अग्रलेख : मतभेद की मनभेद?

अगोदर यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा आणि नंतर मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण आडवाणी आणि आता सुमित्रा महाजन यांच्यात काय साम्य आहे? तर हे सगळे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत. यातले आडवाणी पक्षाचे संस्थापक व दुसरे अध्यक्ष आहेत. तर जोशी तिसरे अध्यक्ष. महाजनही ज्येष्ठ नेत्या आहेत. विद्यमान लोकसभेच्या त्या सभापती असून गेल्या तीन दशकांपासून त्यांनी लोकसभेत मध्य प्रदेशातील इंदोरचे पक्षाकडून प्रतिनिधित्व केले आहे.

या सगळ्या नेत्यांमध्ये ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, ही समानता आहेच. मात्र, आणखी एक समानता आहे ती म्हणजे या सगळ्यांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडली आहे. या वयाच्या फॅक्‍टरमुळे हे बहुतांश नेते शारीरिकदृष्ट्या अद्याप सक्षम असतानाही त्यांना सक्‍तीची निवृत्ती अर्थात सीआरएस घ्यावी लागली आहे. वयाच्या एका ठराविक टप्प्यावर तुम्हाला थांबण्याचा निर्णय घ्यावा लागतो.

काम करण्याची कितीही इच्छा आणि क्षमता असली तरी थोडे बाजूला व्हावे लागते व आपल्या मागे रांगेत उभे असणाऱ्यांना पुढची वाट मोकळी करून द्यावी लागते, असा सर्वसाधारण मात्र लिहिला न गेलेला नियम आहे. पण हा नियम भारतीय राजकारणाला लागू होत नाही. त्याचे कारण पन्नाशीत पोहोचलेला नेता येथे युवा नेता म्हणून खपवला जातो व मान्यही केला जातो. तर साठी ओलांडलेला किंवा सत्तरीत पोहोचलेला नेता खऱ्या अर्थाने बहरात आल्याचे मानले जाते. त्याचा सत्तेच्या राजकारणातील तो उदयकाळ असतो.

केवळ एकाच पक्षाचे हे नाही, तर एकूणच भारतीय राजकारणाचा व त्यात सक्रिय असणाऱ्या सर्वच पक्षांचा हाच पोत आहे. हे बदलायला हवे असे भाजपने व त्यांच्या पितृ संघटनेने ठरवले. इंडिया शायनिंगचा फुगा फुटल्यानंतर आणि कॉंग्रेसकडे सत्ता गेल्यानंतर पुढची पाच वर्षे अवधी होता. तेव्हा विरोधी पक्षाची जबाबदारी पार पाडतानाच पक्षातील डागडुजीकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात झाली. पुढच्या पाच वर्षांत काय करायचे आहे व साठीत पोहोचलेल्या युवा पिढीला आता कशी वाट करून द्यायला हवी यासंदर्भात ज्येष्ठ नेत्यांचे राजधानी दिल्लीत बौद्धिक झाले. हळूहळू स्टेज सेट केले गेले. मात्र, म्हणतात ना, तोंडाला लावलेला रंग जसा कलाकाराला स्वस्थ बसू देत नाही, तद्वतच सत्तेच्या तंबूत जाऊन आलेल्यालाही सत्तेची ती ऊब सोडवत नाही. सारखी खुणावत असते. त्यामुळे बौद्धिक वगैरे झाले असले तरी सहजासहजी कोणी बाजूला झाले नाहीत व त्यांनी तसा प्रयत्नही केला.

जेव्हा रस्त्यात अडथळा असतो तेव्हा एकतर वळसा घेत पुढे जावे लागते किंवा अडथळाच दूर करावा लागतो. हा नियम आहे. त्या न्यायाने भाजपने पावले उचलली. नागपूरमधून संमती होतीच. गुजरातमधून आलेल्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पक्षाचे सुकाणू सोपवण्यात आले व निवडणुकांची जबाबदारीही देण्यात आली. मोदी यांनी पक्षसंघटनेचे पाठबळ, कार्यकर्त्यांची फौज या पाठबळावर एकहाती किल्ला लढवला व विजयश्री खेचून आणली. हा इतिहास झाला. त्यानंतर तातडीने जे काही केले गेले त्याचे पडसाद आता पाच वर्षांनतर उमटताना दिसत आहेत.

