– आरिफ शेख
बेलारुसचे राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांनी नुकतेच एका प्रवासी विमानास बळाचा वापर करून “लॅंड’ करण्यास भाग पाडले. रोमन प्रोटोसेवीच या ब्लॉगरला ताब्यात घेऊन विमान सोडून दिले. या अपहरणनाट्याने युरोपचा शेवटचा हुकूमशहा व त्यांच्या दांडगाईची जगभर चर्चा सुरू आहे.
सरकारच्या दडपशाही विरोधात आवाज उठविणाऱ्या ब्लॉगरला पकडण्यासाठी बेलारुसला चक्क एका विमानाचे “अपहरण’ करावे लागले. या घटनेने युरोपातील शेवटचा हुकूमशहा असणाऱ्या अलेक्झांडर लुकाशेंको यांचा खरा चेहरा पुन्हा जगासमोर आला आहे. बेलारुस हा एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग होता. 1994 ला तो स्वतंत्र देश झाला. तेव्हापासून ते आजपर्यंत बेलारुसमध्ये एकछत्री अंमल आहे तो लुकाशेंको यांचा. तेथे लोकशाही नावालाच आहे. मुक्त अन् निष्पक्ष वातावरणातील निवडणुका तेथे एक मृगजळ आहे.
गतवर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुकीत विरोधी नेत्याला अपात्र ठरविले. स्वेटलाना या महिला नेत्याने कडवे आव्हान उभे केले होते. मात्र, निवडणुकीत गैरप्रकार घडवून तब्बल ऐंशी टक्के मते मिळवत लुकाशेंको हे विजयी झाले. त्या विरोधात जनता रस्त्यावर उतरली. अनेक आठवडे निदर्शने व हिंसाचार सुरू होता. बळाच्या जोरावर तो दडपून टाकला गेला. आंदोलनाचे नेतृत्व करणारे गजाआड केले गेले. अनेकजण शेजारच्या देशांत आश्रयाला गेले.
रोमन प्रोटोसेवीच हा असाच एक 27 वर्षीय तरुण ब्लॉगर. विद्यार्थी दशेपासून तो लुकाशेंको यांचा टीकाकार. सतरा वर्षांचा असताना सरकार विरोधात त्याने आंदोलन केले होते. सबब शाळेतून हकालपट्टी झाली. दुसऱ्यांदा आंदोलन केले तेव्हा विद्यापीठाने त्यास बडतर्फ केले. नंतर त्याने “नेक्स्टा’ नामी टेलिग्राम चॅनेल बनविला. तो प्रचंड लोकप्रिय ठरला. सरकार विरोधात व लोकशाही समर्थनार्थ त्याने बेलारुसचे वास्तव चित्र जगापुढे मांडले. सरकार त्याच्यामागे लागले. जीव वाचविण्यासाठी त्याने लिथुआनीया या देशात आश्रय घेतला. ग्रीसची राजधानी अथेन्स येथे तो एका अर्थविषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी गेला होता. बेलारुसच्या राष्ट्रपती निवडणुकीतील पराभूत उमेदवार स्वेटलाना त्यात सहभागी होत्या. बेलारुसची गुप्तचर संस्था “केजीबी’ची त्यांच्यावर नजर होतीच.
रोमन प्रोटोसेवीच असलेल्या विमानात केजीबीचे हेर प्रवास करीत होते. 23 मे रोजी रायने एयरलाइन्सचे विमान अथेन्सहून लिथुआनियास (बेलारुसच्या हवाई क्षेत्रातून) जात होते. प्रोटोसेवीच त्यात होता. सोबत 171 सहप्रवासी देखील होते. तीन तासांच्या हवाई प्रवासापैकी 75 टक्के प्रवास पूर्ण झाला होता. बेलारुसच्या हवाई क्षेत्रातील 31 कि.मी. चा प्रवास बाकी होता. तेवढ्यात बेलारुसच्या हवाई नियंत्रण कक्षाने वैमानिकास सावध केले. विमानात बॉंब असून तत्काळ विमान लॅंड करण्याची सूचना केली.
