रॉकेट सायन्स नाही; परंतु दुर्दैवाने आपली सरकारे याकडे गांभीर्याने पाहात नाहीत.
आज देशात नद्या, तलावांची स्थिती भीषण होत चालली आहे. भारताच्या दोनतृतीयांश नद्या कोरड्याठाक बनल्या आहेत आणि ज्या थोड्याफार वाचल्या आहेत, त्या कचऱ्याचे आगार ठरत आहेत. नद्यांची ही स्थिती चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. ज्या देशात नद्यांचे पात्र कोरडे पडू लागते, तेव्हा तेथील सभ्यतादेखील आटू लागते, असे म्हटले जाते. नद्यांचे आपल्या संस्कृतीशी, जीवनाशी आणि संस्कारांशी घनिष्ठ नाते आहे. आपल्या सर्वांचे आरोग्य हे नद्यांच्या आरोग्याशी जोडले गेलेले आहे. जर आपण नद्या चांगल्या केल्या, स्वच्छता बाळगली तर नद्यांचे आरोग्य चांगले राहील आणि आपल्या आयुष्यात निर्माण झालेल्या आरोग्याविषयीच्या वातावरणाविषयीच्या अडचणी कमी होण्यास मदत होईल.
नद्या कायम स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक लहानसहान तलाव आणि सरोवरांचे मोठे योगदान राहिले आहे. नद्यांचे पाणी या जलाशयांच्या माध्यमातून जमिनीत मुरते. जर पाणी स्वच्छ असेल, तर भूगर्भात पाण्याचे प्रमाण अधिक राहते. जलाशयाचे पुनर्भरण होते. गेल्या 42 वर्षांत आम्ही 13 नद्यांना जीवदान दिले आहे. त्यापैकी आठ नद्या राजस्थानच्या आहेत. अरवरी, रुपारेल, सरसा आदी नद्या कोरड्या पडल्या होत्या; परंतु महत्प्रयासाने या नद्या पुन्हा पाणीदार झाल्या. नद्यांचा उद्धार करणे हे एकप्रकारे संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासारखे आहे. नद्या आपल्या संस्कृतीत नेहमीच आनंदाच्या स्रोत राहिल्या आहेत. या जीवनवाहिन्या कोरड्या पडू लागल्या तर आपला आनंदही हिरावला जाणे स्वाभाविक आहे.
आजच्या स्थितीत आपण पाणी वाचविण्याचे काम केले नाही, तर पृथ्वीवर महापूर येतील, दुष्काळही पडेल. एकंदरीतच पर्यावरणीय स्थिती कमालीची बिघडू शकते. स्वातंत्र्याच्या काळात भारतात पूर येण्याचे प्रमाण एक टक्का होते आणि तीन टक्क्यांच्या प्रमाणात दुष्काळ सहन करावा लागत होता. आज नैसर्गिक संकटांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. आज भारतातील 17 राज्यांतील 365 जिल्हे दुष्काळग्रस्त आहेत आणि देशातील 190 जिल्ह्यांना सातत्याने पुराचा सामना करावा लागत आहे. दुष्काळ हा पाऊस कमी किंवा जास्त पडल्याने येत नाही, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. सध्या आपण हवामान बदलांचा जो अनुभव घेत आहोत, ते पाहता कधी पाऊस पडेल आणि कधी दुष्काळ पडेल, याबाबत ठामपणे सांगता येत नाही. आपल्याला नित्य नव्या आपत्तींचा सामना करावा लागत आहे आणि त्यातून मानवी जीवन त्रासलेले पाहायला मिळत आहे.
आपण पाण्याचा बेसुमार उपसा करत असल्याने पृथ्वीचा गाभा कोरडा होत चालला आहे. भूगर्भातील पाणीच जर संपुष्टात आले तर आपल्यावर पाणी-पाणी म्हणून आकांत करण्याची वेळ येईल. वाईट काळ येण्यापूर्वीच स्वत:ला सांभाळणारा समाज सुज्ञ, बुद्धिमान म्हणून ओळखला जातो. राजस्थानच्या लोकांना ही बाब उमगली. राजस्थानच्या लोकांनी कमी पावसातही आपली जबाबदारी ओळखली आणि कमी पाऊस पडत असतानही तेथे पावसाचा प्रत्येक थेंब अडविण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्याच धर्तीवर सर्वांनीच पाण्याचे मोल आणि मूल्य ओळखणे महत्त्वाचे आहे.
कधीकाळी भारतातील राजे पाण्यासाठी जमीन देत होते. जनता आपला घाम गाळत होती. पाण्याचे काम करणाऱ्यांच्या अन्नधान्याची व्यवस्था राजांकडून केली जात होती. इतकेच नव्हे तर पाण्याच्या कामापासून अलिप्त राहणाऱ्यांनाही याकडे वळण्याबाबत प्रेरणा दिली जायची. भारतात जलव्यवस्थापन हे सामुदायिक परंतु विकेंद्रित होते. या सर्व पूर्वेतिहासाची जाणीव जेव्हा होईल तेव्हाच आपल्या भूजलाची पातळी वाढेल आणि नद्यांचे पात्र पाणीदार होईल. देशाच्या हिताची चिंता करण्याची वेळ आता आली आहे. यासाठी सत्ताधारी, संत, विद्वान आदींनी एकत्र येऊन प्रयत्न करावे लागतील. आपल्याला इतरांची नक्कल करण्याची गरज नाहीये. आपण निसर्गसंवर्धनाच्या मूळ भूमिकेवर आलो तर जगाला जलव्यवस्थापनाबाबतचा बीजमंत्र देऊ शकतो.





