चर्चा : राणेंच्या राजकीय चढउताराची कहाणी

-परेश प्रभू

नारायण राणे… महाराष्ट्राच्या विशेषतः दक्षिण कोकणच्या राजकारणातील एक वादळी नाव. त्यांचा “नाऱ्या’ पासून “नारायणरावां’ पर्यंतचा राजकीय प्रवास शब्दांकित करणारे “नो होल्डस्‌ बारड्‌’ हे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. याला आत्मचरित्र जरी म्हटले गेले, तरी हे काही परिपूर्ण आत्मचरित्र नाही. हे केवळ राणे यांचे राजकीय आत्मकथन आहे. तेही त्यांच्या नजरेतून मांडलेले अनुभव आहेत, त्यामुळे बरेचसे एकांगीही आहे, परंतु तरीही आजच्या राजकारणाचे ताणेबाणे समजून घेण्यासाठी वाचण्याजोगेही आहे. नारायण राणे या वादळी व्यक्‍तिमत्त्वाचे राजकीय आत्मकथन तितकेच वादळी असणे स्वाभाविक आहे. अद्याप प्रकाशित व्हायचे असलेल्या या आत्मचरित्रात नेमके काय आहे…?

शिवसेनेपासून सुरू झालेला नारायण राणेंचा राजकीय प्रवास व्हाया कॉंग्रेस आणि भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षापर्यंत कसा येऊन स्थिरावला, याची ही बरीचशी प्रांजळ कहाणी आहे. प्रियम गांधी-मोदी यांनी ती मूळ इंग्रजीतून शब्दांकित केली आहे आणि हार्पर कॉलिन्स ही प्रख्यात प्रकाशनसंस्था तिचे प्रकाशक आहेत. केंद्र आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील कालचे आणि आजचे प्रमुख मोहरे बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी, शरद पवार, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस, सोनिया गांधी, राहुल गांधी, अहमद पटेल आणि इतर लहानमोठ्या नेत्यांचे आलेले अनुभव राणेंनी या पुस्तकात कथन केले आहेत. राणे यांचा एकूण वादळी राजकीय प्रवास पाहता हे आत्मकथन स्फोटक असेल अशी अपेक्षा होती आणि तसे ते काही गौप्यस्फोट करणारे जरूर आहे, परंतु त्याहून अधिक त्यातून दिसते ती कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेल्या व सामान्य कुटुंबातून आलेल्या एका नेत्याची चढउताराची राजकीय वाटचाल. या राजकीय प्रवासात आपल्याला जे बरे वाईट अनुभव आले ते पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच कोणताही आडपडदा न ठेवता राणे यांनी सांगितले आहेत. कॉंग्रेस आणि भाजप ह्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आपल्याला मुख्यमंत्रिपदाचे गाजर दाखवत कशी फरफट केली तेही सांगायचे राणे यांनी टाळलेले नाही.

या आत्मकथनातून राणेंची तीव्र सत्ताकांक्षा जशी दिसते, तसेच त्यांच्यासारख्या जनाधार असलेल्या नेत्याच्या पायात पाय टाकून अडथळे निर्माण करण्याचे त्यांच्याच पक्षांतील सहकाऱ्यांकडून कसे प्रयत्न झाले, त्याचाही तपशील राणेंनी काही हातचे राखून न ठेवता यात दिला आहे. राणेंना बाळासाहेबांकडून मिळालेले प्रेम आणि पदे याविषयी ते कृतज्ञता व्यक्‍त करतात, परंतु आपल्याला शिवसेना का सोडावी लागली याची कारणे देताना उद्धववर त्याचे खापर फोडतात. तो निर्णय घ्यायला काही लोकांनी आपल्याला भाग पाडले, असे ते म्हणतात. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर बाळासाहेबांना खलिस्तानवाद्यांनी धमकी दिल्याने सुरक्षेस्तव त्यांना लोणावळ्याला जावे लागले, तेव्हा आपली सुरक्षा जागी आहे की नाही हे पाहायला रात्री दोन वाजता बाहेर डोकावलेल्या मीनाताईंना एका कारमध्ये राणे आणि त्यांचे सहकारी त्या अपरात्रीही दक्ष असल्याचे दिसते, तेथून ह्या आत्मकथनाची सुरुवात होते. हे पुस्तक अद्याप अप्रकाशित असल्याने त्याचा संपूर्ण तपशील सांगणे काही योग्य होणार नाही, परंतु एक झलक येथे दाखवणे वावगे ठरू नये.