वैमानिकाने दुर्लक्ष करू नये म्हणून प्रवासी विमानाच्या मार्गावर मिग29 हे लढाऊ विमान पाठवून त्यास मार्ग बदलण्यास भाग पाडले गेले. वेळप्रसंगी विमानावर गोळीबाराची धमकी दिली. बळाचा वापर करून व अनाधिकाराने हे विमान बेलारुसच्या राजधानीत उतरविण्यात आले. तेथे सहा तास विमानाची झडती घेतली गेली. बॉंब नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विमानास जाऊ दिले, मात्र एका प्रवाशास ताब्यात घेतले. हा प्रवासी म्हणजे रोमन प्रोटोसेवीच. त्याला पकडण्यासाठीच हा सारा खटाटोप सुरू होता, राष्ट्रपती लुकाशेंको यांच्या आदेशाने.
जगभर या घटनेची निंदा होत आहे. हा प्रकार म्हणजे सरकारी चाचेगिरी असल्याचे आरोप होत आहेत. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनने यास “हायजॅकिंग’ म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय हवाई नियमांची ही पायमल्ली असल्याची टीका युरोपमधून होत आहे. बेलारुसचे हवाईक्षेत्र असुरक्षित म्हणून घोषित करण्याची मागणी लिथुआनिया या देशाने केली आहे. युरोपियन युनियनने तर बेलारुसच्या हवाई क्षेत्रातून विमान प्रवासास मनाई करण्याची मागणी केली आहे. अमेरिकेने यास धक्कादायक घटना म्हटले आहे. यावर काय कारवाई करता येईल याचा आम्ही विचार करीत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
बेलारुसवर आर्थिक निर्बंध लावण्यासाठी युरोपीय महासंघाने हालचाली सुरू केल्या आहेत. हा सर्व गदारोळ सुरू असताना रशियाने मात्र बेलारुसची बाजू उचलून धरली आहे. यास “धक्कादायक’ म्हणणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला पुतीन यांनी दिला आहे. लुकाशेंको पूर्वी युरोपच्या आहारी होते, तेव्हा त्यांनी केलेल्या दडपशाहीकडे युरोपद्वारे दुर्लक्ष केले गेले. पुढे ते पुतीनच्या आश्रयाला गेले, तेव्हा युरोपियन राष्ट्रांना त्यांच्यामध्ये “हुकूमशहा’ दिसू लागला. रशिया व युरोप यांना आपल्या गरजेप्रमाणे वापरत या हुकूमशहाने तब्बल पाव शतकापेक्षा अधिककाळ देशाला आपल्या मगरमिठीत ठेवले आहे.
पुतीन व लुकाशेंकोदरम्यान काही बाबतीत साम्य आहे. दोघांना सत्तेचा मोह सुटत नाही. त्यासाठी भले-बुरे सर्व मार्ग त्यांना त्याज्य नाहीत. विरोधकांना देशोधडीला लावण्यात दोघांची कार्यपद्धती एकसारखी आहे. रशियात अलेक्सी नवालनी सोबत जे काही केले गेले ते जगाने पाहिले. आता प्रोटोसेवीच बाबत तोच कित्ता लुकाशेंको गिरवत आहेत. वरील दोघेही ब्लॉगर व लोकशाहीचे प्रेरणास्थान म्हणून आपल्या देशात लोकप्रिय आहेत. दोघांना सामना करावा लागतोय सत्तालोलुप नेत्यांशी. रशिया व बेलारुसदरम्यान एक करार झाला. त्यानुसार दोन्ही देशांत जर आंदोलन हाताळण्यासाठी अतिरिक्त पोलीस फोर्सची गरज लागली तर, परस्पर देशांनी ती तातडीने पुरवावी. आंदोलन हाताबाहेर गेले तर एक “बॅकअप फोर्स’ हाती असावा म्हणून केली गेलेली ही खेळी आहे. पुतीन यांची बेलारुसवर अनेक वर्षांपासून नजर आहे. त्यास ते रशियात सामील करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याची भीती बेलारुसमध्ये व्यक्त केली जाते.
प्रोटोसेवीच याला अटक करून कोठे ठेवले, त्याचे काय झाले? याची बाह्य जगतात काहीच माहिती नाही. बेलारुसचे सरकार त्याला दहशतवादी मानते. हा आरोप सिद्ध झाला तर त्याला मृत्युदंड होऊ शकतो. आपल्या जीवितास बेलारुसमध्ये धोका असल्याचे त्याने विमानात सहप्रवाशांना अटकेपूर्वी सांगितले होते. राजकीय विरोधकास जेरबंद करण्यासाठी लुकाशेंको यांची “हवाई चाचेगिरी’पर्यंत मजल गेली आहे. या कृत्याने त्यांची खुर्ची भक्कम होते की, तिला सुरूंग लागतो याकडे जगाचे लक्ष लागले आहे.