आडवाणी यंदा लोकसभा लढणार नाहीत हे स्पष्ट झाले व त्यांच्या जागी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांना उमेदवारी देत शहांची राजकीय उंची वाढवण्यात आली. तरी आडवाणी गप्पच होते. प्रदीर्घ काळ असणारी शांतता ही भविष्यात घडणाऱ्या एखाद्या मोठ्या घटनेची अथवा नाट्याची नांदी असते असे म्हणतात. आडवाणी गेली पाच वर्षे मौनातच होते. इतके की त्यांनी लोकसभेतही तोंड उघडले नाही. त्यांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या आताच्या दोन कारभाऱ्यांनी पक्षाच्या संस्कृतीला आणि विचारधारेला न मानवणारी भाषा आणि कृती अवलंबली तरी ते गप्पच राहिले.

देश कॉंग्रेसमुक्‍त करण्याच्या घोषणा झाल्या तरीही त्यांनी त्यात हस्तक्षेप केला नाही. वास्तविक त्यांची मार्गदर्शक मंडळात रवानगी करण्यात आलीच होती. तर निदान मार्गदर्शक म्हणून तरी चार समजुतीचे वा सबुरीचे बोल त्यांनी सांगावे अशी अपेक्षा होती. ती फोल ठरली. कदाचित त्यांनी तसे केलेही असावे. मात्र, किमान जाहीरपणे तसे काही समोर आले नाही. पक्षात जे काही घडत होते ते एकमताने नसून मतभेदाने होत असल्याचे यथावकाश स्पष्ट झाले. ती कोंडी मुरली मनोहर जोशी यांनी फोडली. आपण निवडणूक लढवू नये, असा संदेश त्यांना रामलाल या सरचिटणीसांच्या माध्यमातून पाठवण्यात आला. तेव्हा जोशी यांनी गप्प बसण्याऐवजी पत्रक जारी करूनच पक्षाची भूमिका त्यातून उघड केली.

नेतृत्वाला आडवाणींच्या भूमिकेची धास्ती असणारच. मात्र, त्याची योग्य काळजी घेतली गेली असे वाटत असतानाच आता आडवाणींनी प्रदीर्घ काळानंतर ब्लॉग लिहीत पक्षाला म्हणजे सर्व सत्ताधीशांना त्याद्वारे कानपिचक्‍या दिल्या आहेत. ज्यांचे भाजपसोबत मतभेद आहेत, त्यांना पक्षाने कधीही देशद्रोही मानले नाही. तर विरोधकच मानले व अभिव्यक्‍तीचा आदर राखणे हाच भारतीय लोकशाहीचा सार असल्याचे स्मरण त्यांनी करून दिले. सुमित्रा महाजन यांनीही पत्रक जारी करून आपण आता लोकसभेसाठी लढणार नसल्याचे जाहीर केले आहे.

मध्य प्रदेशातील सर्व जागांवरचे उमेदवार जाहीर करूनही इंदोरबाबत सस्पेन्स पाळला गेला. हा त्यांना इशारा होता की, निर्णय त्यांच्यावरच सोपवला गेला याचा उलगडा कदाचित महाजन जेव्हा आत्मचरित्र लिहितील तेव्हा होईल किंवा होणारही नाही. हल्ली एक वाक्‍य कायम ऐकवले जाते. त्याचा आशय असा की लोकांनी तुम्हाला केव्हा थांबणार विचारण्याच्या अगोदरच तुम्ही थांबायचे असते.

यशवंत सिन्हा व दुसरे शत्रुघ्न सिन्हा यांनी बराच काळ भाजपात घालवला असला तरी ते तसे बाहेरचेच. मात्र आडवाणी, जोशी, महाजन ही नावे वेगळी आहेत. त्यांनी निवडणुका लढवाव्यात असे काही नाही. अथवा त्यांचे पक्षाच्या विद्यमान नेतृत्वाशी मतभेद होऊच नयेत असेही नव्हते. दोन व्यक्‍तीत कायम मतैक्‍यताच असते असे नाही. मात्र मनभेद असता कामा नये. असले तरी ते दिसू नयेत.

दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीही कायम तेच म्हणायचे. केवळ स्वपक्षीयच नाही, तर विरोधी पक्षांच्या संदर्भातही ते असेच बोलायचे. त्यामुळे भारतीय राजकारणातले ते अजातशत्रू व्यक्‍तिमत्त्व ठरले. अटलजींचा वारसा सांगणाऱ्या भाजप नेत्यांना किमान या एका बाबतीत तरी आपले वेगळेपण जपता आले असते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.