– शर्मिला जगताप हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील हिराबाई बडोदेकर या किराणा घराण्याच्या ख्यातनाम गायिका. उद्या त्यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म 29 मे 1905 रोजी महाराष्ट्रातील मिरज येथे झाला. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अब्दुल करीमखॉं आणि ताराबाई माने यांच्या त्या कन्या. गाण्याचा समृद्ध वारसा त्यांना लाभला. त्यामुळे लहानपणापासून त्यांना गाण्याची आवड होती. पण त्यांच्या मातोश्रींना आपल्या मुलींनी शिकावे. समाजात प्रतिष्ठितपणे जगावे असे वाटत होते. कारण त्याकाळी घरंदाज मुलींनी गाणे शिकण्याची प्रथा नव्हती. अशा परिस्थितीवर मात करून हिराबाईंनी आपल्या गायनाचा ठसा नाट्य संगीतात उमटवला. त्यांच्या काही स्वरगीतांचा आस्वाद घेऊया. उपवनी गात कोकिळा ऋतुराजा जीवाचा दिसला तीज । रसिकराज तीज दिसला जीव जीवा सापडला खुलत चंद्र पाहुनिया कमला जणु ।। “उपवनी गात कोकिळा’ हे हिराबाई बडोदेकर यांनी गायलेले भावगीत श्रोत्यांच्या काळजात घर करून आहे. हे भावगीत दादरा तालातील मिश्र मांड रागातील आहे. कल्याण थाटातील शुद्ध स्वरांचा हा राग या गीतामध्ये मिश्र स्वरूपात आहे. शास्त्रीय बाजाने हे गीत भरलेले आहे. हिराबाई आपल्या मैफलीत हे गीत गाऊ लागल्या. भावगीताला त्या शास्त्रीय पेहराव चढवायच्या. “उपवनी’ हे गीत गाताना हिराबाई प्राण कंठात आणायच्या आणि हे गीत ऐकताना श्रोते प्राण कानात आणून ऐकायचे. हा अनुभव अनेकांनी घेतला. ही कोण मधुरानना; अंगणा। विमल लोचने दिपवी तारांगणा।। संगीत लहरी निर्मोनी त्या करित विहारा ही हंसिका। हृदयी दाटल्या मधुर संवेदना।। हे नाट्य संगीतगीत वसंत शांतराम देसाई यांनी लिहिले असून हिराबाईंच्या मधुर आवाजात स्वरबद्ध केले. हासवी नाचवी हृदयाला । हा हृदयनाथ टाकुनी गेला।। भासवी हा रवि रजनीला । का रजनीकांत हा दिवसाला।। हा काय रंजविल ललना सुमना। स्वानंदे आनंद झाला।। “जागती ज्योत’ या नाटकातील हे गीत भा. वि. वरेरकर यांनी लिहिले आहे. मांड राग आणि धुमाळी तालात हिराबाईंनी हे गीत गायले. हिराबाईंनी अनेक गानप्रकार गायले आहेत. राग संगीताबरोबरच नाट्यपदे, भजन, अभंग, ठुमरी, भावपदे त्या आवर्जून गात असत. त्यांनी गाण्यातून भावनिकता आणि वैचारिकता यांचा सुरेख मेळ साधून ते संगीत जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. 20 नोव्हेंबर 1989 रोजी त्यांचे निधन झाले. आपल्या पाठीमागे त्यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांचा खजिना ठेवला. हा खजिना सर्वांसाठी खुला आहे.