कोकणातल्या कणकवलीजवळच्या वरवडे गावी जन्मलेला, परंतु मुंबईत मिल कामगार असलेल्या वडिलांचा हा मुलगा. वडिलांच्या आजारपणामुळे ते सहकुटुंब गावी जातात. जाताना या मुलाला शिक्षणासाठी मामाकडे चेंबूरला ठेवून जातात. चौदाव्या वर्षी शिवसेना या झंझावाताशी त्याचा मग परिचय होतो. तेथून बाळासाहेब ठाकरे या वादळाशी नाते जडते. शिवसेनेसारख्या तेव्हाच्या आक्रमक संघटनेतून राजकीय प्रवास सुरू होतो. हनुमंत परब हा आपला मित्र आणि आपण दोघे मिळून एकच हार विकत घेऊन एकत्र बाळासाहेबांना कसा घालायचो. त्यामुळे परिसरात “हऱ्या-नाऱ्या’ ची आपली टोळी प्रसिद्ध झाल्याचा किस्सा राणेंनी सांगितला आहे.

घराशेजारी राहणारी उषा विचारे विवाहबद्ध होऊन नीलम राणे कशी बनली आणि आजतागायत हा सुखी संसार कसा चालला आहे हे कुुटुंबवत्सल राणे या आत्मकथनात सांगतात. राजकारण्यांची मुले जास्त शिकत नाहीत, परंतु आपली नीलेश व नीतेश ही दोन्ही मुले कशी उच्चशिक्षित बनली आणि त्यामुळे आपल्याला त्यांचा कसा अभिमान वाटतो हेही आवर्जून नमूद करतात. शिवसेना शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्ट समितीचा सदस्य, नंतर अध्यक्ष अशी एकेक यशाची पायरी चढत जाताना मुंबईच्या महापौरपदाची अपेक्षा धरली असताना बाळासाहेब कोकणात मालवणमधून विधानसभेची निवडणूक लढवायला सांगतात. इच्छा नसताना ती उमेदवारी कशी स्वीकारावी लागते आणि त्या निवडणुकीसाठी जिवाचे रान कसे करावे लागते हेही राणेंनी यात सांगितले आहे. महिन्यातून चार वेळा मुंबई गोवा महामार्गावरून नऊ तास प्रवास करून रोज मतदारसंघातील चार गावांवरच्या चाळीस वस्त्या पादाक्रांत करून आपण कसा प्रचार केला तेही त्यांनी सांगितले आहे.

या आत्मकथनातून अनेकदा राणेंचा राजकीय चाणाक्षपणा, धोरणीपणा, अभ्यासू वृत्ती यांचे दर्शन घडते. प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थितीचा अचूक अंदाज घेत त्यानुसार आपली भूमिका ठरवणाऱ्या राणेंची शिवसेना सोडल्यानंतर मात्र परवड का झाली हा तपशील वाचनीय आहेच, परंतु राजकारणात वावरणाऱ्यांसाठी चिंतनीयही आहे. राजकारण हा किती जिवघेणा खेळ असतो याचे दर्शन त्यातून घडते. आपल्या आमदारकीच्या, मुख्यमंत्रीपदावरील काळातील कामगिरीच्या तपशिलाला थोडा आत्मप्रशस्तीचा दर्प येतो, परंतु वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी मिळालेल्या मुख्यमंत्रिपदाचा वापर करीत आपण केलेली कामे, जनतेसाठी सुरू केलेली हॉटलाइन, जनता दरबार, मुंबईतील 97 गुंडांचा नायनाट वगैरेंची नोंद अपरिहार्यपणे येणे साहजिक आहे. या आत्मकथनातील सर्वांत वेधक प्रकरण आहे ते 99 च्या निवडणुकीवेळच्या घडामोडींचे. शिवसेना-भाजपच्या जागा कमी का आल्या, आपण सत्तास्थापनेसाठी अपक्ष व छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवूनही भाजपच्या नेत्यांनी त्यात अडथळा का आणि कसा आणला, कॉंग्रेस – राष्ट्रवादीचे विलासराव देशमुखांचे सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडण्यासाठी आपण कशी मोहीम उघडली, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे आमदारही कसे गळाला लागले, परंतु भाजपने बाळासाहेबांकडे जॉर्ज फर्नांडिसांना पाठवून ऐनवेळी या मोहिमेला आपला पाठिंबा नसल्याचे कसे जाहीर करायला लावले, हा या आत्मकथनातील कळसाध्याय आहे, त्यामुळे वाचकांनी तो या पुस्तकात मुळातूनच वाचणे आवश्‍यक आहे.

भाजपने त्यांना सध्या राज्यसभेची खासदारकी दिली आहे, परंतु आपण आजही महाराष्ट्रावर डोळा ठेवून आहोत असे राणे या आत्मकथनाच्या शेवटी सांगतात. “नारायण राणेंना निकाली काढणे सोपे नाही’ असा इशाराही जाता जाता त्यांनी दिला आहे. राष्ट्रीय पक्षांनी जराशी मदत केली तर आपण निवडणुकांत विरोधकांचा धुव्वा उडवू असा आत्मविश्‍वास व्यक्‍त करताना “पिक्‍चर अभी बाकी है दोस्त…’ असे सांगायलाही ते अर्थात विसरत नाहीत! राणेंना निकाली काढू नका हाच या आत्मकथनाचा एकूण मथितार्थ आहे!

Leave A Reply

Your email address will not be published.